प्राची साटम

“अरे आज शेवटचा दिवस तुझा.. काय दिवस निवडला आहेस तू पण लास्ट डे साठी… थर्टीफस्ट एकदम.. व्वाह. पण असं अचानक, कोणालाच माहिती नव्हतं..” थर्टीफस्टसाठी हाफडे मिळाला म्हणून घरी जाणार तोच त्याचा एक सहकारी ऑफिसमधे सगळ्यांचा निरोप घेत होता. त्याचा फार जवळचा मित्र नव्हता तो पण रोजचं हायबाय असणारा तसा ओळखीचा चेहरा. आता उद्यापासून त्यात एका चेह-याची कमी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसा त्याचा काही खास बेत नव्हता, वर्षाच्या शेवटच्या दिवसासाठी. पण आयता मिळालेला हाफ डे कशाला सोडा म्हणून तो तसा खुशीतच ऑफिसमधून निघाला. तिथून निघाला असला तरी त्याच्या डोक्यातले काही विचार मात्र निघायचे नावच घेईनात. त्याने खरं तर तिला निर्वाणीचा मेसेज पाठवलाच होता, पण तरी केलं ते बरोबर केलं का याचा गोंधळ त्याला सोडतच नव्हता, शंकाकुशंकांच्या पायरीवर बसून इथेतिथे उड्या मारण्याचा खेळ खेळण्यात त्याला जराही स्वारस्य नव्हतं. लगेच लग्न करणं त्याला जमणार नव्हतं, नोकरी आत्ता कुठे सुरु झाली होती; त्यात लग्नाची जबाबदारी घेणं त्याला बेजबाबदारपणा वाटला. तिचा लगेच लग्नाचा हट्ट मात्र मोडेना शेवटी त्याला ते नातंच मोडावं लागलं, अन् म्हणूनच आजचा तो तिला पाठवलेला निर्वाणीचा मेसेज. उगाच कशाला रेटत रेटत पुढे न्यायचं त्यापेक्षा आता आहे त्या क्षणाला थांबू असा स्पष्ट शब्दांत सांगितलेल्या मेसेजला तिचा मात्र अजून रिप्लाय आला नव्हता. त्यामुळेच दिवसभर त्याची चाललेली तगमग.

हेही वाचा : मासिक स्रावाच्या नियमितपणासाठी पपई

अचानक त्याच्या विचारांची तंद्री भंग पावली ती मोठ्या ड्रील मशिनच्या आवाजाने. बघतो ते त्याच्या ऑफिसपासून १५ मिनिटांवर असलेल्या छोट्याशा बेकरीमधून तो आवाज येत होता. चालत तो तिथपर्यंत पोहोचला. आत डोकावून त्याने रोजच्या सवयीने अंकलना हाक मारली. “क्या अंकल, क्या चल रहा है..” अंकल बाहेर येऊन त्याच्यासमोर उभे राहिले, ते काही बोलणार इतक्यात तोच त्यांना म्हणाला, “न्यू इयर के बहोत ऑर्डर्स मिले लगता है… बेकरी बडी कर रहे हो क्या..” मिश्कील नजरेने त्यांने अंकलना विचारले. “नहीं बेटा.” काहीशा मलूल स्वरात अंकल उत्तरले. “बेकरी बंद कर रहा हूं. नेक्स्ट मंथ यूएस जा रहा हूं बेटे के पास. बेकरी बेच दिया मैंने.” झालेलं आश्चर्य आणि दुःख शक्य तितकं लपवत तो हसत म्हणाला, “अरे वा.. बढिया है. यूएस तो मस्त है एकदम, अच्छा है ना, अब आराम करो आप. घूमो वहा पे, नहीं तो उधर जाके बेकरी खोल दो..क्या..” “देखता हूं..पर कहा अब एक बंद करके दुसरी शुरुआत करु… मुश्किल है. अच्छा रुको एक मिनट.” अंकल घाईघाईने आत गेले आणि कसलासा पुडा घेऊन बाहेर आले. “ये लो. तुम्हे फ्रुट केक पसंद है ना यहा का. ये लेके जाओ. अब कलसे फ्रुट केक या अंकल दोनो नहीं मिलेंगे.” तो पटकन त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना मिठी मारली. त्याच्या ओळखीतलं आणखी एक चेहरा आणि दुकान आता कमी झालं होतं. जात जाता त्याने हळूच एक नजर बेकरीवर टाकली. तिच्या नावाची जुनाट पाटी आता एका बाजूने लोंबकळत होती. तो पुढे चालता झाला.

‘आज काय मुहूर्त आहे का सगळ्यांचा गुडबाय बोलण्याचा, सगळेच निघून चाललेत.’ त्याच्या मनात आलेल्या विचाराने तोच थबकला. काहीतरी आठवल्याने त्याने ताबडतोब घराकडे मोर्चा वळवला. दाराशी पोहोचताच लगबगीने तो कोप-यात ठेवलेल्या फिशटॅंककडे पोहोचला. सततच्या आजारपणामुळे कृश झालेला त्याचा सोनेरी रंगाचा मासा ग्लानीत एका कोप-यात पोहत होता. एरव्ही त्याच्या पावलांच्या आवाजाने त्याला ओळखून त्याच्याकडे अक्षरशः पाण्यात दोन सुळक्या मारुन झेप घेणारा त्याचा मासा आज मात्र त्याच्या आवाजाला सुद्धा साद देईनाशी झाला. त्याचे पाण्यात लकाकणारे डोळे आता मात्र निस्तेज होऊन सुकले होते, एरव्ही त्याच्या हाताच्या इशा-यावर पाण्यात उड्या मारणारा त्याचा मासा आज मात्र नुसतं हलण्यासाठी पण प्रयत्नांची पराकष्ठा करत होता. दोघांचं जग एका काचेने विभागलं असलं तरी त्यांची मैत्री काही या काचेला जुमानली नाही. आता त्याला तसा बघत असताना त्याच्या डोळ्यांसमोरुन त्याच्यासोबतच्या आठवणींचा पट उभा राहिला.

हेही वाचा : आहारवेद: मधुमेही आणि हृदयरुग्णांसाठी वरदान – टोमॅटो

माशाने खूप प्रयत्नाने त्याच्याकडे पाहिले. जणूकाही त्याला निरोपाचं पाहून घेतलं. त्याच्या डोळ्यात तेज नसलं तरी प्रेम होतं. ते कसं काय जाणे काचेच्या या पल्याड असलेल्या माणसापर्यंत पोहोचलं होतं. जाता जाता तो काचेवर ठेवलेल्या त्याच्या हाताच्या जवळ आला आणि त्याने डोळे मिटले. तो दोन मिनिटं त्याला पाहतच बसला., त्याचं मृत शरीर टॅकच्या तळाशी जाऊन बसलं. तसा तो तिथून दूर झाला.

बाहेर वाजणारी थर्टीफस्टची गाणी आता त्याला ऐकू येईनाशी झाली. आज जुन्या वर्षाबरोबर बरंच काही मागे सरलं होतं त्याचं. काही गुडबाय अनपेक्षित होते, काही स्वतःहूनच केलेले होते, काही विरहाचे होते तर काही सुटकेचे होते. वेळ जसं बरेच काही देते तसंच माणसं, नाती, जिव्हाळा, सवय घेऊनसुद्धा जाते…जाता जाता. बाहेरच्या रोषणाईत आता त्याला नवीन वर्ष येताना दिसत होतं…

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One colleagues saying goodbye to everyone in office was going to go home as he got half day for 31 goodbye 2022 tmb 01