“आज संध्याकाळी मस्त मद्रास कॉफी घेत गप्पा मारू या.” सुनिधीच्या मेसेजप्रमाणे ऋता कॅफेमध्ये तिची वाट पाहत होती. बऱ्याच उशिराने सुनिधी उगवली ती तडतड करतच. “कसे असतात गं हे लोक? कधीही भेटले तरी तोच विषय. ‘तुम्ही दोघं वेगळं झाल्याचं कळलं. आम्हाला खूप वाईट वाटलं गं. तुलाही त्रास होत असेल ना? आमच्यासाठी तुम्ही आदर्श कपल होतात. असं काही घडेल असं वाटलंच नव्हतं. आता काय चाललंय सोहमचं? जरा तरी पश्चात्ताप झालाय का?’ एवढंच बोलत राहतात भेटल्यावर.” पर्स आदळत सुनिधी म्हणाली.

“कोण भेटलं आज ?” ऋताने विचारलं.

“दुसरं कोण? तेच येडे दोघं. विक्रांत आणि विशाखा. अरे, तुम्हाला आम्ही आदर्श कपल वाटलो त्याला मी काय करू? आणि सोहमला पश्चात्ताप झालाय की नाही हे मला का विचारता? माझं सध्या काय चालू आहे? याबद्दल चौकशीही नाही. फालतू टाइमपास आणि उशीर.” सुनिधी चिडली होती.

“मलाही एक-दोनदा विचारलं होतं त्यांनी. त्यांना खरंच वाईट वाटलंय गं.” ऋताने तिला शांत करायचा प्रयत्न केला, पण सुनिधी जास्तच भडकली. “तुझ्याशी पण माझ्याबद्दलच बोलले का? दुसरे विषय नाहीत का जगात?”
“अगं, लोक आपलेपणाने विचारतात. किती चिडतेस…”
”मी जो विषय आणि ज्या आठवणी प्रयत्नपूर्वक मागे टाकते आहे, मूव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करते आहे तिथे मदत न करता हे लोक तोच विषय काढून पुन्हा पुन्हा मला भूतकाळात ढकलतात म्हणून माझा संताप होतो. मित्र म्हणवतात तर इतकी साधी अक्कल नसावी का?” सुनिधीची ही चिडचिड ऋतासाठी नेहमीची होती. आज मात्र तिनं त्याबद्दल बोलायचं ठरवलं.
“निधी, तू माझ्याजवळ अशा लोकांबद्दल कितीही खवळलीस, तरी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलताना मात्र तू नॉर्मल असतेस किंवा गप्प बसतेस.” निधी जरा शांत झाल्यावर ऋता म्हणाली.
‘‘माझ्याशी बोलू नका असं तोंडावर सांगून जवळच्या लोकांचा अपमान करायचा? मला नाही बाई जमणार.”

हेही वाचा… जागरुकता वाढली अन् तक्रारीही! महिलांविरोधातील अन्याय थांबणार तरी केव्हा?

“तसं नाही. तुम्ही दोघे वेगळे झाल्याला आता दीड वर्ष होईल. अजूनही त्याबद्दल कोणी काही विचारलं की तू तेवढाच त्रास करून घेतेस. मनातल्या मनात घुसमटत राहतेस. त्याऐवजी वेगळं पण काही तरी करता येईल की नाही?”

“काय करायचं?”

“लोकांनी काय बोलावं ते असंही तुझ्या हातात नाही, पण तू काय बोलावंस ते तर आहे ना?”

“अगं पण या भोचक लोकांना कळायला नको का?”
“अगं, हे लोक म्हणजे काय एकच एन्टीटी आहे का? ज्यांना कळतं ते तो विषय काढतच नाहीत. काही जणं भोचकपणे विचारत असतीलही, पण अनेकदा तुझ्याबद्दलचा आपलेपणा / कन्सर्न दाखवण्याची ती एक पद्धत असते. काही लोकांकडे बोलण्यासारखं दुसरं काही नसतं म्हणून बोलतात. कोणीही कुठल्याही हेतूने बोलू दे, ‘मला यावर बोलायचं नाहीये’ हे तुला दीड वर्षानंतर तरी स्पष्टपणे व्यक्त करता यायला नको का?”

“समोरच्याला न दुखावता कसं सांगणार?”
“सोपं आहे. ‘सोहमचं काय चाललंय? यावर, मला कल्पना नाही, तुम्ही सोहमलाच विचारा’ असं म्हणून त्यांचा बॉल त्यांच्या कोर्टात टाकू शकतेस. किंवा ‘आपल्याकडे याहून चांगले विषय नाहीत का बोलायला?’ अशी थोडी तिरकसपणे जाणीव करून देऊ शकतेस. ‘आपण या विषयावर प्लीज बोलायला नको. मला त्रास होतो.’ असंही प्रांजळपणे सांगू शकतेस. प्रत्यक्ष त्या माणसापाशी काहीच व्यक्त करायचं नाही आणि आतमध्ये उकळत राहायचं हा तुझा पॅटर्न दीड वर्षानंतर तरी बदलायला नको?”
“खरं आहे गं, कुणाशी वाईट वागायचं नाही म्हणजे खोटं गुडी गुडी वागायचं असं होत होतं माझं. मनातल्या मनात रिॲक्ट होत राहण्याऐवजी समोरचा माणूस पाहून आपला रिस्पॉन्स निवडायचा स्मार्ट चॉइस असू शकतोच की. मला हे सुचलंच नव्हतं ऋता. उत्तराचे पर्याय सुचवल्याबद्दल थँक यू गं! आता मी नीट विचार करून रिस्पॉण्ड करेन. आजची कॉफी माझ्याकडून.” सुनिधीचा ताण हलका झाला होता.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत.)
neelima.kirane1@gmail.com

Story img Loader