ब्रिटनमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्व ठरलेल्या प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूला २५ वर्षे उलटल्यानंतरही जगभरात तिचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. एखाद्या चित्रपटासाठी शोभेल अशीच तिच्या आयुष्याची कहाणी होती. तिचं आयुष्य जेवढं प्रसिद्ध होतं, तेवढाच तिचा मृत्यू गूढ होता. ‘प्रिन्सेस ऑफ वेल्स’ डायनाच्या मृत्यूच्या अडीच दशकांनंतर आता तिच्या डाव्या हाताच्या दुर्मिळ प्लास्टर शिल्पाचा लवकरच लिलाव होणार आहे. या शिल्पासाठी ४० हजार पौंड म्हणजेच जवळपास ९२ लाख ६२ हजार रुपयांची बोली लिलावाच्या आयोजकांनी लावली आहे.
Women Health: योनीतुन होणाऱ्या स्रावाचा रंग कोणता असावा? गंभीर आजाराची प्रमुख लक्षणे वेळीच ओळखा
डायनाच्या हाताच्या प्रतिकृतीत लग्नाची अंगठीदेखील दिसून येते. या प्रतिकृतीचा लिलाव एसेक्स या शहरातील ‘रीमन डँन्सी’मध्ये आठ नोव्हेंबरला होणार आहे. प्रसिद्ध क्रोएशियन शिल्पकार ऑस्कर नेमोन यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी १९८५ मध्ये डायनाच्या हाताची प्रतिकृती तयार केली होती. २४ सेंटीमीटर लांबीचे हे शिल्प अत्यंत दुर्मिळ आणि अद्वितीय असल्याचं लिलावाच्या आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.
“प्रिन्सेस डायनाच्या हाताची ही अनोखी प्रतिकृती तिच्या हयातीत तयार करण्यात आली होती. तिची परवानगी आणि सहकार्यातून या प्रतिकृतीनं आकार घेतला आहे. म्हणूनच ही प्रतिकृती अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ आहे”, अशी माहिती ‘रीमन डँन्सी’ या कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर दिली आहे.
डायनाच्या हाताची प्रतिकृती कशी तयार करण्यात आली?
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चा वापर करुन डायनाच्या हाताची प्रतिकृती तयार करण्यात आली. यासाठी लिक्विड सिलिकॉनचा वापर करण्यात आला आहे. लिक्विड सिलिकॉनमध्ये हाताचा ठसा घेतल्यानंतर ऑस्कर नेमोन यांनी ही प्रतिकृती तयार केली. मृत्यूपूर्वी नेमोन यांची प्रिन्सेन डायनासोबत सेंट जेम्स पॅलेसमध्ये भेट झाली होती. या भेटीत हा हातांचा मोल्ड तयार करण्यात आला.
दिग्गजांच्या शिल्पांना आकार देणारे ऑस्कर नेमोन…
ऑस्कर नेमोन यांनी राजघराण्यातील व्यक्तींच्या शिल्पकृती तयार केल्या आहेत. ब्रिटनच्या दिवंगत सम्राज्ञी एलिझाबेथ द्वितीय, त्यांच्या आई आणि प्रिन्स फिलिप यांच्या शिल्पांना नेमोन यांनी आकार दिला आहे.
तो’ Metrosexual आहे म्हणजे… अशी मुलं ज्यांना स्त्रियांचे…
दरम्यान, एसेक्समध्ये होणाऱ्या लिलावात ब्रिटनचे दिवंगत माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्याही शिल्पकृतीचा लिलाव होणार आहे. हा लिलाव अंदाजे पाच हजार ते सात हजार पौंडमध्ये होऊ शकतो, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. “विसाव्या शतकातील दोन सर्वात प्रसिद्ध व्यक्ती” अशा शब्दात या व्यक्तिमत्वांचा आयोजकांनी गौरव केला आहे. या प्रसिद्ध व्यक्तींच्या दुर्मिळ शिल्पांचा लिलाव करणं, अत्यंत अद्भूत भावना आहे, अशी प्रतिक्रिया ‘रीमन डेन्सी’चे रॉयल स्पेशलिस्ट जेम्स ग्रिंटर यांनी दिली आहे.