मे महिन्यात पार पडलेल्या ‘नॅशनल अमेरिकन मिस अलाबामा २०२४ पॅजन्ट’ची विजेती ही एक प्लस साईज मॉडेल, सारा मिलिकेन बनली आहे. या २३ वर्षीय मॉडेलच्या यशाचे कौतुक सर्वत्र होत असताना मात्र साराचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कारण तिच्या दिसण्यावरून अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले होते. मात्र, तिला नावं ठेवणाऱ्यांना, ट्रोलर्सना साराने अगदी समजूतदारपणे आणि हुशारीने प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर साराने ट्रोलर्सना सौंदर्य हे प्रत्येक आकारात आणि रंग-रूपात येते, त्यामुळे प्रत्येकाचा आदर करणे गरजेचे आहे, अशी समजदेखील दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहे सारा मिलिकेन?

सारा मिलिकेन ही अलाबामामधील एटमोर येथील [Atmore] एक मॉडेल आहे. या सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्याची तिची ही पहिली वेळ नाही. याआधी साराने दोन वेळा हे क्राऊन पटकावण्यासाठी स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र, अखेरीस तिला तिसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त करता आले. या स्पर्धेत भाग घेण्याआधी तिचा आत्मविश्वास डळमळीत करणारी एक प्रतिक्रिया तिला ऐकावी लागली होती. “स्पर्धेच्या काही दिवस आधी मला एका मुलाने म्हटले की, स्पर्धा जिंकण्यासाठी मी मुळीच सुंदर दिसत नाही. हे ऐकून मला खूप वाईट वाटले आणि माझा आत्मविश्वास खालावला होता”, असे साराने आपला अनुभव सांगताना म्हटले असल्याचे इंडिया डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : शेतकऱ्याची लेक, अकरावीत अनुत्तीर्ण; मात्र MPPSC परीक्षेत जिद्दीमुळे पटकावला ६ वा क्रमांक! पाहा तिचा प्रवास…

लोकांच्या अशा प्रतिक्रियांमुळे सारा तब्ब्ल सात वर्षे रॅम्पपासून दूर राहिली होती. मात्र, २३ व्या वर्षी साराने पुन्हा एकदा सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायचे आणि आपली उत्तम कामगिरी करण्याचे ठरवले आणि हा तिचा निर्णय सर्वोत्तम ठरला. तिने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळेच ती ‘२०२४ मिस अलाबामा’ बनण्यात यशस्वी झाली. “मी NAM च्या स्टेजवर पुन्हा येऊन हे सिद्ध केलं आहे की, मी अजूनही हार मानलेली नाही. मी हे करू शकते. मला मारण्यात आलेल्या टोमण्यांपेक्षा मी बरंचकाही करू शकते”, असे सारा म्हणते.

साराने तिच्या पॅजन्ट प्लॅनेट प्रोफाइलमध्ये सांगितले होते की, तिला पहिली प्लस साईज NAM मिस अलाबामा मॉडेल बनायचे आहे आणि इतर स्त्रियांना दाखवून द्यायचे आहे की, आपण मनात एखादी गोष्ट ठरवली तर ती सहज साध्य करता येते. “मला या सौंदर्य स्पर्धांच्या विशिष्ट विचारांना खोडून काढायचे होते आणि स्त्रियांना दाखवून द्यायचे होते की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी रंग-रूपाचा किंवा आकाराचा अडथळा येत नाही”, असे सारा म्हणते.

सारा मॉडेल म्हणून काम करत असून, तिचा स्वतःचा ‘गर्ल्स गॉटा स्लो’ [Girls Gotta Slow] नावाचा एक पॉडकास्टदेखील आहे, ज्यामध्ये ती दर आठवड्याला शरीराबद्दल सकारात्मक विचार, मानसिक आरोग्य आणि महिला सक्षमीकरण व गर्लहूडबद्दल चर्चा करते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी आमंत्रण असलेल्या ऐश्वर्या एस मेनन, सुरेखा यादव कोण? पाहा…

सारा मिलिकेनचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

साराने तिला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना कुशलतेने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे ती जागतिक पातळीवर चर्चेत होती. जिथे अनेकांनी साराला नावं ठेवली, तिथेच अनेकांनी तिचे कौतुक/समर्थनदेखील केले असल्याचा साराच विश्वास आहे.

“तुम्ही इंटरनेटवर जे लिहिता त्याचा लोकांवर कायमस्वरूपी प्रभाव पडू शकतो”, असे साराने तिच्यावर केल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना सांगितले. “तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, तुम्ही कुठून आला आहात किंवा तुम्ही कसे दिसता हे महत्त्वाचे नसते. तुम्ही तुमच्या मनाशी ठरवलेली गोष्ट नक्कीच साध्य करू शकता”, असे साराने WKRG या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले.

“अशा गोष्टी घडण्यापासून रोखण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे दयाळूपणा. तुम्ही जर एखाद्याबद्दल चांगलं काही बोलू शकत नसाल, तर मग त्याबद्दल काहीच बोलू नका; अशी आमच्या आईची शिकवण आहे. जिद्दीने एखादी गोष्ट करायची ठरवली की तुम्ही कसे दिसता, तुम्ही कुठून आला आहात या कोण्यात्याही गोष्टी अजिबात महत्त्वाच्या नसतात”, असे सारा स्पर्धा जिंकल्यानंतर म्हणाली.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plus size model sara milliken wins the national american miss alabama 2024 pageant slammed trolls with grace dha