डॉ. रश्मी जोशी शेट्टी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेत्रा नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाली. स्टेशनवर ट्रेनची वाट बघत असताना तिला तिच्या वडिलांचा फोन आला. काहीतरी महत्वाचे सांगायचे असेल म्हणून नेत्राने तातडीने तो उचलला, कारण ऑफिसच्या वेळी वडील फक्त मेसेज करत असत. नेत्रा तिचा भाऊ, वहिनी, त्यांची दोन मुलं आई वडिलांबरोबर आनंदाने राहात होती. त्यातच वडिलांनी नेत्राची वहिनी खाली पडली असे सांगून तिला मदतीसाठी घरी बोलावले. एकदा सोडून दोन तीन वेळा फोन केला आणि नेत्रा त्यांना धीर देत म्हणाली, “अहो येते बाबा, तोवर तिला बेडवर बसवण्याचा प्रयत्न करा आणि दादाला ही बोलवा . “गडबडीत कामाला उशिर होईल अस ऑफिसला कळवून ती घराकडे पोहोचली . सोसायटीत पोहोचता क्षणी तिला ॲम्ब्युलन्स दिसली आणि जमा झालेल्या गर्दीच्या घोळक्यात तिचे आई – बाबा भांभावलेले आणि भाऊ ओक्साबोक्शी रडताना तिने पाहिलं. नेत्राच्या वहिनी लुब्धाने घराच्या गॅलरीतून आपल्या ८ महिन्याच्या मुलाबरोबर उडी घेतली होती आणि त्यातच दोघे दगावले. हे सगळं ना मनी ना ध्यानी असताना झालं होतं. ह्या प्रसंगानंतर जवळपास ४० दिवसानंतर नेत्रा आणि तिचे कुटुंबिय क्लिनिकला मदतीसाठी आले. त्यांचे अनेक प्रश्न होते आणि त्यांना बरचसं काही बोलायचं होतं.

ते बोलू लागले, डॉक्टर, आमच्या घराला कोणाची नजर लागली देव जाणे. असं आमच्या सुनबाईंना काय सुचलं की त्यांनी असं पाऊल उचललं. हळुवारपणे आपल्या मनातील दुःख ते ओतत होते. दुसऱ्या डिलिवरीनंतर लुब्धा काहिशी उदास दिसायची, तिची लहान सहान गोष्टींवर चिडचिड व्हायची, थोड्याफारशा गोष्टीवरून ती ४ वर्षाच्या मोठ्या मुलाला मारायची. जे या आधी तिने कधीच केलेल नव्हतं. ती सारखं बोलायची की मी चांगली आई नाहीये. तिच्या पतीबरोबरही तिचे अचानक वाद वाढले होते. कधी तरी रागात ती रूम बंद करून एकटीच रडत असे आणि विचारल्यावर जास्त चिडत असे. रात्रीची झोपही पुरेशी घेत नसे. तिचा मूड क्षणाक्षणाला बदलत असे. घरचे लोक तिला समजून घेऊन तिला शांत होईपर्यंत तिचा वेळ घेऊ देत असत. ती आपोआप शांत होई. हे सगळे गेले ६-७ महिने चालू होते. पण ही सगळी लक्षणे पोस्टपार्टम डिप्रेशनची आहेत हे त्यांना लक्षात आले नाही.

पोस्टपार्टम डिप्रेशनचे भारतात प्रमाण जवळपास १५ टक्के आहे. बहुतांश मातांमधे अशी लक्षणे प्रसुतीनंतर २ ते ३ आठवड्यात किंवा २ ते ३ महिन्यात दिसू लागतात. काहींमध्ये लक्षणांची तीव्रता कमी असून ते आपोआप बरे होतात त्याला ‘पोस्टपार्टम ब्लुझ’ म्हणतात. पण काहींमध्ये याची तीव्रता भरपूर असून रात्री झोप न येणे, चिडचिडेपणा, उदास वाटणे, बाळाबद्दल अटॅचमेंट न वाटणे, आपण चांगली माता नाही अशी अपराधीपणाची भावना येणे, नवजात बालकाच्या भविष्याबद्दल भरपूर काळजी वाटणे अशा विचारांबरोबर स्वतः ला किंवा बाळाला इजा पोहोचवण्याचे किंवा जीवे मारण्याचे विचार येतात. त्याला ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ म्हणतात. काहींना गोंधळल्यासारखे वाटणे, भास होणे अशी लक्षणे दिसतात. त्याला पोस्टपार्टम सायकोसिस म्हणतात. अशावेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे खूप आवश्यक आहे.

प्रसुतीनंतर दिसणारे हे मानसिक आजार बऱ्याच कारणांनी असू शकतात. शरीरात होणारे हार्मोनल बदल, गर्भधारणे आधी काही मानसिक आजार असणे, महिलेच्या घरात असा आजार कोणाला असेल, सासरचे लोक समजून घेणारे नसतील, पतीची साथ नसेल, काही मोठी तणावपूर्ण घटना प्रसुतीच्या वेळी झाली असेल तरी वरील आजार होण्याची शक्यता असते.

अशावेळी घरातील व्यक्तींबरोबर बोलून प्रसूतीनंतरच नवजात बालकाच्या मातेला पोषक राहील असे वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. तिच्या आहाराकडे लक्ष देणे, पुरेशी झोप मिळावी आणि आराम व्हावा म्हणून बाळाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. तरीही त्रास होत असल्यास मातेचे आणि घरच्या लोकांचे समुपदेशन आवश्यक आहे. बऱ्याच मातांना समुपदेशनाबरोबर आजाराच्या तीव्रतेनुसार गोळ्या घ्याव्या लागतात. आत्महत्येचे किंवा बाळाला जीवे मारण्याचे विचार मातेला येत असतील तर बाळाला मातेपासून काही दिवस दूर सुरक्षित ठेऊन ई. सी. टी . किंवा शॉक थेरपी मातेला द्यावी लागते. नवबालकाचे घरात आगमन मातेसाठी आणि सगळ्या कुटुंबासाठी आनंदाचे क्षण घेऊन येते. तेव्हा हा आनंद थोडा उशिराने का असेना, जास्तीत जास्त घरांना अनुभवता यावा यासाठी वरील आजार आणि त्यावरचे उपाय माहिती असणे गरजेचे आहे.

(लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Postpartum depression why are irritability mood swings after delivery what should families do sgk