एकतर भल्यापहाटे तुला गावी जाण्याची गरजच नव्हती. बरं, जाण्याचा निर्णय घेतला तो घेतलास पण मग तुला परपुरुषाशी बोलायची गरज काय? त्याच्याशी बोललीस तरी त्याला तू कुठे जातेयस, का जातेयस हे सांगायची गरज काय? त्यातही सर्वांत मोठी चूक कोणती माहितेय? तुझ्यावर अत्याचार सुरू असताना तू कोणताही ‘स्ट्रगल’ केला नाहीस म्हणे. तुझा आवाज बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे तुझ्यावर ओढावलेल्या आपबितीला इतर दुसरं-तिसरं कोणी नाही; तूच जबाबदार आहेस ताई.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटी बस स्थानकात एक नादुरुस्त बस उभी असते. त्या बसला ना लॉक असतं, ना त्या परिसरात पहारेकरी असतो. नेतेमंडळी म्हणतात तसं, आजूबाजूला माणसं असतील तरी ती तुझ्याकडे का पाहतील? तुझ्या किंचाळण्याचा आवाज का ऐकतील? त्यामुळे तू त्याच्याबरोबर गेलीस, तुझ्यावर अत्याचार झाला यात ना व्यवस्थापनाची चूक आणि नाही प्रशासनाची चूक. तुझ्यावर ओढावलेल्या आपबितीला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस.

आता आरोपीला पकडलं गेलंय, त्याचा जबाबही नोंदवतील. कदाचित तोही तुझ्यावरच आक्षेप घेईल. तू म्हणे एकटी होतीस, त्याच्याशी बोलत होतीस, तुझ्याच संमतीने त्याने हे कृत्य केलं असंही तो म्हणेल. किंबहुना एव्हाना त्यांचं हे स्टेटमेंट रेकॉर्डही झालं असेल. त्यामुळे तू एकटी निघालीस, एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेतलास, त्यासाठी भल्यापहाटेची सरकारी बस निवडलीस ही तुझी चुकच अगं. यात ना त्या ऊसाच्या शेतात ड्रोनच्या सहाय्याने पकडल्या गेलेल्या आरोपीचा दोष आणि ना आपल्या सुरक्षा व्यवस्थेचा!

मुली तोकडे कपडे घालतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात, असं तथाकथित सुशिक्षित माणसं मानतात. फक्त चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानंतर यांची वाचा धरते, त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत. कारण, चिमुकलीला कुठे माहीत असतं तोकड्या कपड्यांवर पडणाऱ्या विकृतांची नजर? मग तू जरी पूर्ण कपड्यांत सार्वजनिक ठिकाणी सरकारनं ५० टक्के सवलत दिलेल्या सेवेचा लाभ घेण्याकरता निघाली असलीस, तरीही ती तुझीच चूक. तू सरकारची लाडकी बहीण असलीस तरीही तुझीच चूक! कारण, तू उजळ माथ्याने समाजात फिरत होतीस, बिनधास्त! ते कसं पाहावलं जाईल आपल्या पुरुषसत्ताक समाजाला?

या पुरुषसत्ताक समाजात बाईनं घराबाहेर पडू नये, तिने एकटीने प्रवास करू नये अशीच स्थिती कायम निर्माण केलीय. याच पुरुषसत्ताक परिस्थितीला मूठमाती (की राज्यातील सुरक्षा यंत्रणेवर विश्वास ठेवून) देऊन तू एकटीने प्रवास करायला निघालीस ही तुझी चूक नाही तर काय ताई? आणि तुला वाटलं हे राज्य सुरक्षित आहे?(!)

बलात्कार, अत्याचार झाले की बाईनं कसं राहावं, कसं वागावं, कसं उठावं-बसावं अन् कुठे जावं, कसं जावं यावर सल्ले दिले जातात. अगदी देशाची, राज्याची सुरक्षा ज्यांच्या हाती असते तेही महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांनाच उपदेशाचे डोस देतात. पण यातला कोणीही आरोपीला किंवा तशी विचारसरणी असलेल्यांना कायद्याचा धाक दाखवत नाही. आतापर्यंत झालेल्या एका तरी घटनेतून असा धाक दाखवला असता तर तुझ्यावर ही स्थिती ओढावली नसती. पण काय करणार, यात सरकारचा दोष नाही, यात चूक तुझीच, कारण तू नको त्या वेळेला घराबाहेर पडलीस अन् नको त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून बसलीस! त्यात तू स्वतःला सोडवण्याकरता कोणताही समाजमान्य ‘स्ट्रगल’ केला नाहीस, तुझ्या शरीरावर प्रतिकाराचे कोणतेही व्रण नाहीत, मग ताई चूक सांग कोणाची? समाजमान्य व्याख्येत तुला पीडिता कसं म्हणायचं? सरकारी यंत्रणेची चूक असेलही, सुरक्षा पुरवणाऱ्या रक्षकांचीही असेल, एसटी स्थानकाचं व्यवस्थापन करणाऱ्या व्यवस्थापकांचीही असेल पण हे मान्य होणार नाही. कारण मानवी इतिहासात पुरुषांच्या चुका झाकण्यासाठी बाईलाच नेहमी अपराधी व्हावं लागलंय. त्यामुळे ही चूकही तुझीच!

बाकी, उद्या सरकार त्याला फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करेल की नाही माहीत नाही,कदाचित एन्काऊंटरही करतील! कदाचित होईलही शिक्षा पण तोवर किती सरकारं बदलली जातील, हेही सांगता येत नाही. पण ताई तू जपून राहा! या श्वापदांच्या जगात आपल्यालाच आपली काळजी घ्यायला हवी. नाहीतर कधी एसटी स्टँण्डवर, कधी कोणत्या गडावर, तर कधी तुझ्या माझ्या घरातच अत्याचार होतच राहील!