“अरुंधती, सोनू माझं आजिबात ऐकत नाही, उगाच प्रश्न विचारत बसतो, तू ऑफिसला गेल्यावर तुझ्यासारखं त्याच्याशी बोलणं आणि वागणं मला जमतं नाही. मग माझीही चिडचिड होते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज मनीषाताई सुनेकडं तक्रार करत होत्या. नातू सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाही याचा त्यांना त्रास होत होता. सोनूला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण हवं असायचं. त्याचं समाधान झाल्याशिवाय तो शांत बसायचा नाही. एकदा त्या त्याला म्हसोबाच्या मंदिरात घेऊन गेल्या आणि त्यांनी मूर्तीला नमस्कार करायला सांगितलं तर त्यानं विचारलं, “आजी, याला देव का म्हणतात? तो काय करतो?” परवा त्या जेवायला बसल्या तेव्हा मीठ घ्यायचं विसरल्या म्हणून त्याला द्यायला सांगितलं, तेव्हा तो हातावर मीठ देत होता, त्याला त्या म्हणाल्या, “सोनू हातावर मीठ कधीही देऊ नये.’’ लगेच त्याचे पुढचे प्रश्न, “हातावर मीठ दिल्यानं काय होतं?’’

त्याला काहीही करायला सांगितलं, की त्याचे प्रश्न चालू राहायचे आणि त्याच्यापुढं त्या नेहमीच निरुत्तर व्हायच्या कारण काही गोष्टींची उत्तर त्यांनाही माहीत नसायची. अरुंधती मात्र त्याला सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगायची, त्याचं समाधान होईपर्यंत त्याच्याशी बोलत रहायची. आई वडील जे सांगतात ते मुलांनी ऐकलं पाहिजे, त्यांना प्रतिप्रश्न करू नये, ही साधी गोष्ट तिनं सोनूला शिकवावी, असं मनीषाताईंचं म्हणणं होतं. सोनूचा अभ्यास घेण्यापासून तर त्या जाणीवपूर्वक लांब राहायच्या. ‘छडी लागे छम छम विद्या येई घमघम’असं त्याचं सूत्र होतं आणि आता कुणालाच ते पटण्यासारखं नव्हतं.

मनीषाताईंना कधी कधी वाटायचं, अरुंधती सोनूच्या बाबतीत एवढे पेशन्स कसे ठेवू शकते? काल मॉलमध्ये सामान आणायला गेलो तिथं सोनू एक महागडं खेळणं घ्यायचं म्हणून हट्ट धरून बसला, आई खेळणं घेऊन देत नाही म्हटल्यावर तो तिथंच रडत बसला. तिनं त्याला, ‘आता हे खेळणं घेणं शक्य नाही’, असं समजावून सांगितलं, पण तो ऐकत नव्हता. ती त्याच्यासमोर फक्त बसून राहिली आणि त्याला म्हणाली,“तुझं रडून झालं की सांग, मग आपण घरी जाऊ.” आजूबाजूचे लोक काय म्हणतील? याचा तिनं विचार केला नाही की त्याचं रडणं थांबावं म्हणून त्याचा हट्ट पुरवला नाही, की त्याला ओरडून बोलून धपाटे घातले नाहीत. मुलं ऐकत नाही म्हटल्यावर चार फटके मारून त्याला गप्प करावं एवढंच आपल्याला माहिती आहे, पण हिच्या वागण्याची पद्धतच वेगळी आहे.

हेही वाचा… शासकीय योजना: गर्भवतींसाठी मातृवंदना योजना

सासूबाईंच्या मनात काय चाललं आहे,याचा अंदाज अरुंधतीला आला होता,आज त्यांच्याशी या विषयावर बोलायचं असं तिनंही ठरवलंच होतं.

“आई,मुलांना वाढवताना आता पालकांनाही बदलावं लागणार आहे. तुमच्या वेळी ‘पालकांनी सांगेल ते डोळे झाकून ऐकायचं,’ हे तुम्हांला शिकवलं गेलं होतं. माझ्या लहानपणी पालकांकडं आपलं मत व्यक्त करता येत होतं, पण आताची पिढी अधिक स्मार्ट झाली आहे. त्यांचं शंकासमाधान झाल्याशिवाय ती गोष्ट करणं त्यांना पटतं नाही. ‘ही गोष्ट कर’असं सांगण्यापेक्षा ती गोष्ट केली तर काय फायदे होतील हे त्यांना सांगून, “तुला हे करायचं की नाही, हे तू ठरव,” अशी भूमिका घ्यावी लागते. पालकत्वाच्या संकल्पना आता बदलल्या आहेत. धाक दाखवून गोष्टी करून घेण्यापेक्षा त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांच्याकडून ती गोष्ट कशी करून घेता येईल आणि ती गोष्ट करताना त्यांना आनंद कसा मिळेल हे पाहावं लागतं, म्हणूनच आता शिक्षण पद्धतीही बदलली आहे, पुस्तकातून मुलांना शिक्षण देणं, घोकंपट्टी करून घेणं यापेक्षा त्यांचे व्यावहारिक ज्ञान कसं वाढेल, हे पाहून लहान मुलांनाही शाळांमधून वेगवेगळे प्रोजेक्ट दिले जातात. तो प्रोजेक्ट पूर्ण करताना मुलांचा आणि पालकांचाही संवाद वाढतो. मुलांना समजेल अशा भाषेत मुलांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत.”

नवीन पिढीचं पालकत्व निभावताना स्वतःला कसं अपडेट राहावं लागतं, हे अरुंधती सांगत होती, आजी म्हणून आपल्यालाही बदलावं लागेल आणि सोनूची ‘स्मार्ट आजी’ व्हावं लागेल हे त्यांच्याही लक्षात आलं.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parenting changes according to generation smart generation and their questions dvr