प्रेमाताई पुरव गेल्या. ९०-९५ वर्षांचं आयुष्य अत्यंत सार्थकी लावणारं जीवन जगून गेल्या. हसतमुख चेहरा, अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व आणि त्या सगळ्यामागे एक जबाबदारी घेणारं, कणखर व्यक्तिमत्वं म्हणजे प्रेमाताई पुरव. स्त्रीला अन्नपूर्णा मानणं, गृहलक्ष्मी मानणं हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. घरोघरी काबाडकष्ट करून, स्वत:ला झिजवून इतरांच्या भुकेची काळजी करणारी अन्नपूर्णाच ती. पण प्रेमाताईंनी या अन्नपूर्णेतून नावापुरती नाही तर खरोखरीची गृहलक्ष्मी घडवली. तिच्या अंगभूत आणि परंपरागत कौशल्यातून आपल्या पायांवर उभं राहण्यासाठीच्या स्त्रियांच्या प्रक्रियेला त्यांचा कणखर हात लागला.
हे घडलं ते एकदोन नाही तर तब्बल दोन लाख स्त्रियांच्या बाबतीत. कामगार कायदे बदलल्यावर गिरणी व्यवसायातून स्त्रिया बाहेर फेकल्या गेल्या होत्या तेव्हाची, म्हणजे १९५०-५५ सालची ही गोष्ट आहे. या गिरणी कामगार स्त्रियांनी आपापल्या पातळीवर घरगुती खानावळी सुरू केल्या. अशा सगळ्या स्त्रियांना एकत्र करून प्रेमाताईंनी अन्नपूर्णी महिला सहकारी सोसायटी लिमिटेड ही संस्था सुरू केली. मुंबईसारख्या शहरात घरातून निघून रोज दोनतीन तास प्रवास करून कार्यालयामध्ये पोहोचणाऱ्या नोकरदार माणसाला ताजं, सकस, गरम जेवण कामाच्या ठिकाणी हवंच होतं. आणि असं जेवण घरगुती पातळीवर बनवणाऱ्या स्त्रियांना काम हवं होतं. ही साखळी जुळली आणि एक मोठा व्यवसाय उभा राहिला. कौशल्य आणि गरज यांचा ताळमेल घालणारा. दोन्ही बाजूच्या गरजा पूर्ण करणारा. त्याच्यामागे होतं प्रेमाताई पुरव यांचं मजबूत संघटनकौशल्य आणि साध्यासुध्या स्त्रियांसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा.
हेही वाचा – पैशाच्या बदल्यात गुन्हा रद्द करणे म्हणजे न्याय विक्रीला काढल्यासारखे…
काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा हे त्यांचं वैशिष्ट्य अगदी १० व्या- १२ व्या वर्षापासून त्यांच्यात दिसत होतं, असं त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं आहे. म्हणजे हातात बाहुली घेऊन खेळायच्या या वयात त्यांनी चक्क त्यांच्या गावच्या म्हणजे गोव्याच्या मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. पोलीस घरी आल्यावर या मुलीने ते ज्या पत्रकांच्या शोधात आले होते, ती पत्रकं चक्क अननसाच्या झाडाखाली पुरून ठेवली होती. या समयसूचकतेमुळे त्यांचं कौतुक झालं असलं तरी लगेचच्याच काळात या आंदोलनाच्या कामात त्यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या आणि त्यांना उपचारांसाठी बेळगावला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे दीड वर्षे उपचार घेऊन पुढे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जवळजवळ सहा महिने उपचार झाले.
या सगळ्या दरम्यान त्यांची स्वातंत्र्य चळवळीतल्या वेगवेगळ्या लोकांची, नेत्यांची भेट होत होती. अरुणा असफ अली त्यांना भेटल्या त्या याच काळात. पाय बरे झाल्यावर सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना गोदावरी परुळेकरांकडे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं. ‘तिथून मी आले ते त्या सामाजिक कामाची स्वच्छ आणि नितळ दृष्टी घेऊनच,’ असं त्याच सांगत. ज्यांच्याकडे काहीच नाही, अशा महिलांना आधार देणं, जगण्याचं कौशल्य देणं, त्यांचं आर्थिक सबलीकरण हे काम प्रेमाताईंनी आयुष्यभर केलं. अन्नपूर्णा महिला सहकारी सोसायटी लिमिटेडमार्फत स्वयंरोजगार, शिक्षण, घरदुरुस्ती यासाठी स्त्रीपुरुषांना विनातारण कर्ज दिलं जात असे. (अन्नपूर्णा महिला सहकारी सोसायटी लिमिटेड ही संस्था सुरू करायची ठरली तेव्हा तिची घटना काम्रेड डांगे यांनी लिहिली आहे, असं प्रेमाताईंनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. ते ऐकलं की काय दिवस होते ते, असं वाटल्याशिवाय रहात नाही.) स्त्रियांना घरी मानाचं स्स्थान मिळावं, त्यांनी संघटित, स्वयंपूर्ण व्हावं यासाठी प्रेमाताईंनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन २००२ साली सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. आणखीही वेगवेगळे पुरस्कार त्यांना मिळाले. पण त्यांनी निराधार स्त्रियांना जी हिम्मत दिली तोच त्यांचा खरा पुरस्कार होता.
प्रेमाताईंचा जन्म सधन कुटुंबात झाला होता. पण तळागाळातल्या स्त्रियांशी त्यांचं हे नातं कसं जुळलं याची अत्यंत हृद्य आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. त्या त्यांच्या आईला उशिरा झालेलं अपत्य. त्यामुळे त्यांची दूधआई वेगळी होती. त्यांच्या घरात काम करणारी ही स्त्री तळागाळातून आली होती. तिच्यामुळे त्यांचा त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीपेक्षा वेगळ्या समाजाशी जवळून संबंध आला. तळागाळातल्या समाजाची दुखं जवळून बघायला मिळाली. आणि त्यातूनच पुढच्या वाटा सापडत गेल्या, असं त्या सांगत.
आज स्त्रियांना अर्थार्जनाच्या वाटा शोधता येतात, सापडतात. आपल्या अंगी असलेल्या कौशल्याचा त्यासाठी वापर करायचा असतो याचं भान त्यांना आलं आहे. त्याच्या मुळाशी प्रेमाताईंसारख्या स्त्रिया आहेत, हे कधीच विसरता कामा नये.