लता दाभोळकर
साधीशीच साडी नेसलेली सडपातळ बांध्याची एक बाई. अगदी सामान्य वाटावी अशीच. एका कोपऱ्यात ती बसलीय अंग चोरून. चेहऱ्यावर कमालीचं टेन्शन… तिचा हा फोटो सर्वत्र झळकला. ‘ती’ एकदम चर्चेत आली आहे ती तिच्या मुलामुळे- ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदमुळे. कारण प्रज्ञानंदनं बुद्धिबळात जे काही यश मिळवलं आहे, त्यामागे या माऊलीचे अविरत कष्ट आहेत. ती आहे भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदची आई नागलक्ष्मी! प्रज्ञानंद अवघा अठरा वर्षांचा आहे. त्याच्या वयाची अनेक मुलं आयुष्य म्हणजे केवळ मौजमजा, याच विचारात असतात. पण प्रज्ञानंदला बुद्धिबळाचं वेड आहे. बुद्धिबळ हा त्याचा ध्यास आहे आणि त्या ध्यासाच्या वाटेवर चालण्याची दिशा दाखवणारी आहे त्याची आई नागलक्ष्मी.
नागलक्ष्मी एक सर्वसामान्य गृहिणी. पण वैशाली आणि प्रज्ञानंद या दोन्ही मुलांना घडवण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. त्याची प्रामाणिक कबुली नागलक्षी यांचे पती रमेशबाबूही देतात. आपली मुलं टीव्हीच्या आहारी जात असल्याचं नागलक्ष्मी यांच्या वेळीच लक्षात आलं. यावर उपाय काय? तर बुद्धीबळ! नागलक्ष्मी यांचा हाही विशेष, की भारतातील अनेक आयांना आपल्या मुलांनी क्रिकेट खेळावं, त्यांनी सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली व्हावं असं वाटत असतं. पण नागलक्ष्मी यांनी वेगळा विचार करत दोन्ही मुलांना बुद्धिबळाचं वेड लावलं. घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी दोघा मुलांना बुद्धिबळाचं प्रशिक्षण देण्यात कोणतीही हयगय केली नाही. गंमत म्हणजे रमेशबाबू यांचा या गोष्टीला विरोध होता, मात्र नागलक्ष्मी आपल्या विचारावर ठाम होत्या.
हेही वाचा… पांढऱ्या केसांसह बोहल्यावर चढलेल्या ‘त्या’ दोघी!
नागलक्ष्मी प्रज्ञानंदची सावली असल्यासारख्याच आहेत. त्याच्या बुद्धिबळाइतकंच त्यांचं बारीक लक्ष असतं ते त्याच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याकडे. इतकंच नाही, तर आपलं घर त्याच्या बुद्धिबळाच्या सरावाच्या आड येत नाही ना, याकडेही त्यांचं लक्ष असतं. मग घरात एकदम शांतता असते. पैपाहुण्यांची उठबसही घराबाहेरच! कारण एकच, मुलं बुदि्धबळ शिकतायत! प्रज्ञानंदची शारीरिक आणि मानसिक स्थिती खेळासाठी तयार करण्यात नागलक्ष्मी कोणतीही कसर सोडत नसत आणि नाहीत.
एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, ‘प्रज्ञानंद इतक्या शांतपणे खेळत असतो, की कधी कधी मला भीती वाटते, की त्याच्या शांततेत माझ्या हृदयाचे वाढलेले ठोके कदाचित त्याला ऐकू येतीत की काय! तो खेळत असताना मी त्याच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. कारण माझ्या चेहऱ्यावरून त्याला त्याची मनोवस्था जाणवू देणं मला धोक्याचं वाटतं. अर्थातच प्रशिक्षणाच्या वेळी खेळाडूंना खेळताना चेहऱ्यावर कोणत्याही भावभावना समोरच्या खेळाडूला दिसू नयेत याबाबत काळजी घ्यायला सांगितली जाते. पण मी त्याची आई आहे ना! तो खेळताना केव्हा आत्मविश्वासानं खेळतो आणि केव्हा निराश होतो, हे मला लगेल जाणवतं. त्याची खेळातानाची मनोवस्था मला एका नजरेत टिपता येते!’’
हेही वाचा… लहान मुलांनाही करून द्या पैशांची ओळख
लहानपणापासून नागलक्ष्मीच प्रज्ञानंदला प्रशिक्षणासाठी ने-आण करतात. त्याच्यासाठी जे काही लागेल ते नागलक्ष्मीच पाहतात. सुरुवातीपासूनच अगदी छोट्यात छोट्या स्पर्धेतही प्रज्ञानंदसोबत त्याच असत. एका कोपऱ्यात बसून त्याच्यासाठी प्रार्थना करत. प्रज्ञानंदला परदेशातही त्याच्या आईची सोबत असते. तिथे त्याला घरचं जेवण मिळावं म्हणून त्या प्रयत्नशील असतात. परदेशात जाताना इंडक्शन स्टोव्ह, जेवणाची भांडी, तांदुळ, रस्समला लागणारा मसाला, सगळं घेऊन जातात! त्यामागचं कारणही तसंच आहे. त्याचं आवडतं रस्सम आणि भात त्याला मिळावा आणि त्याच्या यशात जेवणाचा अडथळा येऊ नये हीच त्यांची प्रामणिक इच्छा असते.
प्रज्ञानंद आपल्या आईविषयी सांगतो, ‘माझी आई हा माझा आधारस्तंभ आहे. मी जेव्हा हरतो, तेव्हा ती मला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते. तुमच्यासाठी कोणीतरी अखंड झटत असतं ही भावनाच किती विलक्षण आहे! माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी आमची आई अविरत झटत असते.’
हेही वाचा… “लग्न झालंय म्हणून पत्नीला मारहाण करण्याचा पतीला अधिकार नाही!” हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
नागलक्ष्मी यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो आणि मध्यरात्री संपतो. मुलांना बुदि्धबळासाठी तयार करणं हाच त्यांचा प्राधान्यक्रम. संपूर्ण घराला शांत ठेवण्याची जबाबदारी नागलक्ष्मी यांचीच असते. कारण एकच- मुलांचं बुदि्धबळ! प्रज्ञानंदला ग्रॅडमास्टर बनवण्यात त्याच्या आईची मोठी भूमिका आहे हे त्याचे प्रशिक्षक आणि सोबतीही मान्य करतात.
पूर्वी ‘दीवार’ या चित्रपटातला ‘मेरे पास माँ हैं’ हा संवाद प्रचंड ‘हिट’ झाला होता. तशी प्रत्येकच आई आपल्या मुलामुलींचं हित पाहते, त्यांची प्रगती सुकर व्हावी म्हणून शक्य ते सर्व करते. प्रज्ञानंद हे असं एक झळझळीत उदाहरण आहे. ‘मेरे साथ माँ हैं!’ हे वाक्य ज्याच्या तोंडी चपखल बसावं असं!
latadabholkar@gmail.com