थायलंडच्या पंतप्रधानपदी पेतोंगतार्न शिनावात्रा यांची नुकतीच निवड झाली. शिनावात्रा या फक्त ३७ वर्षांच्या आहेत. आणि त्या थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच थायलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान स्रेथा थविसिन यांना पदावरून बडतर्फ केलं होतं. नैतिकतेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एका आरोपीला कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. स्रेथा यांच्यानंतर थायलंडच्या संसदेनं शिनावात्रा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली.
शिनावात्रा यांना घरातूनच राजकीय वारसा लाभला आहे. थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्या त्या सगळ्यांत लहान कन्या आहेत. शिनावात्रा यांच्या वडिलांशिवाय त्यांच्या आत्या यिंगलिक याही थायलंडच्या पंतप्रधान होत्या, तर त्यांचे काका सोमचाई वाँगस्वॅट २००८ मध्ये अगदी थोड्या काळासाठी पंतप्रधान होते. शिनावात्रा या थायलंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. पंतप्रधानपदी नियुक्ती होणाऱ्या त्यांच्या कुटंबातील त्या तिसऱ्या व्यक्ती आहेत. शिनावात्रा यांचे वडील थाकसिन २००१ अमध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. २००६ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर त्यांना निर्वासित करण्यात आलं. १५ वर्षांचा निर्वासन काळ संपवून ते गेल्याच वर्षी देशात परत आले होते. सत्तेवर नसले तरीही ते थायलंडमधील अत्यंत प्रभावी नेते मानले जातात.
हेही वाचा – निसर्गलिपी : पाणलिलींचे प्रकार आणि वैशिष्ट्ये
राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी आतापर्यंत पेतोंगतार्न यांनी कधीही सरकारमध्ये प्रत्यक्ष काम केलेलं नाही आणि आता त्या थेट पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. प्रत्यक्ष पदावर काम केलेलं नसलं तरीही त्या थायलंडमध्ये लोकप्रिय असल्याचं सांगितलं जातं. गेल्या निवडणुकीत गरोदर असतानाही त्यांनी पक्षाच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जेव्हा त्यांना प्रवास करणं शक्य नव्हतं तेव्हा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी जनतेशी संपर्क साधला. २०२३ च्या निवडणुकीच्या दोन आठवडे आधी त्यांच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. पेतोंगतार्न यांच्या प्रभावी प्रचारामुळेच त्यांचा पक्ष या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता.
बँकॉकमध्ये जन्मलेल्या पेतोंगतार्न राजकारणात येण्यापूर्वी कुटुंबाचा हॉटेल व्यवसाय चालवत होत्या. उंग वांग या टोपणनावाने त्या ओळखल्या जातात. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्रामध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ सरे येथून आंतरराष्ट्रीय हॉटेल मॅनेजमेंटची पदवीही घेतली. त्या थायकॉम फाऊंडेशनच्या संचालक आहेत.
२०२१ मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. त्याचवेळेस पेतोंगतार्न यांची ‘फेऊ थाई फॅमिली हेड’ म्हणून निवड केली. त्यामुळे त्या फेऊ थाई पार्टीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार ठरल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे थायलंडच्या राजकारणात नवचैतन्य आल्याचं मानलं जातंय. त्यांच्या फेऊ थाई या राजकीय पक्षातही नवीन चैतन्य निर्माण झाल्याचं पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटतंय. उच्चशिक्षित असलेल्या थायलंडच्या या तरुण पंतप्रधानांसमोर बरीच आव्हानंही आहेत. देशाची आर्थिक स्थिती सुधारणं हे त्यातलं सगळ्यांत मोठं आव्हान आहे. निवडणुकीचा प्रचार करताना त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती. महागाई कमी करण्याबरोबरच बँकॉकमधील सार्वजनिक वाहतुकीचे दर कमी करणं, आरोग्यसेवेत सुधारणा आणि वेतन दुप्पट करणं ही त्यातील महत्त्वाची आश्वासनं होती. आता आपली वचनं पूर्ण करण्यासाठी त्या कशा प्रकारची धोरणं राबवतात हे महत्त्वाचं आहे. त्यांच्या राजकीय पक्षाच्या लागलेली मरगळ थांबवणं हेही त्यांच्यापुढचं मोठं आव्हान आहे. थायलंडचे अन्य देशांशी असलेले संबंध सुधारणं हेही आव्हान सोपं नाही. फेऊ थाई पक्षाची लोकप्रियता विरोधकांच्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे ही प्रतिमा अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न करणं हेही मोठं आव्हान आहे. पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी जनतेचे आभार मानले आणि देशाच्या विकासासाठीच बांधिल असल्याचा विश्वासही व्यक्त केला. ‘मी माझ्या देशाला सतत पुढे नेण्यासाठीच प्रयत्न करत राहणार. या पदावर नियुक्ती होणं हा मी माझा सन्मान मानते आणि मला खरंच खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजकारणाचा वारसा लाभला असला तरी त्यांना स्वत:ला सिध्द करावं लागणार आहे. त्यांच्या आडून वडीलच सरकार चालवतील असा आरोपही होतोय. हा आरोप खोडून काढून स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणं हेही त्यांच्यापुढचं सगळ्यांत मोठं आव्हान असेल.