गेले दोन आठवडे गाजणारी, सोसायटीतल्या महिला मंडळ आणि मुलांची ‘बीचवर ट्रिप’ आज प्रत्यक्षात आली होती. कोणी वाळूत खेळत, लोळत होते, कोणी बोटिंग राईड्स घेत होते, बीच, शॅक आणि फूड स्टॉल यांच्या मध्ये काही जणांचं शंटिंग सुरू होतं, धमाल मजा होती.

आसावरी आणि तिच्या अकरावीतल्या स्वरानेही बऱ्याच राईड केल्या. स्वराची सगळीकडे पळापळही चालू होती. खिशात ठेवलेले पैसे उडवल्यावर लांबवरच्या क्लोकरूमपर्यन्त चालत जाऊन आसावरी लॉकरमधल्या पर्समधून पॅरासेलिंगसाठी पैसे घेऊन आली. ते तिचं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं. मात्र आज प्रत्यक्ष संधी मिळाल्यावर तिला भीती वाटली. शिवाय, ‘चांगलंच महाग आहे पॅरासेलिंग’ असं कुणीतरी कानात कुजबुजलं होतंच.

“आई, आयुष्यात एखादं स्वप्न पूर्ण होतं असेल, तर महागबिहाग असला विचार करायचा नाही.” आईची चलबिचल नेमकी ओळखून स्वरा म्हणाली.

“अगं, भीती वाटतेय. समुद्रात पडलो बिडलो तर? एवढं चांगलं पोहता येत नाही मला.”

“कमॉन आई. आपण दोघी करतोय. मी वाचवेन तुला. अशी म्हातारीसारखी वागणार असशील तर मी पुन्हा तुझ्याबरोबर कुठेच येणार नाही. असल्या भित्र्या आईला मी ओळखतच नाही,” स्वरा भडकलीच.

आसावरीला पटलं. खाली अथांग समुद्र आणि निळ्या आकाशात तरंगण्याचा तो अनुभव विलक्षण होता. त्यासाठी जबरदस्ती केल्याबद्दल तिला स्वराचं कौतुकही वाटलं उडताना. बोटीतून किनाऱ्यावर पाय ठेवल्यावर मात्र आसावरीला एकदम थकवा जाणवला. हात पायही गळून गेले होते.

हेही वाचा… जगातल्या जवळपास ४ कोटी स्त्रियांना दीर्घकालीन आजार; ‘लॅन्सेंट’चा अहवाल

स्वरा मात्र उत्साहाने नुसती सळसळत होती. ती अशीही ‘सागरवेडी’, आज पाण्याचा स्पर्श सोडवतच नव्हता. “आई, मला पुन्हा एकदा ‘जेट-स्की’ करायचीय, लास्ट. मी रांगेत जाते. माझ्याकडचे पैसे संपलेत. तू क्लोकरूम मधून मोबाइल किंवा पैसे काढून आण ना.” स्वरा असं म्हणाल्यावर मात्र, आसावरी भडकली. “पुन्हा पैसे? मी दमलेय, अंग जड झालंय, चालताही येत नाहीये आणि तू मलाच पळव पुन्हा. तू जा ना. किती आळशीपणा. बेजबाबदार.” आईच्या अचानक भडक्याकडे स्वरा नवलाने बघत राहिली. मग तिची अवस्था समजून घेऊन हळुवारपणे म्हणाली, “आई, चिडू नकोस ना, किती मज्जा आलीय आज. मी रांगेत थांबले तर राईडला लवकर नंबर लागेल. तोपर्यंत तू पैसे घेऊन परत येशील, तुझ्या पर्समधले पैसे तूच आणलेले बरे ना? घरी आळशीपणा करत असले तरी इथे मी किती हेलपाटे घातलेत, बसमध्ये राहिलेल्या वस्तू, खाण्याच्या ऑर्डर ग्रुपमधल्या आँटी लोकांना आणून दिल्यात, तू पाहिलंयस. तुला जेवायला उशीर झाल्यावर त्रास होतो म्हणून घाई करतेय.” स्वरा खरं सांगत होती. तिची धावपळ आठवून आसावरीचा राग गेला. ‘‘ठीके” म्हणत ती क्लोकरूमकडे निघाली.

‘पॅरासेलिंगच्या इतक्या भारी अनुभवानंतर, स्वराचं कौतुक वाटत असताना, अचानक तिच्यावर इतके कशामुळे चिडलो आपण?’ आसावरी विचार करायला लागली.

‘पॅरासेलिंगचा नकळत ताण आला होता. तो उतरल्यावर शरीर ढेपाळलं. ‘आता पुरे’ म्हणत होतं. त्यामुळे रेतीतून क्लोकरूम पर्यन्त चालायच्या कल्पनेनेच नकोसं झालं. त्यात जेट-स्की साठी स्वरा पुनः पैसे उडवणार म्हटल्यावर ‘उधळी कुठली’ असं कोणीतरी कानात म्हणालंच आपल्या. मी एवढी ढेपाळले असताना ही पळायला लावतेय म्हटल्यावर आळशी, दुसऱ्याचा विचार नाही, स्वत:ला हवं तेच करणार, बेजबाबदार’ ही स्वरावरची घरातली नेहमीची लेबलं कानात जोरजोराने ओरडायला लागली.

घरात थोडा आळशीपणा करत असली, तरी इथे स्वरा अत्यंत जबाबदारीने वागतेय, राईडवाल्यांसोबत ग्रुपचं डील करून तिनं सर्वांना कन्सेशन मिळवून दिलंय. आपल्याला दम देऊन पॅरासेलिंगचं आपलं स्वप्न तिनंच पूर्ण करायला लावलंय. आईचं जेवण आणि स्वत:च्या आवडीची लास्ट राईड दोन्ही वेळात जमवायला बघतेय. आपण मात्र, जरासं चालावं लागणारे म्हटल्याबरोबर पोरीची सगळी जबाबदार धडपड क्षणात विसरून, घरातल्या सवयीच्या लेबलांना जवळ करण्याचा चॉइस केला. वर ‘तू तुझ्या मनाप्रमाणेच करणार’ असा आरोपही स्वरावरच.. ’ आसावरीला आपराधीच वाटलं.

‘जेट स्की’ करून परतलेल्या स्वराकडे कौतुकाने पहात आसावरी ‘सॉरी’ म्हणणार तेवढ्यात तिच्या गळ्यात प्रेमाने हात टाकत स्वराच म्हणाली, “थँक यू फॉर धिस लास्ट राईड ममा, मज्जा आली.”