चारुशीला कुलकर्णी
दर्शना जेमतेम १३ वर्षांची… एका जवळच्या लग्नात तिची महेशशी ओझरती भेट झाली… त्यानं ‘विवाहित’ ही त्याची ओळख तिच्यापासून बेमालूमपणे लपवली… शाळा सुटताना रोज दर्शनाची भेट घ्यायची… तिला खाऊ द्यायचा… पुढे पुढे तो वेगवेगळ्या ठिकाणी तिला भेटायलाही बोलावू लागला. शाळेतून येताना रोज होणारा उशीर पाहता हे प्रकरण घरापर्यंत पोहचलं आणि एक धक्कादायक प्रकार समोर आला- तिला त्याचं लग्न झालंय हे कळलं. त्यानं आपल्याला फसवलं हा विचार तिला उद्ध्वस्त करून गेला. पण ‘तो नाही तर मी आत्महत्या करेन’ या अविवेकी विचारापर्यंत ती पोहोचली… पण हे प्रकरण तिच्या आई-वडिलांनी खूप संवेदनशीलपणे सांभाळलं, समुपदेशकाकडून तिला शिक्षण, अभ्यास यांचं महत्त्व पटवून दिलं गेलं. पण ती पुन्हा एकदा कोणाच्या तरी प्रेमात पडली. पुन्हा तेच चक्र सुरू झालं. या प्रकरणानंतर मात्र घरातून तिच्यावर दबाव येऊ लागला. पण ‘त्याला भेटू दिलं नाही तर मी आत्महत्या करेन’ अशी धमकी देऊन ती घरच्यांना ब्लॅकमेल करू लागली. पुन्हा तिला या चक्रातून बाहेर काढण्याचं आव्हान पालक आणि तिच्या समुपदेशकासमोर उभं ठाकलं होतं. समुपदेशक आणि घरातली मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून तिच्याशी अभ्यास, नातेसंबंध, त्याचे होणारे परिणाम यासंबंधी सातत्याने संवाद साधत होते. तिला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू तिला तिची चूक उमगली… आणि आज ती कायद्याचा अभ्यास करतेय…
एक मध्यमवर्गीय कुटुंब… तन्मय उंचीने कमी. मित्रांमध्ये खेळत असताना काही गुंड मित्रांनी बरोब्बर हेरलं … रात्री घरातील मंडळी झोपले की ते त्याला बाहेर बोलवत. मग बंगला, इमारत कुणाच्याही घरात खिडकीतून आत घुसून घर साफ करायचं. यात तो सराईत झाला. चोरीतला आपला हिस्सा घराच्या मागील अंगणात झाडाखाली खोदलेल्या डब्यात लपवून ठेवी. एकदा एका घरात चोरी करताना तो नेमका सापडला. पोलिसीखाक्या दाखवताच त्यानं आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या चोऱ्यांबद्दल सांगितलं. तेव्हा पोलिसांनी डब्बा ताब्यात घेतला. त्यात ४० तोळे सोनं सापडलं. सारेच अवाक…
अशी एक ना अनेक उदाहरणं सभोवताली घडत असतात. हा वयोगट साधारण १० ते १६ मधला. ही मंडळी जेव्हा घरात वावरत असतात तेव्हा घरातच एक छोटं गाव असल्याचा भास पालकांना होतो. त्यांच्या गडबड गोंधळाला टोकले.. त्यांच्या उत्साहाला दिशा द्यायचा प्रयत्न केला तर ‘माझा शब्द खरा’ अशी त्यांची गत. या मुळे या वयोगटातील मुला-मुलींना समजावयाचं कसं असं आव्हान पालकांसमोर आहे. पाळी म्हणजे काय, शरीरसंबंध म्हणजे काय असे काही बाऊन्सर प्रश्न आपल्या मुला-मुलींकडून आले की पालक क्षणभर गोंधळून जातात. त्यांना काय उत्तर द्यावं, उत्तरासाठी शब्दांची जुळवाजुळव सुरू असताना मुलं मात्र अनेक सर्च इंजिनद्वारे किंवा जवळच्या मित्र-मैत्रिणींकडून आपल्या ज्ञानात भर टाकत असतात. मात्र ही धोक्याची पहिली घंटा पालकांच्या लक्षात आली नाही की वेगवेगळ्या अडचणींचा सामना पालकांसह मुला-मुलींनाही करावा लागतो. सध्या नवमाध्यमांचं पेव फुटलं आहे. त्यातच करोनामुळे एरवी काही वेळासाठी मुलांच्या हातात असलेला मोबाइल आता त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्यासारखं झालं आहे. त्यातही फेसबुक, व्हॉट्स अप, इन्स्टाच्या माध्यमातून नव्या ओळखी करायच्या, त्यांच्याशी मैत्री करायची असं वाटणं साहजिक आहे. भिन्न लिंगी व्यक्तीशी ओळख करून घेणं जास्तच कुतुहलाचं वाटतं. मग आकर्षणातून प्रेमाच्या आणाभाका घेण्याचं चक्र सुरू होतं. तर किशोरवयीन मुला मुलींना हाताळायचे कसे ही अनेक पालकांची समस्या होऊन बसली आहे. या वयात शारीरिक – मानसिक बदल होताना मुलांमध्ये चिडचिड, आक्रमकता याला सामोरे जाताना त्यांना न दुखावता त्यांचं भविष्य घडवणं हा एक मोठा प्रश्न पालकांसमोर असतो. अनेक पालक या समस्यांनी चिंतातुर आहेत.
पालकांच्या मनातील भावनिक गुंता सोडवण्यासाठी समुपदेशक वृषाली बिवरे सांगतात, ‘‘मुलांमध्ये होणारे शारीरिक बदल त्यांना वेगवेगळ्या व्याख्यानातून, शाळेच्या धड्यांतून समजत असतात. पण त्यांच्या मानसिक बदलांचे काय? त्यांच्या मनात येणारे प्रश्न, सभोवताली त्यांच्या सोबत काही बरं-वाईट घडत असेल तर त्याविषयी त्यांना मनमोकळेपणानं पालकांशी बोलता यायला हवं. घरात पोषक वातावरण ठेवणं गरजेचं आहे. घरात त्यांच्यासोबत चर्चा करताना मुलांना एखाद्या व्यक्तीविषयी वाटणारे आकर्षण या विषयी मुलांशी बोलताना या वयात या गोष्टींपेक्षा अभ्यास कसा महत्त्वाचा आहे, शिक्षण टाळले तर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, नाते संबंधांचे महत्त्व, माणसांचा स्वभाव कसा ओळखावा, जोडीदार कसा निवडावा या विषयी मनमोकळेपणाने बोलायला हवे. घरातील प्रत्येक चर्चेत मुलांचे मत लक्षात घ्यायला हवे. मुले आपल्याशी बोलत असतील तरच त्यांचा भावविश्वाचा अंदाज येतो. घरात मनमोकळा संवाद हवा.’’
(या लेखातील नावे काल्पनिक आहेत.)