मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. “आम्ही घरंदाज बायका, १३व्या वर्षी तसल्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या महिलेबद्दल काय बोलणार?”, असं त्या म्हणाल्या होत्या. त्याबद्दल किशोरी पेडणेकरांना माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हे खुलं पत्र लिहीत आहे.
माननीय किशोरी पेडणेकर,
पत्र लिहिण्यास कारण की…
माननीय किशोरी पेडणेकर, एक महिला आणि मुंबईकर म्हणून मी तुमचा आदर करते. नवनीत राणांची बाजू घेण्याचा किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्याला पाठिंबा देण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. हे पत्र मी तुम्हाला एका स्त्रीबद्दल तुम्ही केलेल्या वक्तव्यावरून सामान्य मुलीच्या मनातील भावना म्हणून लिहीत आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल तुम्ही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “आम्ही घरंदाज बायका, १३ व्या वर्षी ‘तसल्या’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या महिलेबद्दल काय बोलणार?”, असं तुम्ही म्हणाला होतात. राजकारणात सगळेच एकमेकांवर टीका करतात. पण, एका महिलेबद्दल दुसऱ्या स्त्रीने केलेलं हे वक्तव्य कितपत योग्य आहे?
राजकारण हा समाजाचा आरसा असतो, असं म्हणतात. पण मग राजकारणातील स्त्रियाच एकमेकींना कमी लेखत असतील, तर समाजातील इतर घटकांकडूनही स्त्रियांना तशीच वागणूक मिळेल, असं तुम्हाला वाटत नाही का? आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी त्यांच्या कर्तृत्वाने वेगळी उंची गाठली आहे. कित्येक स्त्रिया स्वत:च्या पायावर उभ्या असून घराचा डोलारा सांभाळत आहेत. अशा वेळी महिलांनीच समाजातील इतर स्त्रियांना बळ देण्याची गरज असताना मात्र अशी वक्तव्य केली जात आहेत.
आम्ही घरंदाज बायका…असंदेखील तुम्ही म्हणाला होतात. एखाद्या महिलेवर ती घरंदाज आहे की नाही हा टॅग कोणत्या निष्कर्षातून लावला जातो? मुळात एखादी बाई सभ्य, सुशील आहे आणि दुसरी नाही, हे ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही. एका स्त्रीलाच समाजातील दुसऱ्या महिलेकडून मानसन्मान मिळत नसेल, तर देशाला स्वातंत्र्य मिळूनही ७५ वर्षांनंतर आपण त्याच बुरसटलेल्या विचारात समाजाची जडणघडण करत आहोत, असं मला वाटतं.
किशोरी पेडणेकर, तुम्ही मुंबईचं महापौरपद भुषविलेलं आहे. राजकारणात तुमचा सक्रिय वावर असण्याबरोबरच तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातही कार्यरत होतात. समाजातील अनेक क्षेत्रातील व्यक्तींशी तुमचा जवळचा संपर्क येत असतो. एवढंच नाही तर एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाज तुमच्याकडे पाहतो. तरुण पिढीतील युवक-युवती तुमचं अनुकरण करतात. तुमचे विचार, तुमच्या वक्तव्यांकडे आदर्शाने पाहिलं जातं. त्यामुळे एखाद्या महिलेबद्दल बोलताना आपण काही चुकीचं बोलतं नाही, याचा समाजातील प्रत्येक व्यक्तीनेच गांभीर्याने विचार केला पाहिजे.
जाता जाता इतकंच म्हणेन, एका स्त्रीनेच दुसऱ्या महिलेचा आदर केला नाही तर समाज कसा करेल?