चामी मुर्मू यांनी आजपर्यंत जवळपास ३० लाख झाडं लावली आहेत. म्हणजे दिवसाला साधारण २५६ झाडं लावली आहेत. हा एक प्रकारे जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. त्यांनी ७१ गावांमध्ये सरोवर आणि २७१ तलावांची निर्मिती केली आहे. २६३ गावांमध्ये बचत गट सुरू करून ३३ हजार महिलांना एकत्र आणणं व त्यांना स्वावलंबी बनवलं आहे. पर्यावरण बचाव क्षेत्रातील आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. त्यातीलच काही निवडक पुरस्कार म्हणजे १९९६ साली भारत सरकारतर्फे इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये नारीशक्ती पुरस्कार अन् आता २०२४ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
झारखंड जिल्ह्यातील सरायकेला – खसरवां जिल्हा तसा मागासलेला. या जिल्ह्यातील बागराईसाई या गावातील एका महिलेला २०२४ चा पद्मश्री पुरस्कार मिळाला. या महिलेचं नाव लेडी टारझन चामी मुर्मू. होय चामी मुर्मू यांना झारखंडमध्ये लेडी टारझन म्हणूनच ओळखलं जातं. कारण वन माफियांमध्ये त्यांच्या नावाची एवढी दहशतच आहे की त्यांचं नाव जरी ऐकलं तरी वनमाफियांना धडकी भरते.
कोण आहेत चामी मुर्मू?
चामी मुर्मू यांचा जन्म भुरसा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. आई – वडील, भाऊ- बहीण, आजोबा असा त्यांचा परिवार. जी काही थोडीफार शेती होती त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सोबतीला दुसऱ्यांच्या शेतात शेतमजूर म्हणून सुद्धा त्या काम करत.
आठवीत असताना वडिलांचं छत्र हरपल्यानं कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतमजूर म्हणून काम करू लागल्या. शेतमजुरी करत असतानाच त्यांनी कसंबसं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
हेही वाचा… कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
आजोबांना पर्यावरण जनजागृती, समाजसेवेची आवड असल्यानं ते नेहमीच फिरतीवर असत. त्यांच्यासोबत फिरताना, पर्ययावरणविषयक चर्चा करताना निसर्ग, झाडे ही आपल्याला देवतुल्य आहेत याची जाणीव चामी यांना झाली. आपण आदिवासी आहोत. आपला उदरनिर्वाह, दिनचर्या निसर्गाभिमुख आहे हे त्यांना प्रकर्षानं जाणवलं. आजोबांचा निसर्गविचार चामी मुर्मू यांच्या मनात खोलवर रुजला.
पुढे शेतमजुरी करता करता आसपासच्या भागात महिलांच्या होणाऱ्या मेळाव्यांबद्दल समजलं. एकदा सहजच त्यांनी त्या मेळाव्याला इतर महिलांसोबत हजेरी लावली आणि त्या मेळाव्यामधूनच त्यांना वृक्षारोपण करण्याची कल्पना सुचली. व १९९२ रोजी त्यांनी पहिलं झाड लावले.
वृक्षारोपणाचं काम करता करता त्यांनी ‘सहयोगी महिला’ नावाची संस्था स्थापन केली. पण संघर्षाला खरी सुरुवात तर इथूनच सुरू झाली. कारण पर्यावरण रक्षण करताना, वृक्षारोपण करताना कधी कधी त्यांना वनमाफियांशी सामना करावा लागे. सुरुवातीला या माफियानंची त्यांना थोडी भीती वाटे, पण नंतर कंबर कसून वनमाफियांसमोर त्या कर्दनकाळ बनून ठाण मांडून उभ्या राहिल्या. त्यांच्या आक्रमक व निडर वृत्तीमुळे वनमाफियांमध्ये त्यांच्या नावाची दहशतच निर्माण झाली. त्यामुळे त्यांना लेडी टारझन ही नवी ओळख मिळाली.
हेही वाचा… जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या
साल १९९५-९६ च्या दरम्यान चामी यांनी एक नर्सरी सुरू केली. त्या नर्सरीत १ लाखाच्या आसपास झाडे होती, पण एके रात्री कोणीतरी ती नर्सरी पूर्णत: उध्वस्त करून टाकली. त्यामुळे त्या खूप उदास झाल्या. गावात बैठक घेऊन त्यांनी चौकशी केली, पण कोणीही कबूल करेनात. शेवटी त्यांनी नाईलाजानं पोलिसांची मदत घेतली आणि आरोपींना जेलमध्ये टाकण्यात आलं.
चामी यांनी आजपर्यंत ३० लाखांच्यावर झाडं लावली आहेत.
चामी या त्यांच्या सहकारी महिलांसोबत गावात जाऊन तिथे बैठक घेऊन कोणाकोणाच्या जमिनीत झाडं लावायची आहेत आणि कोण कोण इच्छूक आहे याची चौकशी करतात. मग ते कोणती झाडं लावण्यास उत्सुक आहे अशी सर्व विचारपूस करून, ग्राम विकास अधिकाऱ्याकडे संपूर्ण माहिती सुपूर्द करतात. नंतर वृक्षारोपण झाल्यानंतर किमान ३ वर्षं त्यांची संघटना त्या झाडांची देखभाल करते.
झाडांची देखरेख आणि वाढीसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. यासाठी चामी यांनी ७१ गावांमध्ये २१३ तलाव बांधले आहेत. तसेच डोंगराळभागात पावसाळ्यात येणारे पाणी अडवण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे बनवून तलाव किंवा शक्य असल्यास छोट्या बंधाऱ्यांचं बांधकाम केलं आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होत आहे. कारण यामुळे झाडांसाठी पाणीसुद्धा मिळतं आणि सोबत किरकोळ प्रमाणात मत्स्यशेतीसुद्धा करणं शक्य झालं आहे.
पर्यावरणरक्षणासोबत चामी या महिला सबलीकरणासाठीसुद्धा झटत आहेत. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी परिसरातील २६३ गावात छाेटे-मोठे बचतगटसुद्धा सुरू केले आहेत. या बचतगटांत जवळपास ३३ हजार महिला त्यांच्या संपर्कात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. तसेच आदिवासी भागात पाचवीपर्यंतच शाळा असल्यानं त्यांना पुढील शिक्षणासाठी गावापासून लांब जावं लागत असे. येण्याजाण्याचा खर्च परवडणारा नसल्याने बहुतांशी मुलींचं शिक्षण अर्धवटच राहत असे. आपल्या समाजातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून २०१० पासून या मुलींचा पुढील शिक्षणाचा खर्च चामी यांच्या बचत गटामार्फत चालू आहे.
मागील तीस एक वर्षात जवळपास त्यांनी ३० लाख झाडं लावली आहेत. म्हणजे दिवसाला साधारण २५६ झाडं लावली आहेत. हा एक प्रकारे जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. त्यांनी ७१ गावांमध्ये सरोवर आणि २७१ तलावांची निर्मिती केली आहे. २६३ गावांमध्ये बचत गट सुरू करून ३३ हजार महिलांना एकत्र आणणं व त्यांना स्वावलंबी बनवलं आहे. पर्यावरण बचाव क्षेत्रातील आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. त्यातीलच काही निवडक पुरस्कार म्हणजे १९९६ साली भारत सरकारतर्फे इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये नारीशक्ती पुरस्कार अन् आता २०२४ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
चामी म्हणतात की, ‘‘पर्यावरण वाचवणं ही काळाची गरज आहे. कारण माणसाचं जीवन हे पर्ययावरणावरच अवलंबून आहे. झाडे, पर्यावरण व्यवस्थित नसेल तर आपण व इतर सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजन मिळतो तो कुठून मिळणार? त्यामुळे भविष्य निरोगी, समृद्ध हवं असेल तर पर्यावरण जपलं पाहिजे. त्यांचा समतोल ढासळता कामा नये.
rohit.patil@expressindia.com