संदीप चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घराबाहेरील जागेत आपण विविध प्रकारे वाफे करू शकतो. मात्र, आपल्याकडे ओपन टेरेसप्रमाणे जागा असेल व तेथे फुलझाडे व भाजीपाला यांची लागवड करायची असेल तर अशा जागेवर लांबचलांब वाफे करण्याची संधी असते. येथे जागेचा कल्पकतेने वापर करून गोलाकार, चौकोनी, आयताकृती, त्रिकोणी, षट्कोनी अशा आकारांचे वाफे करता येतात.

वाफ्यांमध्ये निव्वळ माती भरण्यापेक्षा, अधिकाधिक पालापाचोळ्याचा वापर करावा म्हणजे दीर्घकाळ त्याचा परतावा मिळवता येतो. टाकाऊतून टिकाऊ ही आपली संस्कृती आहे तर परदेशात पर्यावरणीय हितासाठी ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ ही चळवळ राबवली जाते. आपल्याकडे टाकाऊ बॅनर असतील किंवा प्लॅस्टिकचे टिकाऊ कापड असल्यास त्यापासूनही जमीन किंवा टेरेसपासून ५ इंच उंचीवर वाफे तयार करता येतात. उपयोगाचे नसलेले बांबू, लाकडे यांचे मचाण करून किंवा त्याच्या चारही टोकांना कापड बांधून परसट भांडय़ासारखा किंवा झोळीसारखा वाफा तयार करता येतो. यात पाण्याचा निचरा होण्यासाठी कापडाला भोकं पाडून घ्यावीत. फक्त काळजी घ्यावी-कारण टाकाऊ बॅनर, प्लॅस्टिक कापड हे उन्हात अधिक काळ राहिल्यास त्यास चिरे जाऊन फाटण्याची शक्यता असते. बाकी हा प्रकार अगदी सोपा, टिकाऊ व कल्पकतेला वाव देणारा आहे. दोन झाडांच्या मध्ये किंवा दोन खांब, पोल, अँगलच्या मध्येही हा झोळी प्रकार साकारता येतो. झाडांची पाने ही दाटीवाटीने वाढून सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात त्यामुळे कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त वापर करणे हे शहरी शेतीचे लक्ष्य सहज साध्य करता येते. व्हर्टकिल पद्धतीनेही या वाफ्यांची रचना करता येते.

पिशव्यांचाही वापर करा

आपल्याकडे जमा होणाऱ्या अनेक पिशव्या झाडे- लावण्यास उपयुक्त ठरू शकतात. जसे की आपण पाश्चराइज्ड दूध घेतो. या दुधाच्या पिशव्या अगदी- पाव लिटर ते अर्धा लिटरच्या का असेना उपयुक्त असतात. या पिशव्यांच्या मदतीने आपल्याला छोटी रोपवाटिका तयार करता येतेच शिवाय दीड ते दोन महिने रोप त्यात तग धरू शकते. तसेच तेला-तुपाच्या पिशव्यांमध्ये मोहरी, पुदीना, व भुईमुगांच्या शेंगाही घेता येतात. यांचा आकार लहान असल्यामुळे कुठेही मांडणी करता येते. या पिशव्या टिकतात व सहज उपलब्ध होतात. आपण आरंभकर्ते असाल व कमी खर्चात बाग फुलवायची तर अशा पर्यायापासून सुरुवात करायला हरकत नाही.

sandeepkchavan79@gmail.com