फेसबुक सर्फ करता करता अचानक ‘स्टेटस सिंगल’ या ग्रुपच्या रेकमंडेशनवर अदितीची बोटं थांबली. उत्सुकतेने तिने सहज स्क्रोल केलं. टॅग लाईनवर स्टेट्स सिंगल ग्रुपच्या संस्थापिका लेखिका श्रीमोयी पियू कुंडू यांचं विधान होतं ‘आपण स्वतःला विधवा, घटस्फोटित किंवा अविवाहित असं म्हणणं थांबवूया आणि आजपासून स्वतःचं स्टेट्स ‘प्राउडली सिंगल’ असं ठेवू या’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : भोगीची आमटी : एक चवदार आठवण

अदिती चमकली. भारतीय स्त्रिया असं म्हणू शकतात? तिला लहानपणी शिकलेलं संस्कृत सुभाषित आठवलं. लहान वयात वडील, तरुणपणी भाऊ, लग्नानंतर नवरा आणि म्हातारपणी मुलाने स्त्रीचा रक्षण करायचं कारण ‘न स्त्री स्वातंत्र्यं अर्हती’. अजूनही परिस्थिती बदलली नाहीच. स्त्री कितीही शिकली सावरली तरी लहानपणी वडिलांचा आणि लग्नानंतर नवऱ्याचा शब्दच अंतिम मानला जातो. स्त्रीला स्वतः चा चॉईस आहेच कुठे? परिस्थितीमुळे किंवा स्वतः च्या मर्जीने समजा ती एकटी राहिलीच तर एकतर तिच्यावर दया तरी दाखवायची किंवा टोमणे मारून तिला नकोसं तरी करून सोडायचं जेणेकरून तिने पुरुषाची मदत घेतलीच पाहिजे. ती कोणा पुरुषावर अवलंबून असेल तरच तिचं एकटं असणं समाज मान्य करतो. समजा, तिने ही बंधनं झुगारून मुक्त, आत्मनिर्भर व्हायचं ठरवल तर? खरंच शक्य आहे? अदितीच्या डोळ्यासमोर अशी कितीतरी उदाहरणे आली जिथे अशा एकट्या स्त्रिया सक्षम असूनसुद्धा एकट्या राहत नव्हत्या.

आणखी वाचा : मी सून आहे म्हणून सासूने मला मध्यरात्री…

अदितीच्या शाळेतल्या शिक्षिका पाटोळे बाई. त्यांचे यजमान गेल्यानंतर त्यांनी किती वेळा मुलाला सांगितलं की, मला तुझ्यासोबत नेण्याचा हट्ट धरू नकोस. मी माझं उर्वरित आयुष्य याच घरात समाधानाने जगेन. काही झालं तरी तो तुझा संसार. इथे सगळं माझ्या आणि यांच्या कष्टातून उभं केलं आहे. उशांपासून, टेबल- खुर्च्या, पुस्तके, भांडीकुंडी, झाडं सगळं माझ्या आणि यांच्या आवडीचं. आता ते नसले तरी आमचं हे जग मला आधार देतं. अपरंपार सुख देतं. त्यांच्या आठवणी या जगात बोलक्या होतात, त्यांच्यापासून मला पारखं करू नकोस पण मुलाने ऐकलंच नाही. संबंध तोडायची धमकी दिली. त्यामुळे पाटोळे बाई अनिच्छेने त्यांचं लाडकं घर कायमचं बंद करून मुलाकडे राहायला गेल्या. पाटोळे बाई या जबरदस्तीला विरोध करू शकल्या असत्या?

आणखी वाचा : य़शस्विनी : २१ हजार फूट उंचीवर लिंगभेदाला मूठमाती… कशी, ते जाणून घ्या !

प्रांजल अदितीची शाळेपासूनची मैत्रीण. पहिलंच स्थळ अमेरिकेचं आलं म्हणून प्रांजलसकट तिचे आई वडीलही खूश होते. भारतात मुलाच्या घरी ते जाऊन आले. हॉटेल व्यवसाय ,आलिशान बंगला, अनेक पिढ्यांचे ऐश्वर्य आणि या संपत्तीचा एकुलता एक वारस नीरज. आपली मुलगी उच्चभ्रू घरात पडली म्हणून प्रांजलचे आई बाबा आनंदात होते. इथे लग्न पार पडलं. प्रांजल अमेरिकेत गेली. तिथे जाऊन जे पाहिलं त्याने ती अगदी कोलमडून गेली. नीरजला मेल पार्टनर होता. नीरज ‘गे’ होता. हे त्याच्या पालकांनी लपवून ठेवलं होतं. पुढे घटस्फोट होता होता तीन वर्ष गेली. तोपर्यंत प्रांजल एमएस करून तिथेच नोकरी करू लागली. पण जसा घटस्फोट झाला तसं तिच्या वडिलानी फर्मान काढलं. आता दुसरं लग्न करायचं तेही भारतातल्या मुलाशी आणि इथेच राहायचं आमच्या डोळ्यासमोर. पण प्रांजलला तर अमेरिकेतच नवीन आयुष्य सुरु करायचं होतं. स्वतःच्या पायावर ती उभी होती. तरी का नाही निर्णय घेऊ शकली ?

आणखी वाचा : आरोग्य : थंडीत पांढरे तीळ खाल्ल्यानं स्रियांना मिळतील ‘हे’ फायदे

अदितीला तरी कुठे लग्न करायचंय? तिला तर गुप्तकालीन स्थापत्यकलेवर संशोधन करायचंय. त्यासाठी भारतभर फिरायचं आहे. उत्खननाची बातमी मिळाली की अदिती लगेच तिथे हजर. मग त्या वास्तुवरचे आधीचे संदर्भ ग्रंथ शोधायचे, मंदिराचे कळस, महिरपी पाहून टिपणं काढायची. संस्कृत भाषेतले शिलालेख अभ्यासायचे, त्यांचा अर्थ लावायचा. पुढच्या अनेक पिढयांना भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी आपल्या संशोधनाचं महत्वाचं योगदान लाभावं या जिद्दीने अदिती काम करत होती. तिच्या या स्वप्नापुढे लग्न, संसार, मुलं याला काहीच महत्व नव्हतं. पण अमित दादा मात्र लग्न कर म्हणून मागे लागला होता. आई वडिलांनंतर बहिणीच्या जबाबदारीतून त्याला मोकळं व्हायचं होतं. समजा, अदितीने अविवाहितच राहायचं ठरवलं तर? अमितदादा मान्य करेल?

आणखी वाचा : …तर काळजी नसावी!

पाटोळे बाई, प्रांजल आणि अदिती अशा कितीतरी स्त्रिया या समाजात आहेत ज्यांना मनापासून वाटलं तरी ‘प्राउडली सिंगल’ राहण्याचा निर्णय त्या घेऊ शकत नाही. जे त्यांचंच आहे त्यासाठी त्यांना अजूनही झगडावं लागत आहे. भारतात स्त्रियांना सामाजिक स्थान मिळवून देण्यासाठी समाजसुधारकांनी कार्य केल. राजा राममोहन रॉय यांनी सतीची प्रथा बंद केली, महर्षी कर्वेंनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला, महात्मा आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीशिक्षण देऊन स्त्रियांना स्वतः च्या पायावर उभे केले. र. धों. कर्वेंनी संततीनियमनाचे धडे दिले. या सगळ्यामुळे समाजात स्त्रियांना सन्मान मिळाला. सामाजिक स्थिती सुधारली. समाजसुधारकांनी आपल्याला या टप्प्यापर्यंत आणून पोहोचवले तरी विचारांची प्रगल्भता, मानसिक स्वातंत्र्य , विचारांचा ठामपणा, घेतलेल्या सर्व निर्णयांच्या बऱ्या वाईट परिणामांची जबाबदारी हा वैचारिक प्रवास या शिक्षणाच्या पुंजीतून आपला आपल्यालाच करायला हवा. समाजात आपले विचार, आपल्या व्यथा वेदना, अन्यायांना आणि आपण ज्या प्रसंगांना सामोरं जातो त्यालाही स्थान मिळायला हवे. त्यासाठी कोणाच्याही मदतीशिवाय ,कोणाच्याही सोबतीशिवाय स्त्रीला तिचं माणूसपण जपता आलं तरच ‘प्राउडली सिंगल’ हे स्टेट्स खऱ्या अर्थाने साध्य झालं असं म्हणता येईल.

tanmayibehere@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proudly single women girls not to be ashamed of being divorce or unmarried or widow vp