Priya Singh Case : प्रिया सिंह, वय फक्त २६ वर्ष, एक मॉडेल, फिटनेस ट्रेनर आणि दिसायला सुंदर. ती एका अश्वजित नावाच्या मुलाच्या प्रेमात होती. साडेचार वर्षांचे त्यांचे प्रेमसंबंध.खूप प्रेम करायचे एकमेकांवर पण या प्रेमाचा शेवट एवढा कडू होईल, याचा स्वप्नातही कोणीही विचार केला नव्हता.
प्रिया सांगते, “साडेचार वर्षाचे आमचे प्रेमसंबंध होते. आम्ही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालो होतो. तो विवाहित होता, हे सुरुवातीला मला माहिती नव्हते. जेव्हा मला याविषयी कळले तेव्हा अश्वजित मला म्हणाला की त्याचा घटस्फोट झाला आहे, आता त्याला फक्त माझ्याशीच लग्न करायचे होते. पण एकदिवस तो मला त्याच्या बायकोबरोबर दिसला. मी त्याला जाब विचारला तेव्हा त्याने माझ्या अंगावर गाडी घातली.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाखोंनी फॉलोवर्स असलेलं प्रियाचं सोशल मीडिया अकाउंट ओपन कराल तर तुम्हाला कधी वाटणार नाही की तिच्याबरोबर कधी असं होऊ शकतं. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावरुन तिचे हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत तिच्याबरोबर घडलेली आपबिती सांगितली. प्रियाचे हे प्रकरण उडकीस येताच अनेकांच्या अंगावर काटा आला. मैत्रीणींनो, प्रिया सिंहसारखी चूक तुम्हीही कधी करू नका.

प्रेम म्हणजे काय?

प्रेम या शब्दाचा अर्थ समजायला माणसाचे अर्धे आयुष्य निघून जाते. ‘प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते’ असे बोलायला खूप सोपं आहे, पण खरंच प्रेम म्हणजे नेमकं काय, याचा विचार तुम्ही कधी केला? प्रेमाची एक व्याख्या करताच येत नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण समोरचा व्यक्ती आपल्यावर खरंच प्रेम करतो की नाही, हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. “आपल्या नात्यात प्रेम उरले नाही”, अशा तक्रारी तुम्ही बऱ्याचदा ऐकल्या असतील. खरंच कालांतराने संपणारं प्रेम हे खरं प्रेम असू शकतं का?

जो व्यक्ती आपली काळजी घेतो, जीवापाड जपतो, स्वत:पेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करतो, आपल्यासाठी धडपडतो, त्याला प्रेम म्हणतात. आपल्या चांगल्या आणि वाईट गुणासह पारदर्शकपणे आपल्याला स्वीकारतो, त्याला खरं प्रेम म्हणतात. आपला, आपल्या कामाचा आदर करून आपल्याला सन्मानाने जगण्यास बळ देतो, ते खरं प्रेम असतं. अशा किती तरी प्रेमाच्या व्याख्या आहेत. अश्वजितने प्रिया सिंहवर केलेलं प्रेम खरं होतं का? एकदा नीट विचार करा.

हेही वाचा : महिलांनो, नवीन वर्षात ‘या’ दहा चुका करू नका

कोणत्याही नात्यात फक्त प्रेमच आवश्यक आहे का?

आता प्रेम आयुष्यभर पुरतं का? एखादी व्यक्ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असेल पण त्याची वागणूक, बोलण्याची पद्धत तुम्हाला आवडत नाही, तर ते नाते टिकेल का? कोणतेही नाते फक्त प्रेमावर टिकत नाही, हे समजून घेणे जास्त गरजेचे आहे. अनेकदा तरुण मंडळी एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगत प्रेमविवाह करतात आणि नंतर त्यांचे पटत नाही. कारण प्रेमासह इतर गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात ज्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. साडे चार वर्षाच्या या नात्यात प्रिया आणि अश्वजित एकमेकांवर खूप प्रेम करायचे मग प्रियावर प्रेम असताना अश्वजित असा का वागला असेल? एकदा विचार करा.

बॉयफ्रेंड निवडताना कोणती काळजी घ्यावी?

प्रिया अश्वजितबरोबर साडेचार वर्ष नात्यात होती. तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की अश्वजित तिच्याबरोबर असा वागेल. तिचे काय चुकले? तिने बॉयफ्रेंड निवडतानाच मोठी चूक केली. प्रेमात पडताना तो व्यक्ती कसा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, हे तिने नीट तपासून पाहिले नाही. अश्विजित विवाहित होता, हे सु्द्धा तिला माहिती नव्हते. मुलींनो, बॉयफ्रेंड निवडताना किंवा प्रेम करताना निदान आपण कोणत्या व्यक्तीबरोबर राहतोय किंवा मैत्री करतोय, याची माहिती घेणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नवीन आली आहे, तर त्याला समजण्यासाठी वेळ घ्या. लगेच कोणत्याही गोष्टीला होकार देऊ नका. नात्यात पुढे जाण्यास घाई करू नका.

डोकं जागेवर ठेवून प्रेम करा, भावनेच्या ओघात जाऊ नका

प्रिया सिंहचे हे ताजे उदाहरण आहे. यापूर्वीचे श्रद्धा वालकर प्रकरण तुम्हाला आठवत असेल. अनेकदा मुली भावनेच्या ओघात निर्णय घेतात आणि चुकीच्या गोष्टींना बळी पडतात. मैत्रीणींनो, प्रेम करताना डोकं जागेवर ठेवून प्रेम करा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. एखादा व्यक्ती लगेच चांगला वाटला म्हणून त्याच्याबरोबर नात्यात उतरू नका. त्याचे परिक्षण करा. मनाने नाही तर डोक्याने विचार करा. भविष्यात समोरच्या व्यक्तीबरोबर तुम्ही आयुष्य घालवण्याचा विचार करू शकता का, याचा सर्वांगीण बाजूने विचार करा. नुसतं प्रेम आहे म्हणून होकार देऊ नका.

हेही वाचा : मासिक पाळीदरम्यान महिलांना पगारी सुट्यांची आवश्यकता आहे? महिलांनीच दिले उत्तर

नात्यात विश्वास असावा पण अंधविश्वास नाही

असं म्हणतात, नात्यात विश्वास असेल तर नातं दीर्घकाळ टिकतं. प्रिया सिंगने अश्वजितवर विश्वास ठेवला. विवाहित असल्याचे उघडकीस आल्यानंतरसुद्धा ती त्याच्याबरोबर नात्यात होती.खरंच हा विश्वास होता की अंधविश्वास. मैत्रीणींनो, जोडीदारावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. पण अंधविश्वास ठेवू नका.जेव्हा जोडीदार तुमच्या याच विश्वासाचा गैरफायदा घेतो तेव्हा अशा अनेक प्रिया सिंह समोर येऊ शकतात.

प्रिया सिंहप्रकरण आज समोर आलं म्हणून आज आपल्याला या प्रकरणाविषयी कळले पण अशा कितीतरी प्रिया गाव खेड्यात किंवा शहरात लपल्या असतील. चुकीच्या नात्यात फसलेल्या असतील. तुम्ही विवाहित असो किंवा नातेसंबंधात; शारीरिक, मानसिक आणि शाब्दिक अत्याचार अजिबात सहन करू नका. मैत्रीणींनो, प्रेमसंबंध हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचे संपूर्ण आयुष्य घालवू शकता का, याचे परिक्षण करणारा एक चांगला पर्याय आहे. फक्त परिक्षण करताना स्वत:चा बळी जाणार नाही, इतके सतर्क राहणे खूप गरजेचे आहे.