-स्वप्निल घंगाळे
ठाण्यामध्ये एका शाळकरी मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न रिक्षावाल्याने केला. रिक्षावाल्यांकडून ठाण्यात घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी हार्ट ऑफ द सिटी म्हणावं अशा विवियाना मॉलसमोरही एका मुलीने भितीने धावत्या रिक्षातून उडी मारली होती. मुळात रिक्षावाले (सर्व नाही पण अनेक) मुजोर असतात याबद्दल प्रवाशांचं दुमत नाही. पण हे असले प्रकार मुंबईचं जोडशहर असणाऱ्या ठाण्यात घडत असतील तर हा विषय चिंता वाढवणारा आहे. याच पार्श्वभूमीवर मुलीची छेड काढणाऱ्या या रिक्षावाल्याला लिहिलेलं पत्र…
प्रिय…नाही पत्राचा विषय पाहिला तर प्रिय लिहिण्याची आवश्यकता नाही असं वाटतं. म्हणून ‘छेड काढणारे काका’ अशीच सुरुवात करतो. तशी रिक्षावाल्यांबद्दल वाटणारी चीड काही नवीन नाही काका. पण रोज नाही ऐकणं आणि कधीतरी एकदम तुम्ही आमच्या अब्रूलाच हात घालणं या दोन्ही फार वेगळ्या गोष्टी असल्याने हा पत्रप्रपंच…
मुंबई असो ठाणे असो किंवा मुंबईच्या आजूबाजूची उपनगरे असोत, या साऱ्यांचा म्हणजे एमएमआर रीजनचा परिसर तसा देशातील सर्वात विकसित शहरांपैकी एक आहे असं म्हणू शकतो. त्यामुळेच इथं वावरताना किमान इथल्या स्थानिक मुलींना तरी फारसा विचार करावा लागत नाही. घरात वावरताना कसं आपण कन्फर्ट झोनमध्ये असतो तसा हा प्रकार. पण तुमच्यासारखे लोक या कम्फर्टला गालबोट लावतात ओ. म्हणजे दिल्ली, नोएडासारख्या शहरांमध्ये रात्री पुरुषही एकटे प्रवास करु शकत नाही असं ऐकलं आहे मी. मात्र असा प्रकार आपल्या महाराष्ट्रात त्यातही जवळजवळ २४ पैकी २२ तास जागणाऱ्या शहरांमध्ये होणार नाही याची खात्री वाटते. मात्र ठाण्यात जो प्रकार घडला तो हा असा विश्वास म्हणजे फाजील आत्मविश्वास वगैरे आहे की काय असा विचार करण्यासाठी भाग पाडतो.
कसंय ना काका थोड बोल्डपणे बोलायचं झालं तर तुमच्यासारख्यांच्या भावना एका शाळकरी मुलीला पाहून कशा उचंबळून येतात कळतच नाही. म्हणजे तुमच्या ओळखीतल्या प्रत्येक स्त्रीकडे आहे तेच त्या मुलीकडे आहे. म्हणजे स्तन असो किंवा रूप असो. खरं तर तुमच्यासारखे लोक या दोन गोष्टींमुळेच विचलित होतात म्हणून त्यांचा थेट उल्लेख केला. स्तन आणि रुप या गोष्टी प्रत्येक स्त्रीकडे असतात फरक फक्त आकाराचा आणि पाहणाऱ्याच्या नजरेचा असतो. तुमच्यासारख्या हापापलेल्या लोकांच्या नजरेतच खोट असते. तुमच्यासारखे पुरूष स्वतःच्या इच्छांवर आणि अवयवावर ताबा न ठेऊ शकल्याने काल परवा पौंगंडावस्थेत आलेल्या त्या मुलीच्या मनावर जे आघात झालेत ते कदाचित ती आयुष्यभर सोबत घेऊन जगेल. पण त्याहून वाईट गोष्ट म्हणजे यासाठी ती साऱ्या पुरुष जातीला दोषी ठरवेल. खरं तर तुमच्यासारख्यांना तुडवलं पाहिजे वगैरे बोलूनही कंटाळा आलाय. आता थेट अॅक्शनची वेळ आलीय असं दर घटनेनंतर फार प्रकर्षाने वाटतं. पण जमावाची बुद्धी ही फार अल्पकाळ असते. त्यामुळे घटनेला २४ तास वगैरे झाले की आम्ही ते विसरतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या घटना इतक्या सतत घडतात की त्याचा राग यायचंही कमी होऊ लागलंय की काय कळत नाही.
मुळात स्त्रीला वाटणारं आकर्षण हे मानसिक स्वरुपाचं अधिक असतं तर पुरुषाला वाटणारं आकर्षण हे दिसण्यावर अधिक अवलंबून असतं अशी त्यांची जडणघडण असते असं मानशास्त्रात म्हटलं जातं. मात्र याच शास्त्रांपैकी अनेक शास्त्रांमध्ये सामाजिक मर्यादांचं भान असावं, समाजाचं चक्र सुरळीत चालण्यासाठी आपण त्या समाजाचा भाग म्हणून कसं वागावं यासंदर्भातील बऱ्याच गोष्टी येतात. पण एकदा का वासनेच्या मिठीने विचारांचा गळा दाबला की त्यातून जन्माला येणारा हा क्रूर प्रवृत्तीचा राक्षस काय करेल आणि काय नाही हे सांगता येत नाही.
कसंय ना काका तुमच्यासारख्या वासनांध लोकांमुळे मुंबईबरोबरच आजूबाजूच्या शहरांच्या सुरक्षित शहर या नावावर डाग लागत असतील पण तशी अद्याप परिस्थिती बरी आहे मुंबई आणि एमएमआर रिजनची. मात्र हे असले अधून मधून घडणारे प्रकार मुलींबरोबरच त्यांना समर्थन देणाऱ्या आणि त्यांच्या पाठिशी उभ्या राहणाऱ्यांचा विश्वासही थोडा डळमळीत करतात. आपल्या शहरात असं होणारच नाही असा जो काही विश्वास असतो ना तो काचेला तडा जावा तसा कधीही न दुरुस्त होण्यासारखा तडकतो.
तुमच्यासारखा भावनेच्या भरात वाहत गेलेला आरोपी पकडला, त्याच्या न्यायलयीन फेऱ्या वगैरे झाल्या तर ठीकच पण या साऱ्यात त्या मुलीचा, तिच्या ओळखीतल्या लोकांचा आणि एकंदरित समाज म्हणून आपला पुढे कोणीच काहीच विचार करताना दिसत नाही. आज अमुक अमुक असा वागला उद्या तमुक तमुक तसा वागेल. ही प्रवृत्ती कशी संपवता येईल याचा विचार केवळ पोलिसिंग वाढवून, गस्त वाढवून करता येणार नाही. यावर काहीतरी ठोस मार्ग काढला तरच हे असे विश्वास डळमळीत करणारे प्रकार थांबू शकतील.
अगदी चॅनेलच्या भाषेतील नराधम वगैरे तुम्हाला उपमा लावणार नाही पण तुमच्यासारखे लोक हे वाईट विचारांचे असल्याने त्यांचं मीटर योग्य वेळी डाऊन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण तसं झालं नाही तर तुमची मुजोरी अजून वाढेल आणि ती थेट आया-बहिणींच्या इज्जतीपर्यंत येईल.
संपर्क – lokwomen.online@gmail.com