तिची तगमग तिच्या देवघरातील सावळा विठुराया पाहताना गालातल्या गालात हसत आहे असा तिला भास झाला. स्वप्नातील पंढरीची वारी उंबऱ्यावरच अडखळते की काय अशी तिला शंका आली. पण यंदा वारीसोबत पंढरपूर नाही तर किमान गावाची वेस ओलांडत रिंगणात एक फुगडीची गिरकी घ्यायची, अबीर गुलाल उधळत विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन व्हायचे असे वेगवेगळ्या स्वप्नात ती रंगली.
‘‘आली पंढरीची वारी, तारांबळ माझ्या घरी
लेकी बाळी आल्या घरी, सुना गेल्या माहेराशी
घरी काम कोण करी, आली पंढरीची वारी’’
ही ओवी ती लहानपणापासून ऐकत आली. सुरुवातीला तिला या ओळींचा फारसा अर्थ कळत नव्हता. पण आई गुणगुणायची तशी तीही गुणगुणायला लागली. मग अशा वेगवेगळ्या ओव्या गुणगुणायचा तिला छंदच जडत गेला. गल्लीच्या चौफुलीवर तर कधी शहराच्या हमरस्त्यावरून भगवा ध्वज, गळ्यात तुळशीची माळ… डोक्यावर छोटंसं तुळशी वृंदावन आणि मुखी अखंड हरीनामाचा गजर… माऊली सोबतीला अबीर गुलालाची उधळण… टाळ मृंदूगाचा ताल… अशा भक्तीमय वातावरणाचं तिला विशेष आकर्षण होतं. शाळेतील पालखी सोहळा तिचा जीव की प्राण होता. यासाठी शाळेत ती आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीच्या दिवशी आर्वजून वारकरी होई… पालखीत असलेला काळा सावळा विठुराया तिला स्वत:चा जीवलग सखा वाटे. त्याच्या जवळ ती आपलं मन मोकळ करत राहायची. पंढरपूरला जाऊन तिला त्याची प्रत्यक्ष भेट घ्यायची होती. पण कधी घरच्यांना वेळ नाही तर कधी हिची परीक्षा, अभ्यास यामुळे वेळ मिळाला नाही. तशी कारणांची यादी लांबत राहिली.
हेही वाचा : ईशा अंबानीने IVF द्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म: IVFबाबत या ५ गैरसमजांवर विश्वास ठेवू नका
मधल्या काळात तिचं लग्न झालं. पाठवणीच्या वेळी तिला बाळकृष्णासोबत विठ्ठलाची मूर्तीही दिली. चार चौघांसारखं ती संसारात गुंतली. घरातील जबाबदाऱ्यांसोबत तिने नोकरीची जबाबदारी स्विकारली. घर, नोकरीमध्ये अडकलेली ती वेगवेगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना तिच्या नाकीनऊ यायचे. या काळातही तिचा सावळ्या विठ्ठलांशी तिचा संवाद कायम राहिला. पण आई गुणगुणत असलेल्या ‘आली पंढरीची वारी’ या ओवीचा तिला नव्याने अर्थ कळू लागला. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि कामाचा मेळ यामध्ये तिची पंढरीची वारी तशी दूरच राहिली. सासर चांगलं त्र्यंबकेश्वर येथील तालेवार… तीर्थक्षेत्र असल्याने पाहुण्यांचा सतत राबता. फिरायला म्हणून बाहेर पडायचं म्हटलं की कोणी ना कोणी ऐन वेळी हजर… यामुळे संत निवृत्तीनाथाच्या पालखीसोबत तिला आजवर पायी चालत गावाची वेसही ओलांडता आली नाही. पण आज कॅलँडरवर आवश्यक खाणाखुणा करत असताना एकादशीचा झेंडा तिला खुणावू लागला. वारीत सहभागी होण्याची अनावर ओढ जाणवू लागली.
हेही वाचा : समुपदेशन : बायकोचं माहेर का सलतंय?
काहीही झालं तरी पंढरपूर गाठायचं असा चंगच तिने बांधला. ऑफीसमध्ये रजा मिळेल ना या विचारात असतानाच सासुबाईंची कंबर धरली, सासऱ्यांच्या खोकल्याने पुन्हा डोकं वर काढलं. नवरा म्हणाला, या महिन्यात बाहेरच्या काही टूर आहेत. मुलांची तर तऱ्हाच वेगळी. शाळेत असेंबलीमध्ये इलेक्शन फिव्हर आहे. या वेळी माझं हाऊस टॉप पाहिजे. आई मला शाळेत लवकर जावं लागेल असं सांगत मुलं फरार… प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि कामाचा मेळ तिला बसवता येईना. तिची ही तगमग तिच्या देवघरातील सावळा विठुराया पाहताना गालातल्या गालात हसत आहे असा तिला भास झाला. स्वप्नातील पंढरीची वारी उंबऱ्यावरच अडखळते की काय अशी तिला शंका आली. पण यंदा वारीसोबत पंढरपूर नाही तर किमान गावाची वेस ओलांडत रिंगणात एक फुगडीची गिरकी घ्यायची, अबीर गुलाल उधळत विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन व्हायचे असे वेगवेगळ्या स्वप्नात ती रंगली असताना दुरून ‘अवघा रंग एक झाला’ ची धून सुरू होती…