डॉ. लीली जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांचं संगोपन खरंच सोपं नसतं. खूप आव्हानं असतात त्याच्यात. एरवीसुद्धा अगदी नॉर्मल मुलांचं वागणं आणि त्यांचे मूडस् वारंवार बदलत असतात. हे बदल आपण दुर्लक्ष करण्यासारखे आहेत, असं म्हणतो. ही एक ‘पासिंग फेज’ आहे असं म्हटलं जातं. पण काही वेळा यातूनच काही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. अलीकडे शहरी भागात, कनिष्ठ आणि मध्यम वर्गात एकंदर सुबत्ता वाढत चाललीय. त्यामुळे कुपोषण, वाढ खुटणे वरचेवर आजारपण या गोष्टी कमी होताहेत. म्हणजे मुलं अधिकाधिक निरोगी होतायत का? शहरांमध्ये ‘लग्न किंवा मूल नको’ असं म्हणणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढते आहे.

मूल झालं तर ते एकच असू दे, आणखी फार तर आम्ही कुत्रं किंवा मांजर पाळतो असं म्हणणारे कमी नाहीत. आई, बाबा दोघेही पूर्णवेळ कामासाठी घराबाहेर असणार किंवा घरातून काम करत असले तरी प्रचंड तास त्यातच मग्न असणार, हे आता गृहीत आहे. अशा परिस्थितीत मुलांमध्ये एकटेपणा, नैराश्य, चिंता, मंत्रचळ अशा मनोशारीरिक विकारांची लक्षणं दिसू लागली आहेत. शाळांमध्ये समुपदेशक उपलब्ध असणं गरजेचं वाटू लागलंय. एकीकडे आहे ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी!’ कपडे, खेळणी, खाद्यपेयं या साऱ्यांची इतकी बेसुमार लयलूट आहे, की कशाचीच किंमत वाटू नये किंवा त्यातलं काय निवडावं ते कळू नये, पण ते दुसऱ्याशी ‘शेअर’ मात्र नाही करायचं! करमणुकीचे कार्यक्रम, चैनीच्या गोष्टी, वाढदिवस, वेगवेगळे ‘डेज्’ यांच्या पार्ट्या या सगळ्याचा अतिरेक होतोय. इतका की त्यातून मिळणारा आनंद अगदी अल्पजीवी ठरावा. आताचे पालक दोघेही उच्चशिक्षित, ‘वर्क हार्ड प्ले हार्ड’ या संस्कृतीचे पाईक.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: सुगंधाचे गंधकोष मरवा, दवणा…

मुलांना खूप साऱ्या महागड्या वस्तू आणून देणं, रोजच्या दिवसाला वेगळे क्लास लावणं, सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या शिबिरांत सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना अडकवून टाकणं, यातच ‘सुजाण पालकत्व’ आहे, असं समजणारे. त्याहून वाईट म्हणजे मुलांना ‘आम्ही तुमच्यासाठी काय काय करतो, किती महागड्या शाळेत तुम्हाला घातलंय, किती प्रकारचे शूज आणून दिलेत,’ हे आणि अशाच प्रकारचं ऐकवणं. यातून येतं अवास्तव अपेक्षांचं ओझं. पालकांच्या महत्त्वाकांक्षेत आपण पुरे पडणार की नाही, वर्गातल्या इतर मुलांच्या मानाने आपण ‘स्कोअर’ करणार की नाही, याचा ताण निर्माण होतो. समवयस्क मुलांचा ताणही कमी नसतो. आपलेच सवंगडी आपल्याला त्यांच्या खेळात सामावून न घेता सारखे ‘तुझ्याकडे काय नाहीत, जे माझ्याकडे आहे’ हेच दाखवतात. भावनाप्रधान मुलांमध्ये यामुळे एक न्यूनगंड तयार होतो. अशी मुलं एकलकोंडी होतात, इतरांच्यात खेळणं टाळतात. जिथे सर्वांमध्ये मिसळण्याची, पुढे होऊन काही करण्याची गरज आहे, तिथे कमी पडतात.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’

अमुक वस्तू नाही म्हणजे कमीपणा असं समजून आईवडिलांच्या मागे लागतात. त्यांच्या या मागणीला नकार मिळाला तर तो पचवायची ताकद त्यांच्यामध्ये नसते. यातली काही मुलं आक्रमक, हिंसक बनतात, काही भित्री, आत्मविश्वासशून्य बनतात. हे सर्व टाळण्यासाठी पालकांनी काय करावं? – मुलांना गरजेच्या वस्तू आणून देणं ही आई बाबांची जबाबदारीच आहे. पण ‘गरज’ म्हणजे नेमकं काय? अतिमहागड्या ‘इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांकडे असणाऱ्या वस्तू पाहिल्या तर अगोदरच्या पिढीला चक्कर येईल. – गरज आणि इच्छा (Need & Want) यातला फरक पालकांनीही समजून घेतला पाहिजे. आणि मुलांना समजावला पाहिजे.

हेही वाचा… कामजिज्ञासा: मेनॉपॉजच्या काळात शरीरसंबंधांचा त्रास होतोय?

आपली शैक्षणिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मुलांच्या शाळेची निवड केली तर फायदा होईल. अपेक्षांचं ओझं कमी होईल. मुलांची प्रत्येक मागणी तत्क्षणी पुरवली पाहिजे असं नाही. वेळप्रसंगी कठोर होऊन नकाराचा हक्कही बजावला पाहिजे. मुलं चतुर असतात. त्यांना सोडून आईवडील कुठे गेले तर ‘बदल्यात’ त्यांना काहीतरी ‘ट्रीट’ मिळणार, मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतं. प्रत्येक वेळी असं करण्याची काहीच आवश्यकता नाही. मुलांच्या विविध उपक्रमांसाठी पालक त्यांना पाठवत असतातच की. योग्य प्रसंगी परीक्षा संपल्यावर, एखादी स्पर्धा संपल्यावर मुलांना मिळणारी छोटीशी वस्तू, किंवा कुटुंबातील सर्वांनी मिळून एकत्र केलेली मजा हेच मुलांसाठी मोलाचं बक्षीस असतं. अशा छोट्या गोष्टीतही संतोष आणि समाधान भरलेलं असतं, हे आईबाबा आणि मुलं, दोघांनाही समजलं पाहिजे.

drlilyjoshi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parenthood child upbringing and parents responsibilities dvr