गर्भवती असताना वेळेआधी ‘पाणी जाणं ’ बाळ आणि माता दोघांसाठी जोखमीचं असतं.
बाळंतपणाच्या कळा सुरु झालेल्या नसताना, योनीमार्गातून ‘पाणी’ जातंय की नाही याबद्दल गर्भवतीने जागरूकता बाळगणे आवश्यक असते. अशा प्रसंगी त्या गर्भवतीने आणि तिच्या नातेवाईकांनी काय केलं पाहिजे. या प्रसंगी डॉक्टरांची भूमिका काय असते याची अचूक माहिती मिळाल्यास बाळ आणि माता दोघांची प्रकृती सुरक्षित राहू शकते. बाळंतपणाच्या नैसर्गिक प्रक्रियेत, ‘पाणी जाणं किंवा मूत्रण फुटणं किंवा वॉटर ब्रेक होणं हा प्रकार बाळ गर्भाशयाच्या बाहेर येण्याच्या साधरणतः एक तास अगोदर घडत असतो. बाळंतपण करणाऱ्या घरातील अनुभवी स्त्रिया, किंवा दाया, यांच्या मते ‘मुत्रण फुटली’ याचा अर्थ, आता तासाभरात नॉर्मल बाळंतपण होणार असा होतो. प्रसूतीशास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून देखील तसा उल्लेख आढळतो. गर्भाभोवतालच्या पाण्याला ‘गर्भजल’ असं म्हणतात. वैद्यकीय परिभाषेत त्या पाण्याला amniotic fluid असं म्हणतात. गर्भजलाची सोय ही निसर्गाने प्रामुख्याने बाळासाठी एक ‘शॉक ॲबसॉर्बर’ म्हणून करून ठेवली आहे. या शिवाय बाळाच्या शरीराचं तापमान एका विशिष्ट स्तरावर ठेवण्याचं काम गर्भजलाला करावं लागतं. बाळाच्या फुफुसाची आणि पचनसंस्थेची वाढ नॉर्मल व्हावी यासाठी देखील या पाण्याचा उपयोग होतो. साधारणतः १० ट्कके गर्भवतींमध्ये बाळंतपण सुरु होण्याच्या अगोदर योनीमार्गातून ‘पाणी जाणे किंवा ‘वॉटर ब्रेक’ होण्याचा हा प्रकार घडून येतो.
बाळंतपणाच्या काही दिवस अगोदर योनिमार्गाद्वारे थोडासा चिकट स्त्राव जात असतो. तो स्वाभाविक आहे किंबहुना तो बाळंतपणाच्या नैसर्गिक तयारीचा एक भाग असतो. त्याव्यतिरिक्त नळातून जसं टप-टप पाणी पडतं तसा योनीमार्गातून पाण्यासारखा (watery) डिस्चार्ज होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना सांगणं गरजेचं असतं. आता तर पाणी जातंय, अजून कळा सुरूच झाल्या नाहीत. आतापासून दवाखान्यात कशाला जायचं म्हणून काही गर्भवती स्त्रियांना त्यांचे नातेवाईक अज्ञानापोटी हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत. ज्यांचं ‘ वॉटर ब्रेक’ झालं आहे अशा गर्भवतींनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरकडून तपासून घेतलं पाहिजे. या सूचनेमागे तीन कारणं आहेत. एक म्हणजे, ‘पाणी जातंय’ याचा अर्थ बाळाचं डोकं अजून वरच आहे, बाळंतपणाच्या मार्गात ‘फिक्स’ झालेलं नाही, त्यामुळे बाळाची नाळ योनीमार्गात निसटून येऊन, नाळेवर दाब पडण्याची शक्यता असते. बाळाची नाळ एकदम खाली येऊन त्यावर दाब पडत असल्यास नाळेतून आईकडून बाळाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर प्रेशर येऊन बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो. दुसरं म्हणजे, प्रसूतीची संभाव्य तारीख जवळपास असताना जर ‘पाणी जाणं’ हा प्रकार घडल्यास काही तासात बाळंतपणाच्या कळा सुरु होण्याची शक्यता असते, त्यासाठी देखील हॉस्पिटलमध्ये लगेच दाखल होणं सुरक्षित असतं. तिसरं म्हणजे, ‘पाणी जातं’ याचा अर्थ बाळ ज्या गर्भजलाच्या पिशवीत इतके दिवस सुरक्षित होतं, त्याला कुठेतरी छिद्र पडलंय आणि बाळ बाह्यजगाच्या सूक्ष्म पद्धतीने का होईना संपर्कात आलं आहे. ‘पाणी जाणं’ या समस्येनंतर हॉस्पिटलमध्ये जाण्यास जितका जास्त उशीर होईल तितकी बाह्यजगातील रोगजंतूंचा आणि बाळाचा संपर्क येऊन बाळाला इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढेल. आईला देखील इन्फेक्शन होऊन तिची प्रकृती बिघडू शकते. तिला ताप येऊ शकतो.
हेही वाचा : समुपदेशन: मुलांना आजीकडे सोपवताय?
जेंव्हा ९ महिने पूर्ण झालेले आहेत किंवा पूर्ण होण्याच्या बेतात आहेत तेंव्हा जर ‘पाणी जायला’ लागलंय ही तक्रार घेऊन गर्भवती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तर डॉक्टर तिची तपासणी करतात. इन्फेक्शन होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक प्रतिजैविके ( अँटिबायोटिक्स ) सुरु करतात. पाणी गेल्यानंतर सहसा १२ ते २४ तासात बाळंतपणाच्या कळा नैसर्गिकरीत्याच सुरु होत असतात. समजा नाही झाल्या तर प्रसूती सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून कळा सुरु व्हाव्यात या दृष्टीने सलाईन मधून इंजेक्शन देऊन किंवा अन्य पद्धतीने प्रयत्न करतात. कळा सुरु झाल्यानंतर सहसा बाळंतपण ‘नॉर्मल’ होऊन जातं. काही वेळेस औषधोपचार करून कळा सुरु झाल्या नाहीत किंवा झाल्या तरी त्या कळांची क्षमता कमी असल्यास सिझेरियन करण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
एखाद्या महिलेचा गर्भ २४ ते ३४ आठवड्याचा आहे आणि त्या दरम्यान जर ‘पाणी जाणं’ हा प्रकार घडल्यास डॉक्टर, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी खरी आव्हानात्मक परिस्थिती असते. एका बाजूला बाळाला आणि आईला इन्फेक्शन होण्याची सतत भीती असते तर दुसऱ्या बाजूला कमी दिवसाचं, कमी वजनाचं बाळ जन्माला येईल की काय याची भीती. या दोन गोष्टींचं संतुलन राखून त्यातल्या त्यात उत्तम फलनिष्पत्ती व्हावी यासाठी डॉक्टर प्रयत्नशील असतात. जितक्या कमी आठवड्याचा गर्भ तितकी बाळ जन्माला आल्यानंतर जोखीम जास्त असं ते समीकरण असतं. कमी दिवसांचं, कमी वजनाचं बाळ जन्माला आल्यानंतर देखील त्याला श्वास व्यवस्थित घेता यावा, ते बाळ नीट रडावं यासाठी मातेला बाळाच्या जन्माच्या साधरणतः ४८ ते ७२ तास अगोदर ‘स्टिरॉइड्स्’ चं इंजेक्शन दिलं जातात. गर्भधारणेच्या २४ ते ३४ या नाजूक कालावधीत ‘पाणी जाणे’ हा प्रकार का घडून येतो याचं नक्की कारण सांगता येत नाही. याबाबतीत काही निरीक्षणं शास्त्रात सांगितली आहेत. गर्भजलाचं प्रमाण जास्त असल्यास, गर्भवतीस वारंवार युरीन इन्फेक्शन होत असल्यास किंवा मातेच्या आहारात काही पोषक तत्वांची कमतरता असल्यास हा त्रास होऊ शकतो.
हेही वाचा : वनस्पती संवाद
एक मात्र खरं की, ज्या गर्भवतीचं असं ९ वा महिना लागण्याच्या अगोदरच ‘वॉटर ब्रेक ’ होतं, त्यांच्या गर्भजल सांभाळणाऱ्या पिशवीची ताकद कमी असते. त्यामुळे गर्भवती स्त्रीची काळजी पहिल्या महिन्यापासूनच नीट घ्यायला हवी.
( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)
atnurkarkishore@gmail.com