पूजा सामंत
“जेव्हा माझ्या मुलीने- मल्लिकाने घरात रांगता रांगता पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा आई म्हणून मी ते बघण्याचा आनंद घेऊ शकले नव्हते. कारण मी होते चित्रीकरणात! मला खूप वैष्यम्य वाटलं होतं. मातृत्वाचा आनंद मुलं वाढतानाच घ्यायचा असतो, असं माझं मत. मग मी विचार केला, की जर माझ्यात अभिनयाचे गुण असतील, तर मी नक्की पुन्हा काम करीनच! त्यामुळे मुलं वाढताना मी ठरवून त्यांची पहिली ७ वर्षं त्यांच्या सोबत राहिले. स्वेच्छेनं तो अवकाश मी घेतला. मला त्यात आपण काही चुकीचं करतोय असं वाटलंच नाही!” अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी आपला प्रवास उलगडतात. दिग्दर्शक आणि पती विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटात पल्लवी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने भेटलेल्या पल्लवी यांनी आपल्या वैयक्तिक वाटचालीबद्दल भरभरून गप्पा मारल्या.
पल्लवी सांगतात, “मुलांना वाढवणं, घडवणं यात मी मनापासून रमले. ती दोघं मोठी होत असताना, ती शाळेत गेली की मला वेळ मिळत असे. मी मराठी मालिकांची निर्मिती केली, ‘अनुबंध’, ‘असंभव’ या मालिका केल्या; ज्या प्रेक्षकांना आवडल्या. नंतरच्या काळात विवेकनं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं आणि त्यात आम्ही सगळ्यांनी हातभार लावला. आज दोन्ही मुलं तरुण आहेत. मुलगी मल्लिका सहाय्यक निर्माती, मुलगा मनन सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वडिलांना मदत करताहेत. आम्ही सगळे सतत एकत्र असतो. एक प्रकारे हाही कौटुंबिक आनंदच आहे. परंतु मला बाहेर कुठे काम करू नकोस असं विवेकने कधीही म्हटलेलं नाही!”
आणखी वाचा-आनंद महिंद्रांच्या दोन मुली काय करतात? दिव्या अन् अलिकाची संपत्ती किती?
पल्लवी आणि विवेक अग्निहोत्री यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या नात्याबद्दल पल्लवी सांगतात, “आमचे कधी कधी कामाबाबत किरकोळ मतभेद होतात, पण त्या प्रश्नांचा निचराही लगेच होतो. मी मराठमोळी आणि विवेक काश्मिरी पंडित; पण आमच्यात जीवनशैलीविषयक मतभेद कधी निर्माण झाले नाहीत. आता तर वयाने प्रगल्भता आली आहे.”
‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटात पल्लवी यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर काम केलं आहे. नानाबद्दल पल्लवी सांगतात, “नाना म्हणजे ओल्ड वाईन! असं म्हणतात, की दारू जितकी जुनी होते तितका त्याचा स्वाद वाढतो, रंगत वाढते. तशी नानाच्या अभिनयाची खोली अधिकच वाढली आहे. त्याच्यासोबत शॉट देताना मी माझे संवाद विसरून जात असे! मग नाना म्हणे, ‘ए वेडाबाई, संवाद म्हण तुझे! कुठे भान हरपलं तुझं?’ त्याला मी काय सांगणार होते, की ‘अरे नाना, तू जे झपाटून काम करतोयस ते बघतेय!’ अर्थात नानाचा हेकेखोर, मूडी स्वभाव अजूनही तसाच आहे! शेवटी तो नाना आहे! त्याचं हे ‘नानापण’ बिनशर्त मान्य आहे!”