सध्याचे दिवस म्हणजे थंडीची सुरूवात! मात्र राज्यात अनेक ठिकाणी सध्या दुपारपूर्वी आणि संपूर्ण दुपारभर कडक ऊन आणि सकाळी-रात्री खूप थंडी, असं विचित्र हवामान अनुभवायला मिळतं आहे. थंडी पडायला लागली, हे तुम्हाला दरवर्षी कसं जाणवतं याचा विचार करून पाहा. हात, पाय कोरडे पडायला लागतात. पोटऱ्या, मांड्या, कंबर, पोट हे भाग नेहमी झाकलेले राहात असले, तरी त्यावरची त्वचाही कोरडी- कोरडी जाणवू लागते. चेहऱ्यावर ओठांच्या कडांना, नाकाच्या बाजूला, गालांच्या खाली हनुवटीच्या बाजूला त्वचा कोरडी होऊ लागते. क्वचित त्वचेवर कोरडेपणामुळे खाजही येऊ लागते. तुम्हाला हे जाणवू लागलं असेल, तर आता तरी थंडीसाठी सज्ज व्हायलाच हवं हे ध्यानात घ्या! स्किनकेअर तज्ज्ञ वेळोवेळी या बाबतीतल्या टिप्स देत असतात. यातल्या काही उपयुक्त टिप्स आम्ही इथे देत आहोत.
आणखी वाचा : मधुमेहापासून बचावासाठी काय कराल, काय टाळाल?
‘लाईट’ मॉईश्चरायझर नको
मॉइश्चरायझर आपण बारा महिने वापरतो. पण अनेक जण त्वचा तेलकट दिसू नये म्हणून नेहमीच्या वापरासाठी लाईट मॉईश्चरायझर वापरतात. ही लोशन्स थोडी पातळ असतात, तसंच क्रीम असेल तर ते लाईट असतं. थंडीच्या दिवसांत मात्र हे पुरे पडणार नाही. त्यामुळे या दिवसांत थोडी घट्ट असलेली मॉईश्चरायझिंग लोशन्स किंवा थोडी थिक मॉईश्चरायझिंग क्रीम्स निवडा. त्यामुळे ती दिवसभरात पुन्हा पुन्हा लावावी लागणार नाहीत आणि सकाळी आंघोळीनंतर एकदा मॉईश्चरायझर लावलं की तुम्ही या बाबतीत निश्चिंत व्हाल.
आणखी वाचा : मेन्टॉरशिप : सुप्रिया सुळे -‘उत्तम ते सर्वोत्तम’ या प्रवासात लाभले अनेक मेन्टॉर्स!
मॉईश्चरायझरची लहान बाटली जवळ बाळगा
सकाळी एकदा थिक मॉईश्चरायझर लावून आपण निश्चिंत होणार असू, तरी आपले हात दिवसभर विविध कामं करण्यासाठी वापरले जातात, धुतलेही जातात. त्यामुळे ते पुन्हा कोरडे होतात. त्यामुळे हातांवरची त्वचा कोरडी आणि पांढरी पडणं टाळण्यासाठी जवळ पर्समध्ये एखादी छोटीशी मॉईश्चरायझरची बाटली ठेवून द्या. वेळप्रसंगी चेहरा धुतल्यावरही त्याचा उपयोग करता येईल.
आणखी वाचा : डोळ्यांखालचा ‘पफीनेस’, काळी वर्तुळं कमी करणारा ‘आय पॅच’!
थंडीतही ‘सनस्क्रीन’ गरजेचं
‘सनस्क्रीन’ हे उन्हाळ्यात किंवा कडक ऊन असतानाच वापरायचं असतं असा अनेकांचा समज असतो. पण तो खरा नव्हे. आताही दुपारभर बाहेर खूप ऊन असतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. सनस्क्रीन या उन्हाच्या दाहापासून आणि अतिनील किरणांपासून (यूव्हीए रेज्) आपलं रक्षण करतं. किमान ‘एसपीएफ ३०’ असलेलं सनस्क्रीन तरी वापरा, असं सांगितलं जातं. त्याहून अधिक असेल, तरी चांगलंच. काही मॉईश्चरायझरमध्येच सनस्क्रीन असतं. तसंच हल्ली सनस्क्रीन असलेली ‘टिंटेड’ फेस क्रीम्स मिळू लागली आहेत. या क्रीम्समध्ये पिवळसर रंग म्हणजे ‘टिंट’ असतो, त्यामुळे त्याचा कोल्ड क्रीम किंवा मॉईश्चरायझर म्हणून उपयोग होण्याबरोबरच फाऊंडेशनसारखा परिणामही मिळतो.
आणखी वाचा : गौतमी पाटील ‘१०० टक्के’ चुकलेली नाही!
मृत त्वचा काढून टाकणं आवश्यक
थंडीत त्वचा लगेच कोरडी पडत असल्यामुळे अंघोळ करताना अंगावर किंवा चेहऱ्यावरही मृत त्वचा निघून आलेली लगेच जाणवते. त्यामुळे अधूनमधून त्वचेसाठी ‘स्क्रब’ वापरला तर मृत त्वचा निघून जायला चांगली मदत होईल. मात्र हा स्क्रबसुद्धा थंडीच्या दिवसांत चालणारा असावा. काही स्क्रब ‘क्रीमी’ स्वरूपाचे असतात, त्यांचा आता उपयोग होईल.
आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!
फेस मिस्ट
अनेक जण सकाळी अंघोळ झाल्यावर सर्वप्रथम फेस मिस्ट किंवा फेस टोनर वापरून त्यानंतर मॉईश्चरायझर लावतात. ‘वॉटर बेस’ असलेल्या फेस मिस्ट किंवा फेस टोनर्समध्ये काही ‘इसेन्शियल ऑईल्स’ वापरलेली असतात. त्यामुळे त्वचा ताजीतवानी दिसते आणि त्यातला ओलावा कायम राहायला काहीशी मदत होते. फेस मिस्टना सुगंधही खूप चांगला असतो त्यामुळे मूड रीफ्रेश होतो. काही जण पर्समध्येही फेस मिस्ट बाळगतात, जेणे करून दिवसभरात चेहरा धुणं शक्य नसतं तेव्हा गरजेनुसार ताजंतवानं दिसण्यासाठी फेस मिस्ट फवारतात. मात्र हे काही अगदीच आवश्यक सौंदर्यप्रसाधन आहे असं नाही!