ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी तीन ट्रेनची धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात जवळपास ३०० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर, एक हजाराहून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक आहे. या अपघातावेळी चर्चेत आलेल्या जया वर्मा सिन्हा यांच्यावर केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मंत्रिमंडळ नियुक्त समितीने घेतलेल्या निर्णयानुसार, जया वर्मा सिन्हा यांच्यावर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपावण्यात आली आहे. आतापर्यंत या पदावर पुरुषांची मक्तेदारी होती. परंतु, जया वर्मा सिन्हा यांच्या रुपाने रेल्वे बोर्डाला पहिली महिला अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती, उद्यापासून स्वीकारणार पदभार

जया वर्मा या रेल्वे बोर्डात ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलोपमेंट विभागात सदस्या आहेत. याआधी त्या रेल्वेच्या वाहतूक परिवहन विभागात अतिरिक्त सदस्य होत्या. तीन ट्रेनची धडक झाल्याने बालासोरमध्ये मोठा अपघात घडला होता. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा अपघात घडला होता. या जटील सिग्नल यंत्रणेची माहिती जया वर्मा सिन्हा यांनी माध्यमांना सोप्या शब्दांत विषद केली होती. एवढंच नव्हे तर पीएमओमध्ये त्यांनी या अपघातासंदर्भातील प्रेजेंटेशनही सादर केलं होतं. त्यामुळे तेव्हापासून जया वर्मा चर्चेत होत्या. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत सरकारने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

विविध पदांवर दांडगा अनुभव

जया वर्मा यांची रेल्वे प्रशासनातील कारकिर्द प्रशंसनीय आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनात विविध विभागात आणि विविध पदांवर काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव दांडगा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्यावर रेल्वे बोर्डाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून त्या रेल्वे विभागात आहेत. रेल्वेसह त्यांनी दक्षता विभाग आणि माहिती-तंत्रज्ञान विभागातही काम केलं आहे.

रेल्वे सल्लागार म्हणूनही पाहिलंय काम

जया वर्मा या १९८८ साली भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत सामील झाल्या. तेव्हापासून त्यांनी रेल्वेतील विविध कामे अगदी जवळून पाहिली आहेत. उत्तर, एसई, पूर्व रेल्वे विभागात त्यांचं काम मोलाचं आहे. बांगालदेश येथील ढाकातील भारतीय उच्चायुक्त येथे त्यांनी चार वर्षे रेल्वे सल्लागार म्हणून काम केलं आहे. कोलकाता ते ढाका या मैत्री एक्स्प्रेसचे उद्घाटनही त्याच कार्यकाळात झाले होते. तसंच, सियालदह विभागातील पूर्व रेल्वेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.

या विभागातही ठरल्या होत्या पहिल्या महिला अधिकारी

दक्षिण पूर्व रेल्वेच्या मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर विराजमान झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. तसंच, उत्तर रेल्वेच्या मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway board got first woman president who is jaya verma sinha balasore came into discussion after the accident sgk