पपई ही लंबगोल आकाराची वरून हिरवी व आतून पिवळसर असते. पिकताना ही पिवळसर केशरी रंगाची होते. वरील साल हे मऊ व पातळ असते, तर आतील गर हा केशर आंब्याप्रमाणे शेंदरी रंगाचा असतो व पूर्ण पिकल्यावर खाताना सहज विरघळतो. पपईच्या बिया या काळ्या मिरीसारख्या असतात व या बियांवर एक पातळ पांढऱ्या रंगाचे आवरण असते. चांगल्या प्रतीच्या बीमधूनच उत्तम पपईचे रोप तयार होते. एका पपईचे वजन साधारणत: अर्धा ते दोन किलोपर्यंत असते. पपई हे फळ मूळचे दक्षिण मेक्सिकोमधील असून, नंतर त्याचा प्रसार भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, ब्राझील अशा अनेक देशांमध्ये झाला.
हेही वाचा- विवाह समुपदेशन : सिबलिंग रायव्हलरी… नात्यात नकोच
औषधी गुणधर्म :
पपई हे एक चविष्ट फळ असून ते औषध म्हणूनही वापरले जाते. आयुर्वेदामध्ये पपईचे वर्णन मधुर रसाची, कषाय गुणधर्माची व उष्ण वीर्यात्मक असे केले आहे. प्रथिने, खनिजे, ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व पपईमध्ये भरपूर प्रमाणात आढळते. त्यातील ‘क’ जीवनसत्त्व हे पपई पिकताना वाढते. यातील पिष्टमय पदार्थ म्हणजे नैसर्गिक फळशर्कराच असते. ही शर्करा रक्तामध्ये लगेच शोषली गेल्याने ऊर्जा व उत्साह वाटतो. पपईमध्ये पेपेन हा घटक आतड्यांमधील पाचक रसांची कमतरता, अपायकारक चिकट स्राव व आतड्यांतील दाह कमी करतो. त्यामुळे जेवणानंतर पपई खाल्ली असता अन्नपदार्थ पचण्यास मदत होते. मांसाहारी पदार्थ खाल्ल्यानंतर पिकलेली पपई खाल्यास मांसाहार लवकर पचतो.
हेही वाचा- आहारवेद : पचनसंस्थेसाठी सर्वोत्तम सफरचंद
उपयोग :
० पचनशक्ती कमी होऊन भूक मंद झाली असेल तर अशा वेळी कच्च्या पपईची भाजी खावी. यामुळे पचनशक्ती वाढते. कच्च्या पपईच्या रसाचा उपयोग जंत-कृमींचा नाश करण्यासाठी होतो.
० १ चमचा पपईचा रस, १ चमचा मध, ४ चमचे गरम पाणी मिसळून हे मिश्रण प्यावे. त्यानंतर थोड्या वेळाने २ चमचे एरंडेल तेल प्यावे, असे सलग दोन ते तीन दिवस घेतल्यास आतड्यांमधील कृमी व जंत नष्ट होतात.
० पपईचे बी व पान यामध्ये कॅरिसिन हे द्रव्य असते व तेदेखील कृमी व जंतावर उत्कृष्ट औषध आहे. यासाठी पानांचा व बियांचा रस मधात मिसळून प्यावा.
० चेहऱ्याच्या सुंदरतेसाठीसुद्धा कच्च्या पपईचा रस तोंडावर चोळावा, यामुळे चेहऱ्यावर चकाकी येऊन पुटकुळ्या, मुरुमे, सुरकुत्या नाहीशा होतात.
० पपईमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. त्यामध्ये असणाऱ्या एन्झायिममुळे कर्करोगासारख्या आजारांचा प्रभाव कमी होतो. पिकलेल्या पपईचा गर हा श्रमहारक व तृप्तीदायक असतो.
० पपई मूत्रल असल्याने मूत्रिपडाचे विकार दूर करण्यासाठी पपई उपयुक्त ठरते.
० अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठता हे पोटाचे विकार पपईतील पेपेनमुळे दूर होतात.
० पपईच्या सेवनाने स्त्रियांमधील मासिक स्रावामध्ये नियमितपणा येतो.
० चिरतारुण्य टिकवण्यासाठी वार्धक्य टाळून शरीरावरील सुरकुत्या नष्ट करण्यासाठी, शक्ती व उत्साह प्राप्त होण्यासाठी रोज दोन फोडी पपईच्या खाव्यात. यामुळे शरीरात रक्तशुद्धीचे कार्य होते.
० त्वचा कोरडी व सुरकुतलेली असेल, उन्हामुळे त्वचेवर पुटकुळ्या आल्या असतील व त्यामुळे त्वचेची आग होत असेल तर पपईचा रस त्वचेवर लावावा. यामुळे सुरकुत्या, दाह नाहीसा होऊन त्वचा नितळ व स्वच्छ होते.
० पपईचे बीज किंवा कच्च्या पपईचा रस मासिक पाळीची अनियमितता, कमी स्राव आणि वेदनेसह मासिक रक्तस्राव यावर गुणकारी आहे. कारण पपईच्या रसामुळे उष्णता वाढून गर्भाशयांच्या स्नायूंचे आकुंचन होते आणि अनियमित रक्तस्राव नियमित होतो.
० पपई या फळापासून जाम, आइसक्रीम, टुटीफ्रुटी, चॉकलेट्स, जेली, सौंदर्यप्रसाधने असे अनेक प्रकार बनवले जातात.
० पपईच्या पानांचा रस पिल्याने रक्त शुद्ध होऊन शरीरामध्ये रक्तप्रवाह सुधारतो म्हणून पपई ही अतिरक्तदाब, हृदयविकार यामध्ये उपयुक्त आहे.
० बालकांच्या आहारात नियमितपणे रोज दोन फोडी पपई दिल्यास त्यांचे शरीर सुदृढ होऊन उंची चांगली वाढते.
० नियमितपणे पपई सेवन केल्याने यकृतवृद्धी व प्लीहेचे विकार कमी होतात.
हेही वाचा- आहारवेद : आम्लपित्तावर गुणकारी खरबूज
सावधानता :
गर्भवती स्त्रीने कच्ची किंवा पिकलेली पपई अतिप्रमाणात खाऊ नये. त्यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व असते म्हणून खायचीच असेल तर अगदी क्वचितच एखादी फोड खावी. तसेच ज्या स्त्रियांना मासिक स्राव जास्त प्रमाणात होतो. त्यांनीही पपई अतिप्रमाणात खाऊ नये.
मूळव्याधीमधून जर रक्त पडत असेल तर अशा वेळी पपई खाऊ नये.
sharda.mahandule@gmail.com