“मृणाल, अगं कशी आहेस? तू आल्याचं आईकडून समजलं आणि धावत भेटायला आले बघ तुला.” “मी ठीक आहे ताई.” मृणालच्या एकंदरीत आविर्भावावरून ती नाराज असल्याचं मिनलच्या, तिच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात आलं, पण नक्की काय नाराजी असावी हे तिला काढून घ्यायचं होतं.
“मोने, अगं ठीक आहे म्हणजे काय?असं कोरडं उत्तर देणार आहेस का मला? लग्न झाल्यापासून पहिल्यांदा माहेरी आलीस तू. तेथे काय काय एन्जॉय केलंस, सासरची मंडळी कशी आहेत, मनोज कसा आहे सर्व सांगशील की नाही?”
हेही वाचा- कामावरून रात्री उशिरा परत घरी जाताय? सुरक्षिततेसाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
“ताई, काय सांगू तुला? मला सगळंच असुरक्षित वाटतं गं. एकदा घटस्फोटाच्या प्रक्रियेतून गेलीय मी आणि आता हा नव्यानं संसार मांडला आहे, पण ही लोक माझ्याशी जसं वागतात त्यावरून मला येथे तरी माझा संसार होईल का? याचंच भय वाटत राहतं.” “काय होतंय, ते लोक तुझ्याशी कसं वागतात? जरा सविस्तर सांगशील का मला.”
मृणालने तिची गाऱ्हाणी सांगण्यास सुरुवात केली…“ताई, अगं,लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच सासूबाई म्हणाल्या, की किचनकडे तू बघू नकोस, मी सर्व बघून घेईन, तू नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न कर. म्हणजे त्यांना मला घरात रुळूच द्यायचं नाही. मी नोकरी करायची म्हणजे माझ्या पैशांची अपेक्षा आहे त्यांना. माझी नणंद म्हणाली, ‘मनोजला तुझी सवय लावू नकोस, सर्व त्याची काम त्यालाच करू देत’ म्हणजे काय आम्ही नवरा बायकोनं जास्त जवळ येऊच नये. मनोजचं तर काही विचारूच नकोस. सारखं काहीतरी सरप्राईज गिफ़्ट आणून मला खूष करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे काय समजायचं मी? त्याचं कुठंतरी बाहेर अफेअर तर चालू नसेल ना? म्हणजे मला खूष ठेवलं की मी त्याला काही बोलणारच नाही.”
मृणालचं सगळं ऐकून मिनलला मनातल्या मनात हसूच आलं. हिला सुख दुखतंय की काय? सगळं सुरळीत आणि चांगलं असून ती सगळ्या गोष्टी नकारात्मकतेने बघते आहे.
हेही वाचा- Valentines day चॉइस तर आपलाच : कसे करून घ्याल जोडिदाराकडून लाड?
अर्थात मीनल असा विचार का करते या मागचाही इतिहास आहे. मिनलला तिच्या पहिल्या लग्नात खूप त्रास झाला होता. तिच्या सासरचे लोक सतत माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत होते. एकत्र कुटुंबात सासू आणि नणंद यांचा हेकेखोरपणा, मनमानी यामुळे ती पिचून गेली होती. पदवीपर्यंत मेरिटमध्ये आलेल्या मुलीचा आत्मविश्वास हरवला होता. नवराही व्यसनी आणि बाहेरख्याली होता. संसार वाचवायचा म्हणून तिनं खूप गोष्टी सहन केल्या होत्या, पण जेव्हा घरात मारहाण झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला माहेरी आणलं आणि पुन्हा कधी पाठवलंच नाही. घटस्फोट देण्यासही त्यानं खूप त्रास दिला. दागिने वस्तू आणि पोटगी या कोणत्याही गोष्टींची मागणी नसेल तर त्याची घटस्फोटाची तयारी होती. मुलीची सुटका करून घेणं गरजेचं असल्याने सर्व गोष्टीवर पाणी सोडून बाबांनी तिला घटस्फोट घेण्यास सांगितले. या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी वर्ष गेलं.
त्यानंतर मृणालसाठी मनोजचं स्थळ आलं. तो नाममात्र घटस्फोटीत होता. त्याच्या पत्नीचे लग्न तिच्या मनाविरुद्ध झाल्यानं ती चार दिवसांतच घरातून निघून गेली होती. एकंदरीत स्थळ चांगलं वाटल्यानं बाबांनी मृणालचं मनोजशी नोंदणी पद्धतीनं लग्न करून दिलं. लग्न झालं असलं तरीही मृणालच्या मनातून पहिले कटू अनुभव जात नव्हते. तिला आता समजावून सांगणं गरजेचं आहे हे मिनलच्या लक्षात आलं.
हेही वाचा- नातेसंबंध: पोटची मुलगी परक्याचं धन कसं?
“मृणाल, तू नव्यानं आयुष्य सुरू करायचं ठरवलंस ना? मग मागची पाटी कोरी करायला हवीस. तुझ्या मोबाईलमध्ये स्पेस हवी असेल तर तू नको असलेला डेटा डिलिट करतेस ना, तेव्हाच तुला नवीन मेमरी साठवता येते अगदी तस्सच मागच्या कटू गोष्टीना मनातून हद्दपार कर. माझ्या आयुष्यात पुन्हा अडचणी येतील का? हा विचार तुझ्या मनात येतो आणि तू सगळ्याच गोष्टींचा वाईट अर्थ काढत राहतेस. सगळ्यांत महत्वाचं म्हणजे तुलना करणं बंद कर तुझ्या पूर्वायुष्याचं सावट तुझ्या वर्तमानावर येऊ देऊ नकोस. वर्तमानात जगायला शिक आणि प्रवाहाबरोबर पुढं चालायला शिक. सासूबाई तुला किचनमध्ये अडकू नकोस म्हणतात, ही किती चांगली गोष्ट आहे. तुझं थांबलेलं करिअर तुला पुन्हा नव्यानं सुरू करता येईल. तू केवळ नवऱ्याचं करण्यात गुंतून राहू नकोस, तुलाही तुझं आयुष्य आहे हे सांगणारी नणंद तुला मिळाली आहे आणि तुला खूष ठेवणारा नवराही मिळाला आहे आता या नवीन नात्यांचा मनापासून स्वीकार कर. खूष रहा आनंदी रहा. भलते सलते विचार करून स्वतःचे मानसिक स्वास्थ्य आणि नाती गमावू नकोस.”
काहीवेळ मृणाल स्वतःच्याच विचारात होती, काही वेळानंतर ती मिनलला म्हणाली, “हो ताई, तुझं पटतंय मला, मागच्या विचारांमुळे मी चालू असलेला आनंदही घेऊ शकत नव्हते, पण मी पुढं जाण्याचा प्रयत्न करेन आणि नव्याने आयुष्य सुरू करेन.”
“माझी मोनी आहेच समंजस, चल आता तुझे आणि मनोजचे फोटो दाखव आणि तुमच्या ट्रिप मधील गमती जमती सांग मला.” आणि मग दोघी बहिणी आपल्या जुन्या गोष्टीत रमल्या.
(smitajoshi606@gmail.com)