राबिया सांगते, ‘सुरुवातीला गावातील लोक, नातेवाईक टोमणे मारायचे की ट्रक चालवणं हे पुरुषाचे कामे आहे. ट्रक चालवताना घरापासून आठवडाभर, महिनाभर बाहेर राहावे लागते. ही स्त्रियांची कामे नाहीत. पण पतीचा आणि कुटुंबाचा पाठिंबा असल्यानं होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष केलं. जसजसं ट्रक चालक क्षेत्रात नाव होऊ लागलं तसं वर्तमानपत्रांतून मुलाखती येऊ लागल्या, तसा लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागला. आता त्याच स्त्रिया मला येऊन सांगतात की, आम्हालाही ट्रक चालवायला शिकायचं आहे.
काश्मिर म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर सर्वसाधारण चित्र उभं राहतं ते कट्टरवाद्यांचं. काश्मिरसारख्या सुंदर खोऱ्यात महिलांना आजही चुलीपुरते मर्यादित ठेवलं जात होतं, परंतु आता तेथे परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. कश्मिर खोऱ्यातील महिला परंपरा, रूढीच्या भिंती भेदून हळूहळू विविध क्षेत्रात उंच भरारी घेऊ लागल्या आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे राबिया यासीन. जी आज कश्मिर खोऱ्यातील पहिल्या महिला ट्रक चालक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या ट्रान्स्पोर्टच्या ट्रक चालक क्षेत्रात तिने आज स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राबिया यासीन ही काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील वोखरवन गावातील रहिवासी. पती व चार वर्षांच्या मुलीसोबत ती राहते. राबिया आपल्या या अनोख्या प्रवासाबद्दल सांगते की, लग्नानंतर सुरुवातीच्या काळात नवरा इम्तियाज अहमद मीरसोबत ती ट्रकमधून प्रवासाला जायचे. असेच प्रवास करता करता तिला ट्रक चालवण्यात तिला रस वाटू लागला. मग तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. नवऱ्याला काही अडचण नव्हती, पण राबियाला ट्रक चालवायला घरातून परवानगी मिळेल की नाही याबद्दल दोघांच्याही मनात शंका होती. राबियाने घरी हा विषय मांडण्याआधी तिला वाटले की घरातील वरिष्ठ परवानगी देणार नाहीत. पण घडले उलटेच. घरातल्या वडिलधारी मंडळींनी कसलेही आढेवेढे न घेता होकार दर्शवला आणि पाठिंबा दिला. आता ती नवऱ्यासोबत मिळून ट्रक चालवते. जेव्हा लांब पल्ला पार करायचा असतो तेव्हा नवरा ट्रक चालवून थकल्यानंतर त्या नवऱ्याला आराम करायला सांगून स्वत: ट्रक चालवते.
ट्रक चालवायला शिकताना सुरुवातीला काही माहिती नसल्यानं अडचणी येऊ लागल्या. भीती वाटत होती. पण ट्रक चालवायचा निश्चय पक्का असल्यानं अनेक अडचणींवर मात करत तसंच ट्रक पूर्ण भरला असेल तर कशाप्रकारे स्टेअरिंग हाताळायचे वगैरेवगैरे अशा सर्व बाबींचं तिनं बारकाईनं अभ्यास केला. अखेर राबियानं स्टेअरिंगवर जम बसवलाच. ट्रक चालवायला शिकल्यावर पहिली सुरुवात ही आजूबाजूच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरून, छोट्यामोठ्या हायवेवरून झाली- जिथे रहदारी कमी असेल. आता राबिया ट्रक चालविण्यात माहीर झाली आहे. ती पतीसोबत संपूर्ण देशभर फिरते. दिल्ली, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र… असे अनेक राज्यात ती पतीसह ट्रक घेऊन फिरली आहे.
राबिया सांगते, ‘‘सुरुवातीला गावातील लोक, नातेवाईक टोमणे मारायचे की ट्रक चालवणं हे पुरुषाचे कामे आहे. ट्रक चालवताना घरापासून आठवडाभर, महिनाभर बाहेर राहावे लागते. ही स्त्रियांची कामे नाहीत. पण पतीचा आणि कुटुंबाचा पाठिंबा असल्यानं होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष केलं. जसजसं ट्रक चालक क्षेत्रात नाव होऊ लागलं तसं वर्तमानपत्रांतून मुलाखती येऊ लागल्या, तसा लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागला. आता त्याच स्त्रिया मला येऊन सांगतात की, आम्हालाही ट्रक चालवायला शिकायचं आहे.
राबिया आता फक्त ट्रक चालक राहिली नसून तिने सोशल मिडियावरसुद्धा आपली एक नवीन ओळख बनवली आहे. Rabia Vlogs 786 या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती आपल्या प्रवासातील अडचणी, विविध अनुभव शेअर करत असते. सध्याच्या काळात कोण कोणते काम करतो किंवा हे काम पुरुषांचेच किंवा ही कामे फक्त महिलांनीच करावीत याला महत्त्व न देता तुम्ही कोणतेही काम करा. फक्त ते मेहनतीनं आणि इमानदारीनं करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता.’’
राबियाच्या या कर्तृत्वाबद्दल तिची सासू शहनाज बेगम सांगतात की “मला माझ्या सुनेचा सार्थ अभिमान आहे. तिनं आपली आवड जोपासली आणि त्यातच तिनं तिचं करिअर केलं. माझ्या मुलाला म्हणजे तिच्या नवऱ्याला देखील तिच्या या वेगळे क्षेत्र निवडण्याबद्दल कधीच आक्षेप नव्हता. तिच्या जागी माझी मुलगी जरी असती तरी मी तिला देखील पाठिंबा दिला असता. राबिया जेव्हा घरी असते तेव्हा ती घरच्या कामात देखील हातभार लावते. तिची इच्छा आहे तोपर्यंत तिनं ट्रक चालवावा आणि तिनं तिची आवड जोपासावी अशी आमची इच्छा आहे.’’