असं म्हणतात की स्त्री एक शक्ती आहे की तिने मनाशी काही ठरवले तर ती अशक्य गोष्ट सुद्धा करू शक्य करू शकते. महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरणचे अनेक उदाहरणे आपण ऐकतो किंवा वाचतो. आज महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यास भरपूर संधी आहे फक्त तिला गरज आहे ते प्रोत्साहन देण्याची. जेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेला प्रोत्साहन देते तेव्हा जी स्त्री शक्ती तयार होते त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनीच महिलांसाठी पुढे येणे गरजेचे आहे. आज आपण अशाच एका पाटील काकीविषयी जाणून घेणार आहोत, ज्या फक्त स्वतःच्या पायावर उभ्या नाहीत तर त्यांनी अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अनेक महिलांच्या प्रेरणास्थान असलेल्या या पाटील काकी समाजासाठी एक आदर्श आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत या पाटील काकी?

या पाटील काकीचे नाव आहेत स्वाती बाळासाहेब पाटील. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील भीमानगर गावच्या या काकी. लोकसत्ताशी बोलताना त्या म्हणाल्या, “२००८ साली आम्ही महिला बचत गटाची स्थापना केली. तिथून पुढे आम्ही बचत गटाच्या मदतीने छोटी मोठी कामे केली. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही ५००० वृक्ष लागवडीचे काम केले. २०१० मध्ये संजय गांधी निराधार योजना/श्रावणबाळ पेंशन योजनेअंतर्गत घटस्फोटीत महिलांना पगार सुरू केला. हे कामकाज आजतागायत सुरू आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून शिव मान, पिठाची चक्की, शिलाई मशिन, पिको फॉल मशिन, मुलींना सायकल, गॅस अशा अनेक योजनेचा लाभ मिळवून दिला. शासनाची कामे हाती घेतली मग ते जेवणाचे टेंडर असो किंवा स्टेशनरी असो आम्ही सर्व कामे करत गेलो. आम्ही खानावळ सुरू केली. मसाले उद्योग सुरू केला. शेवई बनविणे, चिप्स पापड बनविणे, अशाप्रकारे अनेक छोटे मोठे उद्योग सुरू करून मी ५०-६० महिलांना रोजगार मिळवून दिला.”

व्हायरल व्हिडिओ

पाटील काकीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये काकी महिलांना घेऊन १०० किलो पोहे बनवताना दिसत आहे. या संदर्भात स्वत: पाटील काकी सांगतात, “नुकताच महिला मेळावानिमित्त बिकेसीला स्टॉल्स लागलेले होते. त्या सर्व स्टॉल्सच्या खाण्यापिण्याचं आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. सकाळी चहा-नाश्ता आणि दुपारी जेवण होते. नियमित दीड हजार लोकांसाठी आम्ही जेवण आणि नाश्ता बनवायचो. हे काम मी बचत गटामार्फत घेतले होते, जेणेकरून माझ्या गावातील महिलांना काम मिळायला पाहिजे. अशा प्रकारे आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेत असतो, ज्यामुळे महिलांना भविष्यात रोजगाराच्या संधी मिळाव्यात. पाटील काकी पुढे सांगतात, “प्रत्येक महिलेने आपल्या पायावर सक्षम उभे राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.”

पाटील काकीच्या मदतीने या महिला महिन्याला १५- २० हजार रुपये कमावतात. पाटील काकीसारख्या महिला प्रत्येक गावात असतील तर महिला सहज सक्षम होऊन आपल्या पायावर उभ्या राहतील. ग्रामस्वच्छता अभियान, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, लेक वाचवा अभियान असे विविध कार्यक्रम राबवून महिलांना प्रोत्साहान देण्याचे काम पाटील काकी करतात. त्यांच्या या कामाची पावती म्हणून त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पाटील काकी एक आशेचा किरण आहे, जे गाव खेड्यातील महिलांना नवी दिशा दाखवत आहेत. पाटील काकीच्या या कार्याला खरच खूप मोठा सलाम.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patil kaki in solapur district who provides employment to the women and helps to stand on their own feet know more about swati patil ndj