गीता प्रसाद
तिने त्याला ‘नाही’ म्हटलं आणि त्याने तिला आपल्याच हातानं थेट ठारच केलं. नुकतीच घडलेली ही आणखी एक घटना. का होतंय असं? आणि किती दिवस चालणार असं? हे प्रश्नही आता बोथट झाले आहेत, इतक्या अशा प्रकारच्या घटना वाढत चालल्या आहेत. मात्र, एक प्रश्न अनुत्तरितच राहाणार आहे, की आपल्याच प्रेमाला आपल्याच हाताने ठार मारण्याइतपत तिरस्कार येतो कुठून?
कल्याणमधल्या तिसगावची ही घटना तर अगदी ताजी. बुधवार- १६ ऑगस्टची. ‘लोकसत्ता’मध्येच प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, रात्री ८ वाजता आईसह घरी परतणाऱ्या या अल्पवयीन मुलीवर २० वर्षांच्या मुलाने चाकूचे इतके सपासप वार केले, की ती जागेवरच कोसळली. त्या मुलीच्या आईने आरडाओरड केल्यामुळे लोकांनी त्याला पकडलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं; पण ती वाचू शकली नाही. कुणा एकाच्या एकतर्फी ‘प्रेमा’ला तिने ‘नाही’ म्हटलं आणि त्याची तिला जबरदस्त किंमत मोजावी लागली. ‘जिवापाड प्रेम होतं माझं तिच्यावर’- असाच दावा असेल ना त्याचा? त्या प्रेमाचा जीव घेण्याइतपत त्याच्या संतापाचा कडेलोट झाला?…
हेही वाचा… अधिकमास का जावयांचे चोचले मास?
काय झालं असेल नेमकं?… सूत्रांनुसार, गेला आठवडाभर तो तिच्या मागे मागे होता. त्याने दोनदा मागणीही घातली होती; पण तिने नकार दिला. तो नकार त्याला स्वीकारता आला नसणारच. मला ‘नाही’ म्हणते म्हणजे काय? त्याचा अहंकार आडवा आला असेल का? विशीत इतका अहंकार असतो माणसामध्ये, जो आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला संपवून टाकेल? बुधवारी म्हणे, तो तिच्या इमारतीच्या आसपासच फिरत होता. तिच्या यायच्या वेळी जिन्यातच लपून बसला आणि जशी ती आपल्या आईसह आत शिरली, त्याने संतापाच्या भरात आईला ढकललं आणि त्याच त्वेषाने तिच्यावर सपासप ८ वेळा चाकूचे वार केले. १२ वर्षांची ती कोवळी मुलगी तिथेच ठार झाली असणार, आधी मनाने आणि मग देहाने!
अहंकार, संताप, तिरस्कार, द्वेष… काय काय भरलं होतं त्याच्यामध्ये त्या वेळी? आणि का? एका मुलीने नकार दिला म्हणून? काही काळाने त्या नकाराची जखम भरलीच नसती? खरं प्रेम असतं तर, तिच्याऐवजी दुसऱ्या मुलीने ‘हो’ म्हटलंच नसतं? की ‘हीच हवी’च्या अतिरेकाने तिच्याबरोबर स्वत:लाही संपवणं त्याला गैर वाटलं नाही? आपल्या एका कृतीमुळे तिच्याबरोबर आपलं भविष्य, पूर्ण आयुष्यच पणाला लागू शकतं, याचं भानच राहिलं नाही?
अलीकडे अशा घटना वारंवार दिसू लागल्या आहेत. दिल्लीत एका तरुणाने १७ वर्षांच्या तरुणीवर ४० वार करून ठार मारलं होतं, तर अंधेरीत लग्न मोडल्याचा राग येऊन एका तरुणाने १७ वर्षांच्या मुलीवर चाकूहल्ला केला. पुण्यातली मुलानं मुलीवर कोयत्यानं हल्ला करण्याची घटना तशी ताजीच आहे. बीडमध्येही ‘ती माझ्याशी का बोलत नाही?’ या कारणावरून अल्पवयीन मुलीवरच मुलानं भररस्त्यात तलवारीने वार केले होते, तीही घटना गाजली होती. या घटना कशाचं लक्षण आहे? आपणच प्रेम करत असणाऱ्या व्यक्तीला ठार करणारी ही हिंसा येते कुठून? की प्रेम वगैरे काहीच नसतं, असतं ते फक्त आणि फक्त आकर्षण?…
हेही वाचा… ग्राहकराणी: हॉटेलमधल्या वॉशरुमचा नि:शुल्क वापर
आणखीही मुद्दा विचार करण्यासारखा – ही घटना बुधवारी घडली असली तरी त्याच्या किती तरी दिवस, कदाचित महिने, आधीपासून त्याला तिचं आकर्षण असणार. ते तो कुणाशीच बोलू शकत नव्हता? कुटुंबीय, नातेवाईक, जवळचे मित्र, कुणीच नाही? ती नाही म्हणत होती, तेव्हा त्याच्या रागाला, संतापाला आवर घालणारं, समजूत काढणारं कुणीच नव्हतं? की त्याच्याशी बोलण्यासारखी परिस्थितीच नव्हती? की नुसताच आत्मकेंद्रीपणा, सगळ्यांचाच? पण या सगळ्यांत एका मुलीचा नाहक बळी गेलाय; एका मुलीचं, तिच्या कुटुंबीयांचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे.
त्याचा संताप शांत झाला असेलच एव्हाना; पण केलेल्या कृत्याचा अर्थ त्याला आता तरी लागला असेल का?…
lokwomen.online@gmail.com