असं म्हणतात की, स्त्रीमध्ये खूप सहनशीलता असते; पण त्या सहनशीलतेचा अंत झाला की, स्त्री दुर्गा होते आणि चंडिकासुद्धा होते. आपण सहन केलेली पीडा इतरांच्या वाटेला येऊ नये, असा प्रामाणिक विचार करणाऱ्या आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रमिला गुप्ता यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
प्रमिला या अत्यंत सर्वसामान्य घरात जन्मलेल्या. घरची परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची होती. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे प्रमिला यांना फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेता आले. पुढे त्यांनी आपल्या भावंडाना चांगले शिक्षण मिळावे म्हणून स्वत: शिक्षणाचा त्याग केला. कमी शिकलेल्या प्रमिला यांचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाले. पहिली मुलगी झाली तेव्हा प्रमिला यांचे वय फक्त १७ वर्षे होते. दुसरी मुलगी झाली तेव्हा त्या १८ वर्षांच्या होत्या.
‘लोकसत्ता’शी बोलताना प्रमिला सांगतात, “माहेरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. सासरी सुरुवातीला नवऱ्याचा आणि सासरच्या लोकांचा खूप त्रास सहन करावा लागला. दोन मुली जन्माला आल्यामुळे सासरचे लोक नाराज होते. जेव्हा माझा मुलगा पोटात होता तेव्हा पुन्हा मुलगी जन्माला येईल म्हणून मला घराबाहेर काढण्यात आले. तीन मुलांना घेऊन मी खूप हलाखीत दिवस काढले. माझ्या आयुष्यात असाही प्रसंग आला की, मी आत्महत्या करण्याचे ठरवले होते; पण मुलांकडे बघून मी त्यांच्यासाठी जगण्याचा विचार केला.”
प्रमिला यांनी मुलांना खूप चांगले शिकवले. त्यांना आयुष्यात शिक्षण घेता आले नाही; पण मुलांनी खूप शिकावे, मोठे व्हावे, असे त्यांना आजही वाटते.
हेही वाचा : जॉर्जिया मेलोनी यांच्यासारखं वागायला आपल्याला जमेल का?…
प्रमिला यांनी त्यांच्या जीवनात जे सहन केले, जे दु:ख त्यांच्या वाटेला आले. ते इतरांच्या वाटेला येऊ नये म्हणून प्रमिला यांनी इतरांना मदत करण्याचे ठरविले. सुरुवातीला त्या इतर संस्थेबरोबर काम करायच्या. संस्थेच्या अंतर्गत समाजसेवा करायच्या. नंतर मोठ्या हिमतीने प्रमिला यांनी स्वत:ची पंख ही संस्था सुरू केली. ‘पंख’द्वारे त्या अनेक महिलांना न्याय मिळवून देतात. घरगुती हिंसाचार असो की नवरा-बायकोचे छोटे-मोठे वाद, महिलांना स्वावलंबी बनवणे, रोजगार उपलब्ध करून देणे, मुलांच्या शिक्षणासाठी निधी देणे, अशी अनेक समाजोपयोगी कामे त्या करतात.आतापर्यंत १८३ महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. या संस्थेचे पाच सभासद आणि अन्य लहान-मोठे कार्यकर्ते त्यांना मदत करतात.
रक्तदान शिबीर आयोजित करणे, रुग्णांना मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवणे, अनाथ मुलांना शालेय साहित्य व कपडे पुरवणे, दुर्बल व गरजू महिलांना हवी ती मदत पोहोचवणे, वृद्धाश्रम, तसेच अनाथालय येथे भेट देऊन अन्नधान्य व इतर मदत पोहोचवणे, महिलांना स्वयंरोजगाराची प्रेरणा देणे, पीडित महिलांना न्याय मिळवून देणे, तसेच इतर अनेक उपक्रम त्या पंख संस्थेद्वारे सातत्याने राबवीत असतात.
हेही वाचा : स्त्रियांनो, जागे व्हा अन् ओळखा तुमच्यात दडलेली देवीची नऊ रुपे
प्रमिला गुप्ता सांगतात, “आज परिस्थिती बदलली. आज सर्वांना माझा खूप अभिमान आहे. मी करीत असलेल्या कामाचा सासरच्या आणि माहेरच्या लोकांना खूप अभिमान वाटतो. आईचा सुरुवातीपासून आणि नवऱ्याचा नंतर खूप जास्त आधार मिळाला. माझ्या या समाजकार्यात मला पोलिसांनी खूप सहकार्य केलं आणि आजही करतात.”
त्या पुढे सांगतात, “१३ वर्षांपासून मी समाजासाठी काम करतेय. महिलांनी कोणाच्या जीवावर न राहता, स्वत: स्वावलंबी राहावं आणि स्वाभिमानानंं जगावं. स्वत:च्या पायांवर उभं राहून लोकांना हे दाखवावं की, मी पीडित महिला नाही. महिलेनं जर काही ठरवलं, तर ती काहीही करू शकते.”