चारुशीला कुलकर्णी
दारूबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आता महिला पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे आणि त्या हे काम सक्षमपणे करू लागल्या आहेत. त्यांच्या कामाविषयी आम्ही जाणून घेतलं आणि या स्त्रियांशी बोलताना काही रंजक गोष्टी समोर आल्या…
कधी एखाद्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी तीन-चार कि.मी. भर उन्हात पायपीट करावी आणि तिथे गेल्यावर हाती काहीच लागू नये! उलट ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जाण्याची वेळ यावी… कधी एखादा दारू अड्डा उध्वस्त केल्यावर गावातील स्त्रियांनी आपणहून रस्त्याकडेच्या झाडाचं फूल तुमच्या हातात देत ‘तुमच्यामुळेच हे शक्य झालं’ असं मनापासून सांगावं. हे अनुभव आहेत नाशिक ग्रामीण पोलीस दलातल्या महिला पोलीसांचे.
हेही वाचा… बॉईजना खुपणारी ‘वूमन’ – मीमची मस्करी होतेय का कुस्करी?
एरवी गाव असो वा शहर, आपल्या खिशाचा अंदाज घेत बऱ्याच ठिकाणी हातभट्टीमध्ये मिळणारी स्वस्त दारू लोक रिचवतात. महत्त्वाचं असं, की हे अड्डे चालवणाऱ्यांमध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. हातभट्टीच्या चोरट्या धंद्यात दारूतून विषबाधा झाल्याची उदाहरणं तर आहेतच, परंतु घरातल्या पुरूषाचा जवळपास सर्व पैसा दारूत जाऊन, दारूमुळे कौटुंबिक हिंसाचाराला आणखी चालना मिळून अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक गावांत हे सहन केलेल्या स्त्रियांनी पुढाकार घेऊन दारूबंदी व्हावी असे प्रयत्न केले. मात्र अजूनही खूप गावांत हातभट्टीच्या दारूचा अवैध व्यवसाय सुरू आहेच.
हातभट्टीची ठिकाणं जंगल परिसर, दरी-कपारी, डोंगराच्या पायथ्याशी अशी असतात. अशा ठिकाणी छापा टाकण्यात जोखीम असते. नाशिक जिल्हा परिसरात ग्रामीण पोलीस दलानं पुढाकार घेतला आणि जिल्हात भरारी पथकं तैनात केली. या पथकांचं वैशिष्ट्य असं, की प्रत्येक पथकात आठ महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला. यासाठी विशेष अभियान ग्रामीण पोलीसांनी हाती घेतलं. पहिल्यांदाच थेट कारवाईत महिलांचा समावेश असल्यानं त्यांच्यासाठीही हा अनुभव रोमांचकारी आहे. त्यांना यात सहकाऱ्यांची, वरिष्ठांची तसंच खूप ठिकाणी स्थानिकांची मदत होत आहे, त्यामुळे या स्त्रियांचा कामाचा उत्साह वाढलाय.
हेही वाचा… भारताच्या ‘सोलर विमेन’!
या पथकातल्या चित्रा जाधव यांनी सांगतात, “हे खरं जोखमीचं काम आहे. पहिल्यांदा या प्रकारची जबाबदारी आम्हाला दिली आहे. आमच्या सुरक्षेसाठी एक शस्त्रधारी सुरक्षारक्षक देण्यात आला आहे. बऱ्याचदा मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला जातो. लांबवर गाडी लावून आम्ही सर्व लपूनछपून अड्ड्यावर जाताे. काही पोलीस पोषाखात असतात, तर काही सिव्हिल ड्रेसमध्ये. त्या वेळी पोलीस पाटील, गावातील काही सामाजिक कार्यकर्ते, हेही सोबत असतात. काम करताना काही ठिकाणी विरोध होतो, काही ठिकाणी पोलीस येणार हे समजल्यानं हातभट्टीचं सामान तिथेच टाकून लोक पोबारा करतात. महिला पोलीसांना पाहून गावातील लोकही काही वेळा मवाळ होतात. तेव्हा त्याचा फायदा होतो. हे सर्व काम सोपं नाहीये.”
या महिला पोलिसांच्या कुटुंबियांचं या कामाबद्दल मत काय, असं विचारल्यावर चित्रा म्हणतात, “माझे पतीही पोलीस दलात कार्यरत असल्यानं त्यांना कामातील धोका, स्वरूप माहिती आहे. राहिला प्रश्न मुलांचा, तर त्यांना त्यांची आई ‘सुपर मॉम’ वाटते! आमच्या कारवाईचे फोटो, क्लिप्स पाहून मुलांना आनंद होतो. ‘आई कारवाईला गेलीय… ती चोरांशी फाईट करते…’ अशी काही तरी बडबड मुलांची सुरू राहते!”
हेही वाचा… आहारवेद : निरोगी शरीरासाठी हळद
पोलीस दलातील पुरूष सहकारी, अधिकारी यांची मोहिमेसाठी मदत होतेय. त्यामुळे कामाचा हुरूप वाढतो, असं या महिला पोलीस सांगतात. सार्वजनिक स्तरावर दारूच्या व्यसनाचा त्रास स्त्रियांनाच सर्वाधिक होत असतो, कारण एक जरी दारूचा व्यसनी माणूस घरात असला, तरी संपूर्ण कुटुंबावर त्याचे परिणाम होत असतात. त्यामुळे स्त्रियांच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठी हे प्रयत्न असताना बरं वाटतं, असं सोनाली केदार सांगतात. या महिला पोलीसांच्या कुटुंबातल्या सदस्यांना या कारवाईची माहिती वेगवेगळ्या बातम्यांमधून होते, तेव्हा ‘जीवाला जपा, तुम्ही खूप छान काम करताय. आम्हाला अभिमान वाटतो,’ अशा प्रतिक्रिया त्यांना मिळताहेत. ते ऐकून यांना जो आनंद होतो, तो शब्दांत व्यक्त करण्यासारखा नसतो.
‘त्या’ चार दिवसांत (अर्थात मासिक पाळीच्या काळात) काही अडचणी येतात का, याचं उत्तर देताना मात्र महिला पोलीस अवघडतात. पण त्यांनी या प्रश्नावर आपल्या परीनं पर्यायही शोधलाय. कामाचं महत्त्व आणि वेळ लक्षात घेता एखाद्या स्त्रीला जर मासिक पाळीमध्ये फारच त्रास होत असेल, तर तिच्यावरचा कामाचा ताण हलका व्हावा यासाठी तिचं काम दुसऱ्यानं हलकं करणं, तिची दगदग कमी करणं, हे प्रयत्न होतात. चार दिवस सवलत मिळावी अशीही अपेक्षा या स्त्रिया व्यक्त करत नाहीत. फक्त ‘आम्हाला थोडं समजून घ्या!’ एवढीच त्यांची मागणी.
या स्त्रियांची कामगिरी उत्तम चालेल आणि राज्यात इतर ठिकाणीही महिला पोलिसांना अशा कामासाठी प्रोत्साहन आणि सहकार्य मिळेल हीच सदिच्छा!
lokwomen.online@gmail.com