संपदा सोवनी
जीन्स हा समस्त तरुणाईकडून आवडीनं वापरला जाणारा पोषाखाचा प्रकार. या जीन्समध्ये कितीतरी प्रकार आपल्याला माहित असतील आणि त्यातले कितीक आपल्या वॉर्डरोबमध्येसुद्धा असतील. स्ट्रेचेबल स्किनी जीन्स, नॉन स्ट्रेचेबल रेग्युलर जीन्स, हाय वेस्ट, लो वेस्ट, बूटकट, हिपस्टर, अलिकडे दिसू लागलेले जीन्स जॉगर्स… वगैरे. या यादीत अगदी ताजा ताजा समाविष्ट होऊ पाहणारा प्रकार आहे, तो म्हणजे ‘पेपरबॅग जीन्स’. मजेशीर नावाची ही फॅशन जगात नवीन आहे असं मुळीच नाही. मात्र आपल्याकडे मोठ्या शहरांत अलीकडे अनेक किशोरी आणि तरुण मुली या प्रकारची जीन्स घालून मजेत फिरायला जाताना दिसत आहेत. शॉपिंग वेबसाईटस् वर सुद्धा पेपरबॅग जीन्स लोकप्रिय असलेल्या दिसताहेत. हा प्रकार काय आहे आणि तो घालून फॅशन कशी करता येईल ते पाहू या.
हेही वाचा >>> विवाह समुपदेशन : तोडलेल्या नात्यातलं अडकणं…
‘पेपरबॅग’ असं विचित्र नाव का?
‘हाय फ्लाईंग’ सुपरमार्केटस् मध्ये भाज्या-फळं घेताना जशा जाड, खाकी कागदाच्या मोठ्या पिशव्या देतात, त्या डोळ्यांसमोर आणा. पेपरबॅग जीन्सच्या ‘वेस्ट’ला कागदी पिशवीला चुण्या पडाव्यात, तशा चुण्या असतात. या चुण्यांमुळे जीन्सला एक ‘लूज फिटिंग’ आणि ‘बॅगी’ लूक येतो. म्हणून तिचं नाव ‘पेपरबॅग’! ही जीन्स ‘हाय वेस्ट’ असते. तिला एकतर नेहमीच्या साध्या जीन्सप्रमाणे बटण आणि झिप दिलेली असते किंवा इलॅस्टिक दिलेलं असतं. पायांनासुद्धा ही जीन्स लूज फिटिंग देते. अशा विशिष्ट लूकमुळे ही जीन्स जशी ‘कॅज्युअल’ कपड्यांमध्ये वापरता येते, तसंच ‘फॉर्मल’ कपड्यांमध्येसुद्धा ती घातली जाते. ‘बॉडी टाईप’मधल्या ‘पीअर शेप’ किंवा ‘hourglass शेप’च्या व्यक्तींना ही जीन्स विशेष चांगली दिसते.
कशी करावी ‘पेपरबॅग जीन्स’ची फॅशन?
या जीन्सच्या वेस्टला असलेल्या ‘पेपरबॅग डीटेल’मुळे तिचं स्टायलिंग करणं काहीसं अवघड असतं. यावर कुडता-कुर्ती किंवा साधा टॉप वा टी-शर्ट घालून चालत नाही. जीन्सच्या वेस्टला असलेला खास डीटेल दाखवायचा असेल, तर टॉपची उंची त्या वेस्टपेक्षा कमी किंवा त्याबरोबर मिळतीजुळती ठेवावी लागते. याचा अर्थ अशा जीन्सवर नेहमी क्रॉप टॉपचं घालावा लागतो का? मुळीच नाही! क्रॉप टॉप पेपरबॅग जीन्सवर उत्तम दिसतो हे खरंच आहे आणि त्यामुळे बाहेर फिरायला जाताना किंवा लहान पार्टीला जाताना छानसा लूक परिधान करता येतो. विशेषत: बारीक चणीच्या मुलींना क्रॉप टॉप आणि त्यावर क्रॉप्ड उंचीचीच पेपरबॅग जीन्स असा लूक खुलून दिसेल.
हेही वाचा >>> बाई गं, तू इतका ताण घेऊ नकोस!
दुसरा प्रकार म्हणजे टी-शर्ट, टॉप वा शर्ट ‘इन’ करणं. असं कधी झालंय का, की तुम्हाला इतर कुणाचं तरी पाहून जीन्समध्ये टी-शर्ट इन करावासा वाटतो, पण ‘आपल्याला ते चांगलं दिसेल का?’ या अकारण केलेल्या विचारामुळे तुम्ही ती फॅशन करायला धजावत नाही! तसं असेल, तर पेपरबॅग जीन्स तुम्हाला टी-शर्ट इन करण्यासाठीची उत्तम संधीच ठरेल! या जीन्सच्या बॅगी लूकमुळे तुम्ही या लूकमध्ये निश्चितपणे अधिक आत्मविश्वासानं वावरू शकाल. असा इन केलेला अंगाबरोबर बसणारा टी-शर्टसुद्धा छान कॅज्युअल लूक देतो. फिट बसणारा फॉर्मल टॉप किंवा फॉर्मल शर्ट इन केलात की ऑफिससाठी चांगला लूक तयार होईल. त्यावर पातळ फॉर्मल जॅकेट किंवा खूप जाड कापडाचा नसलेला ब्लेझरसुद्धा चांगला दिसतो. या जीन्सवर कमी रुंदीचा आकर्षक बेल्ट जरूर लावावा. त्यानं पेपरबॅग वेस्ट डीटेल उठून दिसतो.
विशेष टिप-
फॅशनमधले अनुभवी लोक या जीन्सबाबत एक टिप देतात, ती अशी, की पेपरबॅग जीन्सवर ‘कंफर्टेबल’ हीलची चप्पल वा तसे बूट घाला. यात टिपिकल हील्सच घालायला पाहिजेत असं नाही. दोन ते अडीच इंचांची हील देणारे, कुठल्याही रस्त्यावर कंफर्टेबली चालता येईल असे वेजेस, सँडल्स किंवा हील्ड बूट्स पेपरबॅग जीन्सवर चांगले दिसतात. बॅगी आणि हाय वेस्ट जीन्स घातल्यावर एरवी तुमची उंची जरा कमी असल्याचं भासतं. पण जीन्सच्या खाली थोड्या हीलचे बूट असतील, तर उंची काहीशी अधिक वाटते. योग्य प्रकारे स्टायलिंग केलंत, तर आधुनिक पेपरबॅग जीन्स तुमच्या वॉर्डरोबमधली कदाचित तुमची लाडकी जीन्स होऊन जाईल!