ऑर्किडची फुलं बघितली की हरखून जायला होतंच. त्यांची ती रूंद, जाडसर हिरवी पानं, नाजूक फुलांनी लगडलेले कडक, पण मजबूत दांडे आणि प्रत्येक फुलातील ती वेगळी पाकळी. ती इवलाली भुईआमरीची फुलं म्हणजे जणू पसरलेला चांदण चुराच होता. त्या शांत स्निग्ध वातावरणात मी एक एक गोष्ट निरखत पुढे सरकत होते. झाडांच्या रूंद खोडावर उमललेली एपिफायटिक आणि सेमीटेरेस्ट्रिअल ऑर्किड्स, त्यांना आलेली ती नाजूक रंगतदार फुलं, म्हणजे अफाट निसर्ग वैभव होतं.
कूच बिहारचा राजवाडा पाहायला जायचं म्हणून खरं तर निघालेलो होतो. नीट माहिती न मिळाल्याने फिरत फिरत शेवटी एका होम स्टे मधे पोहोचलो. आताच्या दिवसांत त्याला होम स्टे, ॲग्रो टुरिझम असं आपण सहजी म्हणतो, पण त्यावेळी या अशा संकल्पना क्वचित ऐकायला यायच्या.
भूतानला निघालेलो आम्ही कूच बिहारच्या नादात असे मधेच अडकलो होतो. ड्रायव्हरने त्याच्या अगाध हिंदीत आणि गोल गोल बंगालीत या होम स्टेमध्ये आणून सोडलं. हे एक सुंदर नीटनेटकं घर होतं. अगदी साधं, पण प्रशस्त असं. तळमजल्यावर चार खोल्या, बाहेर झोपाळा, आत डायनिंग टेबल आणि भोवती सुरेख बाग… पहिल्या मजल्यावर टिपिकल बंगाली स्वयंपाकघर. सगळ्यात वरच्या मजल्यावर दोनच खोल्या आणि मोठा व्हरांडा. आमची या दोन खोल्यांत राहायची सोय झालेली.
दिवसभराच्या पायपिटीने आणि ठरवलेलं ठिकाण बघायला न मिळाल्याने आधीच प्रचंड चिडचिड झालेली, त्यामुळे फारसा उत्साह न दाखवता थातूरमातूर जेऊन घेतलं. कुठे आलोय, इथून भूतानला कसं जायचं याचा पत्ता नव्हताच. सकाळी बघू असा एक दिलासा मनाला देत झोपलो.
पण सकाळ उजाडली तीच मुळी एक सुंदर हिरवं स्वप्न घेऊन. व्हरांड्यातून दूरवर दिसणारं अनाघ्रात जंगल. पक्ष्यांचे आवाज, मनोहारी सूर्योदय. सगळंच वेगळं, पण प्रसन्न होतं. चहा घेण्याच्या निमित्ताने मी स्वयंपाकघरात डोकावले. निगुतीने भाज्या धुणं, चिरणं चालू होतं. कंदभाजी, शेंग भाजी, पालेभाज्या यांनी ते स्वयंपाकघर चक्क बागेसारखं हिरवगार झालं होतं.
चहा-नाश्ता आणि सोबत मिष्टीदोही अशी ती सुंदर सकाळ सुरू झाली.
गंमत तर त्यापुढेच होती. ड्रायव्हरच वाटाड्या झाला होता. त्याने घराबाहेरच्याच रस्त्याने संतोला गार्डन पाहू या म्हणत आम्हाला एका सुरेख हिरव्यागार प्रदेशात आणलं. संतोला म्हणजे संत्री. पण संत्र्याच्या बागा न दिसता आम्ही पोहोचलो होतो ते एका सुरेख दाट जंगलात. खळखळ वाहणारा पाण्याचा प्रवाह, उंच वाढलेली झाडं, नीरव शांतता.
वर मोठ्या वृक्षांच्या फांद्यांमुळे दाटलेली थंड सावली, वृक्षांच्या आधाराने वाढणाऱ्या वेली आणि पायाशी पसरलेले दाट गवत. भोवती मोठ्या खडकांच्या आधारे बेचक्यात भुई आमरी म्हणजे terrestrial किंवा ground Orchids ची छोटी छोटी फुलं उमलली होती. एरवी कास पठारावर विशिष्ट वेळी फुलणारी ही आमरी बघायला मी कोण धडपडत असते, पण आज हे वैभव अगदी अचानकपणे समोर आलं होतं.
मुळात ऑर्किड बघितली की हरखून जायला होतंच. त्यांची ती रूंद, जाडसर हिरवी पानं, नाजूक फुलांनी लगडलेले कडक, पण मजबूत दांडे आणि प्रत्येक फुलातील ती वेगळी पाकळी. ती इवलाली भुईआमरीची फुलं म्हणजे जणू पसरलेला चांदण चुराच होता. त्या शांत स्निग्ध वातावरणात मी एक एक गोष्ट निरखत पुढे सरकत होते. झाडांच्या रूंद खोडावर उमललेली एपिफायटिक आणि सेमीटेरेस्ट्रिअल ऑर्किड्स, त्यांना आलेली ती नाजूक रंगतदार फुलं, म्हणजे अफाट निसर्ग वैभव होतं. असं काही इतकं अचानक बघायला मिळेल अशी कल्पनाही केली नव्हती. ऑर्किडच्या अनेक जाती इथे सहज दृष्टीस पडत होत्या, त्याही मुद्दाम वाढवलेल्या नव्हेत तर अगदी नैसर्गिक अधिवासात वाढलेल्या. खूप दूरपर्यंत चालून गेल्यावर जंगल थोडं विरळ झालं. आता एखादं दोन घरं दिसत होती.त्यात एका टूमदार बैठ्या घरात आम्ही शिरलो इथे होत्या ऑर्किड्स च्या विविध जाती,ज्या अगदी काळजीपूर्वक जोपासलेल्या होत्या.
सलामीला सीतेची वेणी पाहून तर हरखूनच गेले.
आधी जंगलातील नैसर्गिक खजिना निरखला होता आता मानवनिर्मित कौतुक अनुभवत होते. ऑर्किड वनस्पती मला अनेक अंगाने, अनेक प्रकाराने सुखावत होती. आतापर्यंत तुम्हालाही प्रश्न पडला असेल न की हे एवढं सगळं जिच्याबद्दल मी सांगतेय ती वनस्पती नक्की कोणती आणि तिचा उपयोग काय?
तर अगदी थोडक्यात सांगायचं तर घरात उन येत नसेल, फारसा सूर्य प्रकाश नसेल, मोठी जागाही उपलब्ध नसेल आणि रोज पाणी घालायला जमणार नसेल, पण झाडांची आवड मात्र आहे अशांनी अगदी बिनधास्त आर्किडस् लावावीत.
फारशी काळजी न घेता वाढणारी ही यक्षपुष्पे तुमच्या घरातील बाग बहराला आणतील. अर्थात पुढच्या लेखात या यक्षपुष्पाबद्दल आपण अधिक माहिती घेऊचं.
mythreye.kelkar@gmail.com