अपर्णा देशपांडे
कायद्यानुसार कुटुंबात पूर्वापार असलेल्या, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सगळ्या मुलांचा समान वाटा असतो. शेती, जमीन, वाडा किंवा इतर स्थावर मालमत्ता, यावर सगळ्या अपत्यांचा समान अधिकार असतो. पण जर हिस्सा समान असेल, तर जबाबदारीची वाटणीही समान हवी. पण तसं फार क्वचित घडतं. ज्या घरात दोन मुलगे आणि एक मुलगी किंवा उलट जरी असेल, तरी जबाबदारी समान रीतीनं सहसा वाटली जात नाही.
थोडा जुना काळ घेतला, तर एकत्र मोठं कुटुंब असायचं. आई-वडील कुटुंबप्रमुख असायचे. त्यांच्या वृद्धापकाळात त्यांची काळजी घेणारे अनेक जण असायचे. आज तशी परिस्थिती नाही. आजचं चित्र वेगळं आहे. घरात नवरा-बायको आणि मुलं याशिवाय कुणी तिसरी व्यक्ती असणं (अगदी आई-वडीलसुद्धा) सहनच होत नाही, अशी गत आहे. पण आई-वडिलांची स्थावर मालमत्ता, सोनं-चांदी, राहतं घर आणि इतर कुठल्याही मिळकतीवर अधिकार मात्र गाजवला जातो, अशी उदाहरणं आजूबाजूला बघायला मिळतात. त्यातलंच एक आज बघू या.
रमेश आणि त्याच्या बहीण- भावाची ही गोष्ट. रमेशचे आई-वडील गावची शेतीवाडी बघत तिकडेच राहात होते. रमेश, उमेश आणि सरिता ही त्यांची तीन अपत्यं तीन शहरात वेगवेगळी राहात होती. तिघांपैकी कुणालाही शेती करण्यात रस नव्हता. ढासळत आलेल्या जुन्या घराची डागडुजी करणं तर दूरच, पण मायबापांच्या आजारपणाशीदेखील त्यांचं देणंघेणं नसल्यासारखं भावंडं वागत होती. आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन करण्यासाठी दोघं उमेशकडे आले, पण उमेशकडून त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली गेल्यानं तशा नाजूक अवस्थेत दुखावलेले दोघं लगेच गावी निघून गेले. वडिलांना बायपास सर्जरी सांगितली असूनही एकाही अपत्यानं त्यासाठी पुढाकार घेतला नाही. सरिता आई-वडिलांना तिच्याकडे घेऊन गेली होती, पण दोन महिन्यांच्या त्यांच्या मुक्कामात तिनं तिच्या अडचणींचा असा पाढा वाचला, की न राहावून तिच्या आईनं हातातल्या सोन्याच्या पाटल्या विकून लेकीला आर्थिक मदत केली होती. त्यानंतर तिनं अल्पावधीतच त्यांना पुन्हा गावी नेऊन सोडल्यावर तिचा कावा आई-वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी खूप त्रास सहन करून तीनही अपत्यांना शिकवून मोठं केलं होतं. मुलं भरपूर कमावती झाली होती, पण त्यांनी गावाकडील शेती आणि घराकडे लक्ष दिलं नव्हतं.
एक काळ असा आला, की रमेशला मुलाच्या शिक्षणासाठी, उमेशला मुलीच्या लग्नासाठी आणि सरिताला नवऱ्याच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रकमेची गरज होती. तेव्हा सगळ्यांना एकदमच गावाकडची शेती आणि घर आठवलं. ‘आपण शेत विकू, त्याचे चार हिस्से करू, तुमच्या वैद्यकीय उपचारांसाठी काही पैसे वापरू आणि बाकीची रक्कम आम्हा तिघांत समान वाटून द्या,’ असा प्रस्ताव वडीलांपुढे ठेवण्यात आला. वडील म्हणजे अनुभवी खोड. ते म्हणाले, “आजपर्यंत या शेताकडे तुम्ही कधी ढुंकूनही बघितलं नाही. तुम्हाला त्यासाठी वेळच नसायचा. पण धान्य मात्र न्यायला येत होतात. तेव्हा सवड मिळत होती. गाडी घेऊन येऊन डिक्कीत गहू, ज्वारी, डाळ नेत होतात. आपले केशव-सगुणा सगळं शेत राखतात, पण त्यांना द्यायला तुमच्याकडे चार पैसे नाहीत. आपल्याला माय-बाप आहेत हे सोयीस्करपणे विसरलेल्या मुलांसाठी द्यायला आता माझ्याकडे काहीही नाही. शेतजमीन वडिलोपार्जित असल्यानं ती माझ्यापश्चात तुम्हाला मिळेल. पण हे घर माझं आहे आणि त्यावर तुमचा अधिकार नाही. आम्ही आहोत तोपर्यंत सगुणा आणि केशव आमची जबाबदारी घेतील. आम्ही त्यांच्या मुलांचं पूर्ण शिक्षण करायचं ठरवलं आहे. आम्हा दोघांच्या मृत्यूनंतर या घराच्या जागेत मुलांसाठी शाळा सुरू व्हावी अशी व्यवस्था मी आताच लावून देणार आहे. तुम्हाला कुणाला आमची जबाबदारी उचलायची नाहीये, पण आमची संपत्ती मात्र तुम्हाला हवी आहे. मी हे खपवून घेणार नाही.”
आपले ‘खेडवळ’ वडील असं काही खणखणीत ऐकवतील, याची तिघांनी कधीच कल्पना केली नव्हती. त्यांच्या मिळकतीवर अधिकार गाजवायला आलेल्या मुलांना आई-वडिलांनी चांगलाच धडा शिकवला होता. या घटनेत आई-वडिलांनाही वाटलं होतं, की आपल्या मुलांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आपण अगदी लहानपणासूनच करून द्यायला हवी होती. तेव्हाच थोडं कठोर व्हायला हवं होतं. मग मुलं अशी एकतर्फी अधिकार गायवायला धजावली नसती.
प्रत्यक्षात घडलेली ही गोष्ट केवळ प्रातिनिधिक आहे. अनेक कुटुंबांमध्ये थोड्याफार फरकानं असेच प्रसंग घडताहेत. व्यक्तीला आपल्या अधिकारांची जाणीव असणं एक प्रकारे चांगलंच असलं, तरी कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदारीची आणि माणुसकीची जाणीवही माणसानं ठेवणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी भावंडांत सामंजस्यानं वाटून घेता येईल, हेच त्यातून अधोरेखित होतं. लहान मुलांच्या मनावर याचा संस्कार करता आला, तर अशा टोकाच्या घटना कमी होतील का?…
(लेखातील नावे बदलली आहेत.)
adaparnadeshpande@gmail.com