श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नुकतेच महिलांबाबत धक्कादायक विधान केले होते. त्यांच्या विधानाचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, त्यंच्या धक्कादायक विधानाला प्रत्युत्तर देण्यासाठी पुण्यात पोस्टर लावण्यात आली आहेत. पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर एक बॅनर आढळले आहे; ज्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मस्त ग्रुप आणि त्रस्त ग्रुपच्या नावाने हे दोन्ही बॅनर्स लावण्यात आले आहेत. एका बॅनरवर असा मजकूर लिहिण्यात आला आहे, “महिलांनो असे कपडे घाला की, कोणी वाईट नजरेने बघता कामा नये. सौजन्य : मस्त ग्रुप,” तर त्याच्याच खाली त्रस्त ग्रुपच्या नावे लिहिलेला दुसरा बॅनर दिसत आहे; ज्यामध्ये लिहिले आहे, “पुरुषांनो, मन इतकं निखळ ठेवा की, कुणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये!” हा मजकूर असलेल्या बॅनरची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगल्याचे पाहण्यास मिळत आहे.

त्याचे झाले असे की, पुण्यात मागील दोन दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी धारकाऱ्यांसह संवाद साधताना, “आपल्याला १५ ऑगस्ट रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्र स्वातंत्र्य आहे. आपल्याला ते जमत नसून स्वतंत्र हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे. तसेच वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनीदेखील जाऊ नये”, असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर पुण्यातील शहरात अनेक ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, हा विरोध दर्शविताना अज्ञात लोकांनी पुण्यात हे बॅनर लावले आहेत.

सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. कारण- महिलांच्या कपड्यांबाबत भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांवरून रोष व्यक्त केला जात आहे. आपला देश १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र नक्कीच झाला; पण अजूनही समाजात असे काही लोक आहेत की, जे बुरसटलेल्या विचारांमधून अद्यापही स्वतंत्र झालेले नाहीत. एकीकडे ‘लाडकी बहीण’सारख्या योजना सुरू करून महिलांच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहे; तर दुसरीकडे अजूनही महिलांना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत आणि कोणते नाहीत यावरून सल्ले दिले जातात. आक्षेपार्ह विधाने करून, काही लोक महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालू पाहतात हे स्पष्टपणे दिसते आहे. पण, मुळात प्रश्न असा पडतो की, महिलांनी कोणते कपडे घालावेत किंवा कोणते नाहीत हे ठरविण्याचा अधिकार यांना कोणी दिला? या लोकांना स्वातंत्र्य म्हणजे काय हे खरंच कळतं का? सर्व बंधनं महिलांनाच का? महिलांना त्यांच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिले आहे. त्यामुळे इतर कोणाला काय वाटते याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. जर पुरुष कपड्यांशिवाय फिरतात वा हवे ते कपडे घालून फिरू शकतात, तर मग महिलांना हवे ते कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य का नाही?

हेही वाचा – सुजाता सौनिक ठरल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव! कसा होता त्यांचा प्रवास पाहा….

महिलांच्या कपड्यांवर बंधने घालू पाहणाऱ्यांना ‘ते बॅनर’ लावून काही लोकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. महिलांना कोणते कपडे घालायचे यावर सल्ला देण्यापेक्षा हा समाज पुरुषांना मात्र कोणतीच चांगली शिकवण देऊ शकत नाही का? महिलांना आदराने आणि सन्मानाने वागवावे ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आणि मावळ्यांना दिली आहे. मग शिवरायांनी दिलेली ही शिकवण आपला समाज आणि समाजातील पुरुष विसरले आहेत का? महिलांच्या कपड्यांवर आक्षेप घेणारे लोक त्यांचे मन किती काळे आहे हेच सिद्ध करतात. समाजात वाईट प्रवृत्तीचे लोक असतात याची पुरेपूर जाणीव महिलांना असते; पण मुळात ही वाईट प्रवृत्तीची सुरुवातच काही पुरुषांच्या विकृत मानसिकतेमुळे होते. ज्या लोकांना असे वाटते की, महिलांच्या कपड्यांमुळे चुकीच्या गोष्टी घडतात, तर तो एक मोठा गैरसमज आहे. तसे असते, तर या समाजात चिमुकल्या मुली आणि वयस्कर महिलांवर कधी अत्याचार झाले नसते. महिलांवर होणारे अत्याचार हे काही पुरुषांच्या विकृत मानसिकतेमुळे घडतात हे उघड सत्य आहे. गरज आहे ती समाजाने हे सत्य स्वीकारण्याची. ही मानसिकता बदलण्यासाठी लहानपणापासून मुलांवर योग्य संस्कार केले गेले पाहिजेत. जर प्रत्येक पुरुषाने आपल्या आसपासच्या प्रत्येक स्त्रीला आदराने आणि सन्मानाने वागवले, तर महिलांबरोबर कोणतीही वाईट गोष्ट घडणार नाही

महिलांनी कोणते कपडे घालावेत आणि कोणते नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे महिलांना सल्ले देण्यापेक्षा प्रत्येक मुलाला किंवा पुरुषांना महिलांना सन्मानाने कसे वागवावे याची शिकवण देणे आवश्यक आहे. पुरुषांनी जर महिलांना आदराने वागवले, तर महिलांना सन्मानाने आणि निर्भीडपणे जगता येईल. आपला समाज आपल्याला बदलायचा असेल, तर सुरुवात आधी स्वत:पासून करा. महिलांच्या स्वातंत्र्यावर किंवा कपड्यांवर बंधने घालण्याऐवजी पुरुषांनी स्वत:च्या विचारांवर बंधने घातली, तर परिस्थिती नक्कीच वेगळी असेल. अर्थात, हा बदल एका दिवसात घडणार नाही; पण आता सुरुवात केली, तर भविष्यात मोठा बदल होईल.