पावसाळ्यात बुरशी जशी भिंतीवर येते तशीच माणसाच्या त्वचेवर सुद्धा येते. ओले कपडे सतत घालण्यात आल्याने. मग ‘दाग, खाज, खुजली’ अशा जाहिरातीसुद्धा सुरू होतात आणि वेगवेगळी बुरशी मारण्याची औषधे जशी भिंतीवर मारली जातात तशीच त्वचेवरही लावली जातात. काहींना यांनी तत्काळ आराम मिळतोही. मात्र काहींचा हा त्वचारोग काही केल्या जात नाही. त्याचे कारण त्यांच्या शरीरावरील बाह्य़ ओलीमध्ये दडलेले नसून शरीराच्या आतील ओलीत दडलेले असते. याला आयुर्वेदीय शास्त्रीय भाषेत ‘क्लेद’ असे म्हणतात. हा क्लेद वाढला की त्वचारोग वाढतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दही, ब्रेड (पाव), इडली, डोसा, आंबवलेले पदार्थ हे सर्वच रोज आहारात आले की क्लेद वाढवतात. थोडेसे बारकाईने पाहिलेत तर जाणवेल की हे सर्वच आंबवलेले पदार्थ अथवा बेकरीचे पदार्थ एक रात्र संस्कार झाल्याशिवाय बनत नाहीत. म्हणजे आंबविल्याशिवाय बनत नाहीत, म्हणजेच प्राकृत बुरशीचा प्रकार (यीस्ट) शिवाय यांचे फर्मेन्टेशन होत नाही. मग हे शरीरामध्ये जाऊन स्वत:च्या गुणांची वाढ करतात. कारण आपण जसे खाणार तसेच होणार. मग यामुळे शरीरातील क्लेद हळूहळू वाढू लागतो व हा क्लेद बाह्य़ बुरशीचे पोषण करतो. त्यामुळे या लोकांचे बुरशीजन्य त्वचाविकार लवकर बरे होत नाहीत. मग ते कित्येक त्वचारोग तज्ज्ञांना दाखवितात, कित्येक वर्षे औषधे घेतात; पण जोपर्यंत हा क्लेद कमी होणार नाही तोपर्यंत हा आजार बरा होणार नाही, असे आयुर्वेदाचे ठाम मत आहे.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: नागिणीचा वेढा

कारण एखाद्या साठलेल्या पाण्यावर जीवजंतू वाढत असतील तर नुसते त्या जीवजंतूंची परीक्षणे करून, महागड्या तपासण्या करून, औषध फवारणी करणे म्हणजे चिकित्सा करणे नव्हे. ते साठलेले पाणी काढून टाकणे व परत साठणार नाही अशी व्यवस्था करणे, ही त्याची खरी चिकित्सा होय. यालाच आयुर्वेदीय परिभाषेत पंचकर्म करणे असे म्हणतात. वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण असे शोधन केले की हे आजार लगेच बरे होतात. तसेच शमन औषधीसुद्धा असतात ज्या या क्लेदास व पर्यायाने या त्वचा रोगांस पटकन बरे करतात. आजकाल सतत डोके ओले राहिले की, डोक्यात फार कोंडा होऊ लागतो, सतत असे झाल्याने नंतर स्काल्प सोरीयासीस होण्याची शक्यता वाढते. हा कोंडा चेहऱ्यावर, पाठीवर ज्या भागात पडेल त्या भागात खाज येणे पुळ्या उठणे असे प्रकार सुरू होतात. फार वाढल्यास बऱ्याच जणांना सर्वागावर सोरीयासीस आलेला पाहायला मिळतो.

आधुनिक शास्त्रानुसार याचे अनेक प्रकार आहेतही व तात्काळ उपशय देणारी औषधेही आहेत. मात्र कित्येक प्रकारांची कारणे अनाकलनीय असे सांगून या आजाराबद्दल रुग्णास काहीही ठोस उपचार सांगितला जात नाही अथवा कधी बरा होणार, होणार की नाही याबद्दलही पूर्ण माहिती सांगितली जात नाही. आयुर्वेदानुसार मात्र सर्व त्वचारोगांची कारणे व लक्षणे वेगवेगळी सांगितली आहेत. पैकी साध्य म्हणजे बरे होणारे त्वचारोग व असाध्य म्हणजे बरे न होणारे अशीही त्यांची विभागणी केलेली आहे. विरुद्ध आहार सेवनापासून ते चुकीच्या विहारापर्यंत कारणे वर्णन केली आहेत. नायटा, खरुज, गजकर्ण, सुरमा, दद्रु, पामा अशी व्यवहारात वेगवेगळी नावे असणारे त्वचारोग हे आयुर्वेदात कुष्ठ या त्वचा रोगांच्या यादीत महाकुष्ठाचे सात व क्षुद्र कुष्ठाचे अकरा प्रकार म्हणून वर्णन केलेले आहेत.

प्रत्येकाची चिकित्साही वेगवेगळी वर्णन केली आहे. त्यामुळे गरज आहे ती फक्त आपल्या त्वचारोगाची आयुर्वेदीय निदान काय आहे हे जाणून घेण्याची. पैकी सोरीयासीसचे प्रमाण हल्ली फार वाढले आहे. फास्ट फूड, हॉटेलचे पदार्थ, शिळे अन्न, मशरूमसारख्या भाज्यांचे अधिक सेवन, वेगवेगळे सॉस, चायनीज फूड, जंक फूड इत्यादी अनेक पदार्थाच्या सततच्या सेवनामुळे रक्त दुष्टी होते व पर्यायाने क्लेद दुष्टी होऊन अनेक त्वचारोग मागे लागतात. लक्षात ठेवा छोटे छोटे त्वचारोगच मोठ मोठ्या त्वचारोगाला जन्म देतात. एखादा चट्टा छोटा असेल, पण बऱ्याच दिवसांपासून असेल तर लवकरात लवकर तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्या. तसेच वर उल्लेख केलेला आहारातील व विहारातील बदल जरी पालन केलात तरी तुम्ही कित्येक त्वचारोगांना दूर ठेवू शकता.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psoriasis has been on the rise recently due to junk and fast food ayurvedic remedies for dermatitis dvr
Show comments