अरेच्चा! हा तर मोह, शास्त्रीय भाषेत मधुका इंडिका. ओळख पटल्यावर अनेक नावं झरझर समोर येत गेली. हा इथे आहे, आपल्या इतका जवळ आणि एवढ्या दिवसांत आपल्याला जाणवला बरा नाही. खरं तर इथे राहायला येऊन आता दोन वर्ष होतील, पण या एवढ्या कालावधीत यांचं असणं कधी अधोरेखितच झालं नव्हतं. आज या कळ्यांनी गंधात्मक आमंत्रण पाठवून मला बोलावून घेतलं होतं. भराभर फुलं गोळा केली. ओंजळीत घेऊन दीर्घ श्वास घेतला. माझा आवडता मोह मला अवचित गवसला होता.
भल्या पहाटे सायकल चालवायला जाणं मला खूप आवडतं. एकतर सगळं जग झोपेच्या दुलईत लपेटून असतं, हवी हवीशी शांतता पसरलेली असते, जोडीला पहाटवाऱ्याचा स्निग्ध स्पर्श असतो. अशा प्रसन्न वातावरणात निवांत सायकल चालवण्यासारखं सुख नाही. यावेळी निसर्गाचा अनुभव घेण्यातली मजा काही वेगळीच. एरवी गजबजाटात समोर दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्या मनापर्यंत पोहोचत नाहीत. या निरव शांततेत एखादी छोटीशी गोष्टही सहज लक्ष वेधून घेते.
आजही काहीसं असंच झालं. सायकल घेऊन मी सोसायटीच्या आवारात शिरणार एवढ्यात एक चिरपरिचितसा वास आला.
भूतानाला जाताना चहाच्या मळ्यातून केलेला रेल्वेचा एक सुरेख प्रवास गाठीशी होता. हातात लेमन टीचा कप, सभोवती पसरलेले चहाचे मळे आणि त्यातून वळणं घेत जाणारी आमची गाडी असा सगळा तो अनुभव.
मऊ भात शिजवल्या सारखा, म्हटलं तर परिचित, म्हटलं तर सर्वस्वी वेगळा असा एक सुवास तेव्हा अनुभवला होता. आज नेमका तोच गंध जाणवला. रंग, गंध, स्पर्श आणि ध्वनी अशा अनेक अंगाने निसर्ग आपल्याशी संवाद साधत असतो. आज त्या गंधसंवेदनेद्वारे संवाद घडत होता.
रोज शाळेत बागकाम शिकायला येणाऱ्या मुलांच्या डोळ्यात मला असंख्य प्रश्न दिसत असतात. त्यावेळी मनात येतं की यांना सांगावं, थोडा धीर धरा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची सगळी उत्तरं निसर्ग देणार आहे तेही संगतवार. तुम्हाला फक्त त्याची भाषा समजून घेता आली पाहिजे. पुढे मौखिक संवादापलिकडचा हा संवेदनात्मक संवाद करायला ती हळूहळू शिकतात, त्यावेळी त्यांना कुठल्याही पुस्तकांची किंवा इतर साधनांची गरजच उरत नाही.
एकदा या निसर्ग भाषेचं आकलन करून घेण्याची सवय लागली की पुढचं काम सोपं होतं. खरं तर शिकणं आणि शिकण्यासारखं काहीच नसतं.असतो तो अनुभव, अनुभवाला आपल्या आतमध्ये मुरवून घेतलं की कालांतराने तो अनुभवच अनेक गोष्टी आपल्यापुढे उलगडत जातो. आजही माझ्यापर्यंत पोहोचलेल्या त्या गंधाने माझी संवेदना जागृत केली होती. सभोवती शोध घेऊ लागले, वासाचा मागोवा घेत थोडंसं शोधल्यावर एका मोठ्या वृक्षा पाशी येऊन पोहोचले.
त्याच्या तळवटी फुलांचा सडा पडला होता. मोतीया रंगाची, फिकट पांढरी, मोगऱ्याच्या कळ्यांसारखी आणि पाकळ्यांचं अवगुंठणं अजूनही पुर्णपणे दूर न केलेली ती फुलं जमिनीवर हलकेच रेलली होती.
अरेच्चा! हा तर मोह, शास्त्रीय भाषेत मधुका इंडिका. ओळख पटल्यावर अनेक नावं झरझर समोर येत गेली.
हा इथे आहे, आपल्या इतका जवळ आणि एवढ्या दिवसांत आपल्याला जाणवला बरा नाही. खरं तर इथे राहायला येऊन आता दोन वर्ष होतील, पण या एवढ्या कालावधीत यांचं असणं कधी अधोरेखितच झालं नव्हतं. आज या कळ्यांनी गंधात्मक आमंत्रण पाठवून मला बोलावून घेतलं होतं. भराभर फुलं गोळा केली. ओंजळीत घेऊन दीर्घ श्वास घेतला. माझा आवडता मोह मला अवचित गवसला होता.
दरवर्षी कळसूबाई मिलेटस् या संस्थेकडून मी मोहाची फुलं मागवते, यावेळी किंचित उशीर झाला आणि फुलं संपल्याचा निरोप आला. त्यावेळी वाईट वाटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर अवचित भेटलेल्या या फुलांनी मन सुखावून गेलं. आता या फुलांना वाळवून ठेवत किती गोष्टी करता येतील याची यादी मनात तयार होत होती, पण अनुभूतीचा संवाद इथेच थांबला नव्हता तो अजूनही सुरूचं होता. मोहाच्या पायातळी गुंतून पडलेल्या मला मोहाच्या शेजारचा बहावा दिसलाच नव्हता. आपल्या नाजूक पिवळ्या फुलांची झुंबरं मिरवत तो मला हाक देत होता. मी पुढे सरकत हळूवारपणे त्याची ती मुलायम फुलं कुरवाळली, त्यासरशी वरच्या फांदीवरून दोन चार फुलं लहरत माझ्याजवळ येऊन पोहोचली.
आमच्यातला संवाद सुरू झाला होता. बहाव्याच्या खोडाला कुरवाळत मी मूकपणे ‘कसा आहेस?’ असं विचारलं. पानांच्या सळसळीने ‘मजेत’असं एक गोड उत्तर लगेच देवून ही टाकलं. या संवादात आता शेजारचा सीता अशोक, गुलमोहर, सोनमोहर असे एक एक जण सामील होत होते. पलीकडची लिलीची फुलंही खुणावत होती. सकाळ उजाडत आली. सभोवताल जागा होऊ लागला, आता निघायला हवं होतं. संवेदना बोथटलेल्या सभोवतीच्या जगाला जागृती येण्यापुर्वी हा निशब्द, तरल संवाद संपवावा लागणार होता.
मी सायकल पार्क केली आणि अतीव समाधानाने भरलेलेल्या मनाने लिफ्टचं बटण दाबलं.
mythreye.kjkelkar@gmail.com