उज्वला तिच्या तीन मैत्रिणींसह पोलीस स्टेशनच्या आवारात अस्वस्थपणे फिरत होती. पहिल्यांदाच तिथे गेल्यामुळे पोलिस स्टेशनच्या आत जाण्याचं तिला धाडस होत नव्हतं. त्या पोलिस स्टेशनमधील महिला अधिकाऱ्यांनी त्यांना आत बोलवून विचारपूस केली. “काय झालंय? मदत हवी आहे का?”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रडत रडतच होकारार्थी मान हलवून उज्वलाने बोलायला सुरूवात केली.

“तीन वर्षापूर्वी मी पहिल्यांदा अबक या खासगी कंपनीमधे वीस हजार रुपये आर्थिक गुंतवणूक केली होती. त्याचे मला एका वर्षात दामदुप्पट होऊन चाळीस हजार रुपये मिळाले. त्या कंपनीवर माझा विश्वास बसला कारण आणखी काही लोकांना देखील पैसे दुप्पट होऊन मिळाले होते. त्यामुळे या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींना तयार केलं. आम्ही सगळ्यांनी मिळून पंचवीस लाख रूपये गुंतवले. दोन दिवसांपूर्वी ते सगळे पैसे दुप्पट होऊन आम्हाला मिळणार होते म्हणून आम्ही त्या कंपनीच्या ऑफिसमधे गेलो होतो. पण ते ऑफिस चार पाच दिवसापासून बंद आहे, असं कळलं. आम्हाला वाटलं, दोन तीन दिवसांत उघडतील म्हणून वाट बघितली. आजही ऑफिस बंदच आहे.”

“कंपनीतील कुणाचा फोन नंबर आहे का?”

“त्यांचा फोन बंद येतोय. म्हणून तर भीती वाटतेय. त्यांनी आम्हाला फसवलं तर नसेल ना?”

“आम्हाला माहीत आहे या कंपनीबद्दल. ती कंपनी फ्राॅड आहे.”

हेही वाचा… अनुष्का शर्मा, हे श्रेय तुझंच…

ते ऐकून चौघींचा धीर सुटला. त्या रडायलाच लागल्या. त्यांनी त्यांच्या जोडीदाराला न सांगता ही गुंतवणूक केली होती. त्यांनाही आपण फसवलं या गोष्टीची खंत त्यांच्या मनात होती. शिवाय पैसे गेल्याचं दु:ख होतं. पोलिसांनी त्यांना एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) नोंदवायला सांगितलं. त्यासाठी त्या तयार होईनात. पोलिसांनी त्यांना समजावलं. “ऐका आमचं. एफआयआर असेल तर हे लोक सापडतील तेंव्हा तुमचे पैसे परत मिळू शकतील. नाहीतर चोर सापडले तरी पैसे मिळणार नाहीत.”

त्या चौघींनी त्या फ्राॅड कंपनीविरोधात एफआयआर नोंद केली. अशाच पध्दतीने फसलेल्या इतर मैत्रिणींची नावं, त्यांचे फोन नंबर्स, प्रत्येकीची गुंतवलेली रक्कम अशी सगळी माहिती पोलिसांनी विचारली. प्रत्येक फसलेल्या स्त्रीला पोलीस स्टेशनमधे येऊन वैयक्तिक तक्रार नोंदवावी अशी सूचना केली. काही दिवस सगळीकडे याच गोष्टीची चर्चा होती. उज्वलामुळे तिच्या मैत्रिणीही फसल्या गेल्या होत्या. तिला सगळ्यांकडून रोज ऐकून घ्यावं लागत होतं. उज्वलाला प्रचंड मानसिक त्रास होत होता.

उज्वलाचं काय चुकलं ?

१) जास्त पैसे मिळवण्याच्या मोहामुळे तिने कुणाचाही सल्ला न घेता पैसे गुंतवले.

२) एकदा चांगला परतावा मिळाला म्हणून तिने त्या कंपनीवर प्रचंड विश्वास ठेवला.

३) तिने अनेकींना या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी तयार केलं.

४) एका फ्राॅड कंपनीची जाहिरात ती मोठ्या प्रमाणात करत होती.

५) उज्वला आणि तिच्या मैत्रिणी तशा श्रीमंत होत्या. त्यामुळे दोन तीन लाख रुपये त्या सहजच गुंतवू शकल्या होत्या. पण त्यांनीही कसलीच चौकशी न करता वर्षात दामदुप्पट अशा फसव्या जाहिरातीला फसल्या होत्या.

बँकांसारखे व्यवहार करणाऱ्या अशा अनेक फ्राॅड कंपन्या आहेत ज्या ग्राहकांना त्यांच्या जाळ्यात सहजच ओढतात. ग्राहक, लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या मोहापायी जवळची कष्टाची रक्कमही घालवून बसतात. बऱ्याचवेळा स्त्रियांच्या लोभ, मोह, माया या वृत्तीचा, स्त्रियांच्या आर्थिक असाक्षरतेचा या कंपन्या बरोबर फायदा घेतात. उज्वलाच्या बाबतीत नेमकं हेच झालं होतं.

आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी – बँकांपेक्षा पतपेढ्या, खासगी वित्तसंस्था या फसवणूक करण्याची जास्त शक्यता असते त्यासाठी.

१) आर्थिक साक्षर होणं ही सर्वांत महत्वाची गोष्ट आहे. आर्थिक देवाण-घेवाण, कोणत्याही कंपनीबरोबरचे आर्थिक व्यवहार स्त्रियांनी समजून घेतलेच पाहिजेत.

२) त्यांच्या प्रामाणिक व्यवहाराबरोबरच त्यांचे लहान मोठे घोटाळे असतील तर याची माहिती घेत राहावं. त्याबद्दल अधुनमधून आर्थिक क्षेत्रातील तज्ञांकडून शंका निरसन करुन घ्याव्यात. आर्थिक व्यवहार करत असताना विश्वासू अर्थसल्लागाराची मदत घेणं कधीही महत्वपूर्ण असतं.

३) कोणतीही संस्था अशी झटपट पैसे देऊ शकत नाही. एका वर्षात दामदुप्पट तर शक्यच नाही. कोणतीही बँक, राष्ट्रीयकृत बँक सुध्दा जो व्याजदर देऊ शकत नाही त्या पेक्षा जास्त व्याज कुणीही देऊ शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवावं.

४) कोणत्याही खासगी कंपनीत गुंतवणुकीसाठी पैसे देताना किमान त्या कंपनीची १० वर्षांची सत्यता पडताळून पाहावी.

५)फसवणूक झाल्याची खात्री असेल तर न घाबरता पोलिसांकडे तक्रार करणे, एखाद्या वकिलांची मदत घेऊन आपली केस नीट समजून घ्यायला हवी.

६) ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडेही तक्रार नोंदवता येते.

फसवणूक ही गोष्ट कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. फक्त त्या फसवणुकीचं स्वरूप बदलत राहतं. म्हणुनच ग्राहकराणीने, मोहाला आवर घालायला हवा. अर्थसाक्षर व्हायला हवं. आणि कष्टाने मिळवलेल्या पैशांचा सन्मान करायला हवा.

समुपदेशक, सांगली.
archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One can suffer a huge financial loss and fraud by succumbing to the temptation of doubling the money dvr