आपल्या देशातील अनेकांनी आजवर जगातील मोठमोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर विराजमान होऊन देशाचं नाव उंचावलं आहे. त्यापैकी सत्या नडेला, सुंदर पिचई, नील मोहन, अजय बांगा, निकेश अरोरा, जयश्री उल्लाल, रेवथी अद्वैथी ही त्यापैकी काही नावं. या यादीत आता अजून एक नाव जोडलं गेलं आहे ते पाम कौर यांचं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाम कौर यांची हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) मध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूळच्या भारतीय असलेल्या पाम कौर यांना फायनान्स क्षेत्रातील गाढा अनुभव आहे. विशेष म्हणजे एचएसबीसीच्या १६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला सीएफओ पदावर नियुक्त करण्यात आली आहे. एचएसबीसी कंपनीने हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या सीएफओ म्हणून पाक कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२५ पासून त्या या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. सध्या या पदावर जॉन बिंगहॅम आहेत.

आणखी वाचा-दिवाळीत पाहुण्यांना घरी बोलावताय? या टीप्स नक्की लक्षात ठेवा…

पाम कौर यांचा जन्म भारतातील असून त्यांनी पंजाब विद्यापीठातून बी.कॉम आणि फायनान्स विषयात एमबीए पूर्ण केलं आहे. आपल्या करिअरची सुरुवात Ernst & Young (EY) या कंपनीमध्ये एक चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी सिटी बँकमध्ये इंटर्नल ऑडिट म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

एप्रिल २०१३ मध्ये पाम कौर एचएसबीसीमध्ये रुजू झाल्या. एचएसबीसीमध्ये सीएफओ पदापर्यंत पोहचण्याआधी त्या मुख्य जोखीम आणि अनुपालन अधिकारी (Chief Risk and Compliance Officer) म्हणून कार्यरत होत्या. पाम कौर या एचएसबीसी मध्ये रुजू होण्याआधी मोठ्या जागतिक वित्तीय कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. त्यामध्ये ड्यूश बँकेचे ग्लोबल हेड ऑफ ग्रुप ऑडिट, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड ग्रुप पीएलसीमध्ये रिस्ट्रक्चरिंग अँड रिस्क डिव्हिजनच्या सीएफओ, सीओओ आणि लॉयड्स टीएसबी येथे कंप्लायन्स आणि अँटी – मनी लँडरिंग चे टीम लीडर, तसेच सिटी बँकमध्ये सुद्धा वरिष्ठ पदावर काम केले आहे. सध्या त्या Abrdn PLC च्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत आहेत.

आणखी वाचा-स्त्री आरोग्य : लघवीच्या ठिकाणी खाजतंय? दुर्लक्ष करू नका 

६० वर्षांच्या पाम कौर यांना वित्तीय क्षेत्रातला ४० वर्षांचा अनुभव आहे. ६० वर्षांच्या व्यक्तीस तंत्रज्ञानस्नेही मानले जात नाही. परंतु पाम कौर यांच्याबाबातीत हा समज खरा नाही. नवीन CFO म्हणून कौर यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या आहेत. तीनेक वर्षांपूर्वी त्यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली होती जी या जबाबदाऱ्यांबद्दलचे त्यांचे गांभीर्य दर्शवते. ती पोस्ट अशी की, “आपल्या आयुष्यात अशा फार थोड्या गोष्टी आहेत ज्यावर आपण आपलं नियंत्रण ठेवू शकतो. पण त्यापुढे काय शिकायचं आहे हे ठरवणं आपल्या हातात आहे. सध्या आपल्या सभोवतालचे जग हे झपाट्याने बदलत आहे. या झपाट्याने बदलणाऱ्या वातावरणात वाढण्याची, भरभराट काम करण्याची आणि काळानुसार चालणे हे गरजेचे आहे. कारण आपण आपली भविष्यातील आव्हाने आणि करिअरच्या सर्वोत्तम गोष्टींसाठी तयार असायला हवं. उज्ज्जवल भविष्यासाठी नवनवीन कौशल्ये विकसित करायला हवीत. मला नेहमीच या गोष्टीचा विश्वास वाटतो की आपली क्षमता आणि आपला अनुभव हा कोणाहूनही कमी नसतो. मला माझ्या करिअरची आणि वैयक्तिक प्रवासाची तुलना इतरांशी करणे योग्य वाटत नाही, कारण अनेकदा तुलना केल्याने आपल्याला आपण कुठेतरी अपूर्ण आहोत ही भावना बळावते व आपण निराश होतो.’’

आणखी वाचा-सहमतीने घटस्फोटाकरता प्रत्यक्ष हजेरी आवश्यक नाही

पाम कौर यांना सीएफओ पदावर मिळणारे वेतन आणि भत्ताएचएसबीसीमध्ये मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून काम करताना पाम कौर यांना वर्षाला ८०३,००० पाऊंड (सुमारे ८.७० कोटी रुपये) मिळणार आहे. याशिवाय त्यांना १,०८५,००० पाऊंड (सुमारे ११.८५ कोटी रुपये) असे एकंदरीत वेतन आणि विविध भत्ते मिळून वर्षाला २५ ते ३० कोटी रुपये मिळतील. पगारासोबतच त्यांना वार्षिक बोनस मिळणार आहे.

एचएसबीसीच्या १६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या पदावर एक महिला म्हणून पाम कौर यांची निवड ही एक ऐतिहासिक घटना मानली जाते. त्यांच्या अनुभवाचा कंपनीला नक्कीच फायदा होईल असा विश्वास कंपनीच्या वरिष्ठांकडून व्यक्त केला जात आहे.

rohit.patil@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pam kaur appointed as chief financial officer at hong kong and shanghai banking corporation mrj