विजया जांगळे

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, रक्षाबंधन आणि तुमचा हातभर राख्या बांधलेला फोटो, हे समीकरण एव्हाना आमच्या डोक्यात पक्कं बसलं आहे. कमर मोहसीन या मूळच्या पाकिस्तानी महिलेकडून तुम्ही दरवर्षी राखी बांधून घेता, हेदेखील पाठ झालं आहे. यंदा तुम्ही तुमच्या पक्षाच्या खासदारांना मुस्लीम महिलांबरोबर रक्षाबंधन साजरं करण्याचं आवाहन केल्याचं ऐकलं. छान वाटलं! लोक यावरूनही ओरड करतील, की हे सगळं अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी सुरू आहे वगैरे. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, हे तर तुम्ही जाणताच. पण प्रश्न वेगळाच आहे. हिंदू परंपरेनुसार हातावर राखी बांधून घेणाऱ्याला रक्षणाचीही जबाबदारी पार पाडावी लागते. तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना हे शक्य होईल का?

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!

तसे तुमच्याच पक्षाचे एक बाहुबली खासदार ब्रिजभूषण सिंग गेले कित्येक महिने वादात आहेत. राजकारण म्हटलं, की वाद हे आलेच. त्यात नवल काही नाही, पण या ब्रिजभूषण‘दादां’विषयीचा वाद जरा वेगळा आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदकं जिंकणाऱ्या भगिनींनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्या जानेवारीपासून ‘ऑलिम्पिक क्वलिफायर’ची तयारी सोडून ‘जंतरमंतर’वर धरणं धरून बसल्या होत्या. तुम्ही बांधून घेतलेल्या नव्या संसद भवनाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यावेळी तुम्हाला भेटायलाही आल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना अक्षरश: फरपटत नेलं. ब्रिजभूषण ‘दादा’आता फेडरेशनमध्ये नाहीत, पण येत्या १८ ऑगस्टला होऊ घातलेल्या फेडरेशनच्या निवडणुकीत आपलेच उमेदवार उभे राहतील, याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. महिनोन् महिने दिल्लीतील कडाक्याच्या थंडीचा सामना करत न्याय मागणाऱ्या या भगिनींचं रक्षण वगैरे राहू द्या. पण किमान त्यांना भेटण्यासाठी, त्यांचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी तरी वेळ काढा.

आणखी वाचा-‘कॅट आय’ फ्रेमचा शोध कोणी लावला ? काय आहे या फ्रेमचा इतिहास

तुम्ही आमदारांना मुस्लीम महिलांकडून राखी बांधून घेण्याचं आवाहन केलंत, त्यावरून आठवलं… त्यांच्यापैकीच एक मुस्लिम भगिनी आहे. बिल्कीस बानो. आठवतेय ना? पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या या भगिनीवर नृशंस सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या केली गेली होती. त्या प्रकरणात दोषी ठरलेल्या सर्वच्या सर्व ११ जणांना गेल्यावर्षी मुक्त करण्यात आलं. ही ताई तुमच्याच राज्यातली. तिच्यावर अत्याचार झाला २००२ मध्ये. म्हणजे तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात. त्या ११ जणांची सुटका झाल्यापासून तुमची ती ताई भीतीच्या सावटाखाली वावरते आहे. इतर कोणा मुस्लीम महिलेकडून राखी बांधून घेण्यापूर्वी या ताईला शांतपणे जगता यावं म्हणून काही करता येतंय का बघाल का? बाकी आजवर गोमांस बाळगल्याच्या, त्याची वाहतूक केल्याच्या नुसत्या संशयातून किती भगिनींना त्यांचा जोडीदार गमावावा लागला, याचं स्वतंत्र गणित मांडावं लागेल. ‘जेएनयू’सह देशभरात झालेल्या ‘सीएए’विरोधी आंदोलनांत सहभागी तरुण भगिनींना पोलिसांनी कशी वागणूक दिली, मुस्लीम महिलांचा ‘— बाई’ म्हणत लिलाव कसा मांडला गेला, याचाही हिशेब मांडावा लागेल…

बिल्कीस बानोचा ‘मुद्दा’ तसा आता जुना झाला, पण ती हाथरस मधली १९ वर्षांची दलित मुलगी आठवतेय ना? चार तथाकथित उच्चवर्णीय पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला, तिचा कणा मोडून टाकला. तिने प्रतिकार केला तेव्हा तिच्याच दुपट्ट्याने तिचा गळा आवळला. त्यात तिची जीभ कापली गेली. या प्रकरणात तब्बल १० दिवस कोणालाही अटक करण्यात आली नाही. तिच्यावर बलात्कार झालेलाच नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. १५ दिवसांत तिने प्राण सोडले, तेव्हा तिच्या कुटुंबियांना घरात कोंडून ठेवून, त्यांना कोणतीही कल्पना न देता मध्यरात्रीच्या अंधारात तिचं कलेवर जाळून टाकल्याचा आरोप पोलिसांवर आहे. खटला उभा राहिला असता, चारपैकी तिघांना मुक्त करण्यात आलं. ज्या एकाला दोषी ठरवलं गेलं, पण त्याच्यावरही बलात्कार किंवा हत्येचा गुन्हा सिद्ध झाला नाही. पुढे सीबीआयने पोलिसांवर निष्क्रियता दर्शवल्याची आणि पुरावे गोळा करण्यात विलंब केल्याची टीका केली. ही घटना घडली उत्तर प्रदेशात. आणि हो, त्या राज्यात तुमच्याच पक्षाच्या योगींचं सरकार होतं. आजही आहे. पण तिचं रक्षण तर कोणीच करू शकलं नाही.

आणखी वाचा-कायदा पुरुषांबाबत पक्षपाती आहे का ? महिलांना असणाऱ्या हक्क-अधिकारांचा गैरवापर होतोय ?

अलीकडेच तुम्ही मणिपूरमधल्या भगिनींबद्दल सहवेदना व्यक्त केलीत. पण तोवर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. ते राज्य पेटून तब्बल दोन महिने उलटले होते. प्रचंड संख्येने लोक उघड्यावर आले होते. आपण भारताचाच भाग आहोत का, याविषयी त्यांच्या मनात शंका निर्माण होण्याची वेळ आली होती. इंटरनेट बंद करून तिथलं वास्तव जगासमोर न आणण्याची पुरेपूर तजवीज करण्यात आली होती. तरीही ते ‘नग्न वास्तव’ पुढे आलंच. तुम्ही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिलीत खरी, पण हे काही मणिपूरपुरतंच नाही, प.बंगाल, राजस्थानातही असंच घडतंय हे सांगायला मात्र विसरला नाहीत. त्यावरून देशभरातल्या भगिनींना जो संदेश मिळायचा तो मिळालाच.

तुमचा मुस्लीम महिलांकडून राखी बांधून घेण्याचा उद्देश निश्चितच स्वच्छ असेल. मतं वगैरे शुद्र गणितं त्यात नसतीलच, पण या रक्षाबंधनानिमित्त मुस्लीमच नव्हे देशभरातील सर्व भगिनींना एकच ओवाळणी अपेक्षित आहे. त्यांच्याकडे मुली, भगिनी, हिंदू, मुस्लीम, मणिपुरी, बंगाली म्हणून न पाहता, केवळ माणूस म्हणून पाहण्याचं आवाहन तुमच्या खास ‘दोस्तों’ शैलीत सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पोलीस, कार्यकर्ते, अनुयायी… एकंदर सर्वच पुरुषांना करा. एवढी ओवाळणी घालाच…

vijaya.jangle@expressindia.com