राही बाहेर निघण्याच्या तयारीत खोलीबाहेर आली तर हॉलमध्ये तिची आई, हेमा खिडकीतून बाहेर बघत उदास बसली होती. ‘आई, उशीर होईल गं,’ असं म्हणत दाराबाहेर पडताना राहीला आईच्या डोळ्यातलं पाणी दिसलं. ती पुन्हा आत आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काय झालं आई?” तिनं जवळ येत विचारलं.

“काही नाही.”

“असं कसं? सांग मला.”

“तू पूर्वीसारखं मनातलं सांगत नाहीस. तुझी घुसमट बघून मला त्रास होतोय. परकं वाटतंय.” हेमाच्या तोंडून निघालंच शेवटी. एकुलत्या लाडक्या लेकीसमोर काही मनात ठेवणं तिला जमायचंच नाही. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट आईशी शेअर केल्याशिवाय लेकीलाही राहवत नसायचं. नववीत असताना वर्गातला तन्मय आवडतो हे देखील राहीनं आईला सांगितलं होतं. पुढे बारावीपर्यंत चालू असलेलं त्यांचं थोडं फार डेटिंग हेमाला माहीत होतं. पुढे ‘आई, आता नाही कनेक्टेड वाटत तन्मयशी, खूप गोष्टी जुळत नाहीयेत आमच्या, त्यामुळे ब्रेकअप करायचं ठरवलंय.’ हेही राहीनं आईला सांगितलं होतं. तिच्या ब्रेक-अपचा अस्वस्थ ताण आईनंही झेलला होता, आधार दिला होता.

हेही वाचा… तिला त्याच्याशी नाही, ‘तिच्याशी ‘लग्न करायचंय?

डिग्रीनंतर राही मास्टर्ससाठी परदेशी असतानाही रोज फोन असायचा. राहीचं तिथलं मित्रमंडळ, कॉलेजमधल्या महत्वाच्या घटना, मजा, भांडणं हेमाला माहीत असायची. “राही परदेशी गेल्यापासून तूही मनानं तिथेच असतेस, माझ्याकडे लक्षच नसतं तुझं.” असं नवरा हेमाला चिडवायचा.

परतल्यानंतर राहीला चांगल्या कंपनीत जॉब मिळाला, तिथे मूळचा जयपूरच्या व्यापारी कुटुंबातला, पण सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुंबईत आलेला बद्री भेटला. त्यांची मैत्री सीरियस रिलेशनशिपकडे वळत होती. एका कॉन्फरन्ससाठी दोघं कंपनीतर्फे जयपूरला गेले असताना बद्री तिला घरीही घेऊन गेला. त्यानंतर राही आई-बाबांना म्हणाली, “बद्री मला खूप आवडतो, आमचं जुळतं. ‘मी सॉफ्टवेअरमध्येच स्वत:ची ओळख निर्माण करणार,’ असं तो म्हणतो, पण जयपूरमध्ये स्वत:च्या घरात रमून गेलेला बद्री वेगळा होता. एकुलता एक मुलगा, घरचं इतकं गडगंज आहे, की तिथे गरज पडली तर कधीही जॉब सोडून ‘कारोबार’ बघायला त्याला परत जावं लागेल, हे मला तिथे लख्ख दिसलं. मला हे नाही झेपायचं.” त्यानंतर त्यांनी सहमतीने नातं संपवलं, तरी राहीचा जीव गुंतला होता. ती गप्प होऊन गेली. बाहेर नॉर्मल वाटली, तरी घरात नेहमीसारखी मस्ती, गप्पा तिला जमत नव्हत्या. सारखी चिडचिड, मधूनच डोळ्यांत पाणी यायचं. हा असंवादी ताण हेमाला झेपत नव्हता. लेकीसोबतचा पूर्वीचा कनेक्ट तुटल्यासारखा वाटत होता.

हेही वाचा… मला कुण्णाची मदत लागत नाही?’… बायांनो, मदत घ्या !

आज न राहवून हेमा घुसमटीबद्दल बोलली. तेव्हा आईजवळ बसत शांतपणे राही म्हणाली,

“आई, मी बद्रीबद्दल तुझ्याशी घडाघडा बोलत नाहीये याचा तुला त्रास होतोय हे कळतंय मला. पण मी घुसमटत नाहीये. जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला लगेच सांगितलंय. माझ्या मनात माझी माझी प्रोसेस चालू आहे, म्हणून गप्प आहे.”

“पूर्वी तन्मयशी ब्रेकअप झाला तेव्हा किती सांगायचीस मनातलं…”

“कारण तेव्हा मी पंधरा-सोळा वर्षांची होते आई, कोवळ्या वयातलं ‘काफ लव्ह’ होतं ते. आज मी सत्तावीस वर्षांची आहे. बद्री मला आजही मनापासून आवडतो, मात्र फक्त तेवढ्यावर जयपूरची खानदानी बहू बनून आयुष्य काढता येणार नाही, हे समजून मी जाणीवपूर्वक निर्णय घेतलाय. त्रास होतोय, माझी मला समजावते आहे मी, स्वीकारते आहे, त्यात तुला परकं करण्याचा काही मुद्दाच नाही. It is not about you आई, हे माझ्याबद्दल आहे. मी माझ्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिकतेय, त्रास सहन करायला शिकतेय, वस्तुस्थिती स्वीकारायला शिकतेय, तू मला समजून घे, थोडी स्पेस दे ना.”

हेमाला आता उलगडायला लागलं होतं.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: गवती चहा, तुळस व आलं

“माझं तुझ्यावर नेहमीसारखंच प्रेम आहे, पण माझं आयुष्य मलाच जगायचंय, माझा त्रास स्वत:वर घेऊन तू घुसमटू नकोस. मग घरातलं वातावरण बिघडतं, बाबाही अवघडतो. तुम्ही नेहमीसारखे रहा. थोड्या दिवसांनी बद्रीचं नसणं स्वीकारता आलं ना, की मी पण जॉइन होईनच तुम्हाला.” राही म्हणाली.

“खरंच मोठी झालीस गं राणी, मीच लहान मुलीसारखी करत होते. चल, तुला बाहेर जायचंय ना?” राहीच्या हातात तिची पर्स देत हेमा म्हणाली. तिचे डोळे समाधानानं हसत होते. मायलेकीनचं घट्ट नातं आणखी मॅच्युअर होत होतं.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parental care children life responsibilities stress and decisions dvr