World Celebrates Malala Day In Honour Of Malala Yousafzai : दरवर्षी १२ जुलै रोजी ‘मलाला दिवस’ साजरा केला जातो. पाकिस्तानी शिक्षण कार्यकर्त्या व नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त मलाला युसुफजाई (Malala Yousafzai) यांचा वाढदिवस संपूर्ण जग या दिवशी मलाला दिवस म्हणून साजरा करतो.मलाला युसुफजाई २१ व्या शतकातील एक आयकॉन आहे. मलाला युसुफजाई शौर्य, दृढता आणि स्त्रियांच्या हक्क, शिक्षणासाठी समर्थनाचे प्रतिनिधित्व करते. मुलांसाठी आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या एका असामान्य मुलीला समर्पित म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

एक आत्मचरित्र, जे आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर ठरले (An Autobiography That Became An International Bestseller) :

मलाला युसुफजाईचा जन्म १२ जुलै १९९७ रोजी पाकिस्तानातील मिंगोरा येथे झाला. ‘आय ॲम मलाला: द गर्ल हू स्टुड अप फॉर एज्युकेशन अँड वॉज शॉट’ या आत्मचरित्रात तिने मानवी हक्कांची वकिली करणारी तरुणी म्हणून तिच्या शिक्षण आणि अनोख्या अनुभवांचे वर्णन केले आहे. हे पुस्तक पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इतर इस्लामिक राष्ट्रांतील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबद्दल माहिती प्रदान करते; जिथे दहशतवादी संघटना आणि अप्रामाणिक राजकीय व्यक्तींद्वारे धोकादायक परिस्थिती निर्माण केली जाते.

मलाला युसुफजाई तिच्या वडिलांच्या मदतीने तिच्या सभोवतालच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक नियमांवर मात करण्यास सक्षम ठरली. मलाला यांचे बालपण धार्मिक छळ, भ्रष्टाचार यांनी भरलेलं असूनही तिने परदेशी भाषा शिकल्या. तिने सर्व मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत अशी इच्छा व्यक्त केली. जर बेनझीर भुट्टो पंतप्रधान होऊ शकतात, तर आपल्यापैकी कोणीही का होऊ शकले नाही? असा सवाल तिने त्यावेळी केला.

हेही वाचा…बाबांनी विकली भाजी, आईनं ठेवलं सोनं गहाण; UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या स्वातीची प्रेरणादायी गोष्ट पाहा

मुलींच्या शिक्षणाच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या मलालाला ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तालिबानी बंदूकधारीने डोक्यात आणि मानेवर गोळी झाडली, तेव्हा पहिल्यांदा जागतिक स्तरावर मलाला यांना ओळख मिळाली आणि तिचे आयुष्य पूर्ण बदलले. सामना शस्त्राऐवजी शिक्षणाने केला पाहिजे असे तिला वाटले व ती आपल्या कुटुंबासह इंग्लंडला गेली आणि दहशतवादाच्या प्रतिकाराचे प्रतीक म्हणून तिचा प्रभाव वाढला.

सर्वात तरुण नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई (Youngest Recipient Of The Nobel Peace Prize Malala Yousafzai) :

मलालाची प्रशंसा आणि पुरस्कारांची यादी सतत वाढत चालली आहे. तिच्याकडे सध्या ५० पेक्षा जास्त पुरस्कार आहेत. या यादीमध्ये विविधतासुद्धा आहे आणि त्यात २०११ मध्ये मिळालेला ‘राष्ट्रीय युवा शांतता पुरस्कार’, जो आता ‘राष्ट्रीय मलाला शांतता पुरस्कार’ म्हणून ओळखला जातो. तसेच ‘आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार’ (२०१३), विचार स्वातंत्र्यासाठी ‘सखारोव पारितोषिक’ (२०१३), २०१५ चा सर्वोत्कृष्ट मुलांच्या अल्बमसाठी ‘ग्रॅमी’, राष्ट्रीय संविधान केंद्राने २०१४ मध्ये लिबर्टी पदक प्रदान केले होते.

बाल शोषणाविरुद्धच्या तिच्या कार्यासाठी मलालाला २०१४ चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. नोबेल शांतता पुरस्कार प्राप्तकर्त्यांना पदक, डिप्लोमा आणि आर्थिक पारितोषिक दिले जाते; जो तिने भारतीय प्रचारक कैलाश सत्यार्थी यांच्याबरोबर शेअर केला होता. त्या वेळी ती फक्त १७ वर्षांची होती. ‘मुलांच्या आणि तरुणांच्या दडपशाहीविरुद्ध आणि सर्व मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी’ तिच्या प्रयत्नांमुळे तिला हे पदक मिळाले.

मलाला ही ‘युएन मेसेंजर ऑफ पीस’ ही पदवी मिळवणारी सर्वात तरुण महिला आहे. तिच्या सन्मानार्थ एका लघुग्रहाला तिचे नावसुद्धा देण्यात आले आहे, तर तिचे आत्मचरित्र याच सर्व क्षणाची आठवण करून देते.

नोबेल शांतता पुरस्काराची रक्कम संस्थेला केली दान (Donated Nobel Peace Prize Proceeds To Charity) :

मलालाने या पुरस्कारातून मिळालेली सर्व रक्कम मलाला फंडात दान केली; जेणेकरून मुलींना जगात दर्जेदार शिक्षण मिळावे. तसेच मुलींना इंग्रजी, डिजिटल तंत्रज्ञान कौशल्ये शिकवणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी ती निधीचे समर्थन करते.

मलाला दिवस (Malala Day) :

गोळीबारानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीनंतर, १२ जुलै २०१३ रोजी मलालाने न्यूयॉर्कमधील UN मुख्यालयात तिचे पहिले सार्वजनिक भाषण दिले. तर हाच दिवस ‘संयुक्त राष्ट्र मलाला दिन’ साजरा करण्यात आला, ज्याचा उद्देश जागतिक स्तरावर तरुण नेत्यांना ‘सर्व मुलांना, विशेषत: मुलींना, शिक्षणात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने प्रवृत्त करणे आणि एकत्र आणणे असा आहे. तिच्या म्हणण्यानुसार आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा, मुलाचा आणि मुलीचा हा मलाला दिवस आहे.