सई तांबे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीगिरांनी दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा म्हणतात की, या महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हे बेशिस्तपणाचे असून त्यामुळे भारताची प्रतिमा खराब होतेय. पी. टी. उषा आणि त्यांच्या सारख्या असंख्य जणांना भारतात काय घडतेय याची दखल घेणे गरजेचे वाटत नाही, मात्र भारताची प्रतिमा खराब होईल का, यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे महत्वाचे वाटते. देशासाठी ज्या महिला खेळाडूंनी पदके मिळवली अशा खेळाडूंना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं अशी वेळच का यावी ? 

लैंगिक शोषण झाल्याची तक्रार महिला कुस्तीपटूंनी करूनही काहीच कारवाई झाली नाही. या खेळाडूंना तात्पुरते गप्प बसवण्यासाठी समिती नेमली गेली, पण तीन महिने उलटून गेले तरीही तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. ७ महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण झाल्याची तक्रार करूनही साधा एफआयआर नोंदवला जात नाहीये. सत्ताधारी पक्षातील खासदार ब्रिजभूषण सिंह या व्यक्तीविरुद्ध ही तक्रार असल्याने त्यांना पाठीशी घालण्यासाठी  स्वतः ऑलिम्पिक खेळाडू असलेल्या पी. टी. उषा आंदोलन करणाऱ्या खेळाडूंना दोष देत आहेत. कायदेशीर मार्गाने जाऊनही कोणताच न्याय मिळत नाहीये हे लक्षात आल्यावरच खेळाडूंनी हे पाऊल उचलले आहे.

आणखी वाचा- नातेसंबंध : एंगेजमेंट झाली, पण आता लग्न नकोय ?

लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्याची दखल न घेणे हा ही तितकाच मोठा गुन्हा आहे. कोणतेही खेळाडू  हौस म्हणून आंदोलन करत नाहीत. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर खेळाडूंवर बक्षिसाची खैरात करणे, जिथेतिथे सत्कार करणे, त्याला देव करणे  अशा गोष्टी आपल्या देशात लगेच होतात पण तेच खेळाडू जेव्हा त्यांच्यावर झालेल्या  अन्यायाला वाचा फोडतात तेव्हा मात्र त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष … ही  दुटप्पी  वागणूक का? आपल्या देशात महिला आयोग, महिलांसाठीचे कायदे, पोलिस स्टेशनमधील वेगळा महिला कक्ष, बेटी बचाव बेटी पढाव असे उपक्रम… या सगळ्या यंत्रणा जर वापरल्याच जाणार नसतील तर त्यांचा काय उपयोग? अन्याय करणारी व्यक्ती राजकीय वरदहस्त लाभलेली, आर्थिकदृष्ट्या सबळ असेल तर या यंत्रणा आणि समाजातील इतर प्रतिष्ठित व्यक्ती मूग गिळून गप्प बसणार असतील तर माणूस म्हणून सन्मानाने जगू इच्छिणाऱ्या मुलींसाठीचा हा भारत नक्कीच नाही. 

आणखी वाचा- महिलांविषयक आक्षेपार्ह बाबींना रोखण्यासाठी कायदेशीर शब्दकोश लवकरच- सरन्यायाधीश चंद्रचूड

पी. टी. उषा यांच्यासारख्या जागतिक पातळीवर खेळलेल्या खेळाडूकडून जेव्हा भारताची प्रतिमा खराब होतेय, त्यामुळे आंदोलन थांबवा असे सुचवले जाते, तेव्हा भारतात स्त्रियांचे मूलभूत हक्क अजून किती दुय्यम आहेत हेच अधोरेखित होते. लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कणखर खेळाडूंच्या मागे उभे न राहता त्यांचा आवाज दडपण्याचाच हा प्रकार आहे. अनेक नामांकित खेळाडूही यावर काहीच बोलायला तयार नाहीत. पी. टी. उषा यांच्या या विधानामुळे भारताची प्रतिमा खराब झाली की नाही हे सांगता येणार नाही, पण या असंवेदनशील वक्तव्यामुळे पी. टी. उषांबद्दलच्या प्रतिमेला मात्र कायमचा धक्का लागला आहे. खेदाने म्हणावेसे वाटते, पी. टी. उषा, तूसुद्धा!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest by women wrestlers at delhis jantar mantar and p t usha reaction mrj