सध्या मोठे, ‘शाही’ लग्नसमारंभ साजरे करण्याचं मोठं ‘फॅड’ आहे. यात गेल्या काही काळापासून एक ‘बॉलिवूडी’ ट्रेंड सामान्यांच्या लग्नांमध्येही दिसू लागला आहे, तो म्हणजे वधू-वरांचे फिक्या रंगांचे- ‘फॅशन’च्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘पेस्टल’ रंगांचे पोशाख. ‘सेलिब्रिटीं’पैकी अगदी ताजं उदाहरण द्यायचं तर ते अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आम आदमी’ पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांच्या नुकत्याच झालेल्या विवाहाचं. परिणितीनं आपल्या लग्नात केलेला ‘मिनिमल’ लूक भाव खाऊन गेला आणि त्याची समाजमाध्यमांच्या फॅशन कम्युनिटींवर बरीच चर्चा झाली. परिणीतीचा लहंगा पेस्टल क्रीम रंगाचा होता आणि तिनं त्याला साजेसे भरदार असे हिरव्या रंगाच्या मोठ्या खड्यांचे दागिने परिधान केले होते.
आता एक काळ असा होता, की भारतातल्या वधूंसाठी फिके रंग अजिबातच वापरले जात नसत. बॉलिवूडमध्ये तर ‘शादी का जोडा’ म्हणजे लालच हीच प्रथा आपण चित्रपटांमध्ये पाहात आलो आहोत. लग्नात पेस्टल रंगाचा पोशाख घालण्याचा ‘ट्रेंड’ अभिनेत्री अनुष्का शर्मानं सुरू केला असं मानलं जातं. अनुष्कानं तिच्या लग्नात फिक्या गुलाबी रंगाचा अगदी सुंदर असा लेहंगा घातला होता. अलिकडच्या काळात तर या ‘पेस्टल ब्रायडल’ची लाटच सेलिब्रिटींमध्ये आली आणि अर्थातच त्याचा परिणाम म्हणजे ‘सेलिब्रिटी’ नसलेल्या मुली-स्त्रियाही लग्नांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर पेस्टल रंगच वापरू लागल्या आहेत. मोठमोठे डिझायनर्सच नव्हे, तर सामान्यांसाठी घाऊक दरात लग्नांचे पोशाख उपलब्ध करून देणाऱ्या मोठ्या दुकानांमध्येही आता पेस्टल रंगाचे वधूंचे पोशाख मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत.
हेही वाचा – गच्चीवरची बाग: निसर्गाचा चमत्कार बांबू
अलिकडे अभिनेत्री कियारा अडवाणीनं पेस्टल रोझ रंगाचा लहंगा परिधान करून त्यावर हिरव्या रंगाचाच रत्नजडित भासणारा हार घातला होता. आलिया भटच्या लग्नातल्या क्रीम रंगाच्या पोशाखानंही ‘नेटकऱ्यां’चं मन जिंकून घेतलं होतं आणि तिचं ‘क्लासी लूक’साठी खूप कौतुक झालं होतं. अथिया शेट्टी हिनंही लग्नात पीच-पिंक रंगाचा पूर्ण बाह्यांचा जरदोसी ब्लाऊज व लहंगा परिधान केला होता. आणि अभिनेत्री कतरीना कैफनं लग्नात नेसलेली झुळझुळीत अशी पेस्टल पिंक रंगाची फुलाफुलांची साडी तुम्हाला आठवतच असेल.
फॅशन तज्ञांच्या मते पेस्टल रंग हलके असल्यामुळे ते अजिबात डोळ्यावर येत नाहीत. रंग ‘सॉफ्ट’ असल्यानं प्रसंगाच्या ‘रोमॅन्टिक फील’ला तो चपखल साजेसा ठरतो. शिवाय पेस्टल रंगाच्या लग्नाच्या पोशाखांमध्ये प्रामुख्यानं हलक्या वजनाचीच कापडं (फॅब्रिक्स) डिझायनर्स वापरतात. ऑरगॅन्झा, टिश्यू यांसारख्या हलक्या वजनाच्या फॅब्रिक्सबरोबर शिफॉनसारखी झुळझुळीत फॅब्रिक्सही वापरली जातात. यातही पेस्टल रंगातही अंगचीच सौम्य चमक असलेली फॅब्रिक्स ‘मिक्स अँड मॅच’ करून निवडली जातात. त्यामुळे पोशाख आणखी खुलतो. पेस्टल रंगाच्या पोशाखांना साजेसाच मेकअप आणि इतर स्टायलिंग केलं जात असल्यानं ‘शाही आणि क्लासी’, पण तरीही सौम्य असा ब्रायडल लूक तयार होतो.
आजवर लग्नांच्या साड्या निवडताना विविध जातीधर्मांप्रमाणे काही ना काही वैविध्य जरी पाळलं, तरीही किमान ‘रीसेप्शन’ला ठळक उठून दिसेल, अशा गडद रंगांचे, उंची कापडांचे, झगमगीत पोशाखच निवडण्याकडे वधू-वरांचा कल असे. परंतु सेलिब्रिटींनी तो आता जवळपास बदलून टाकला आहे असंच म्हणता येईल. तुम्हाला लग्नाचा पोशाख कसा आवडतो? ठळक, गडद रंगाचा की पेस्टल?…
lokwomen.online@gmail.com