समीर जावळे
प्रिय द्रौपदी,
आज तुलाच पत्र लिहायचं ठरवलं कारण मन हेलावून टाकणारी एक घटना समोर आली. राजस्थानमध्ये एका २१ वर्षांच्या गर्भवती महिलेची विवस्त्र करुन गावभर धिंड काढण्यात आली. हे करणारे कोण होते? तिचा नवरा आणि तिची सासरची मंडळी. या महिलेचा अपराध काय होता? तर विवाहित असूनही तिचे दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेमसंबंध होते. ती त्याच्या घरी राहण्यासाठी गेली होती. आजकाल नात्यांची वीण सैल होणं ही बाब समाजाला तशी नवी राहिलेली नाही. या विवाहितेने केलं ते नैतिक-अनैतिकतेच्या पातळीवर बसत नसेल हे देखील एक वेळ समाज म्हणून आपण मान्य केलं तरीही तिला जी शिक्षा मिळाली ती प्रचंड दाहक आणि मन हेलावून टाकणारी आहे. काय झालं असेल तिच्या मनाची अवस्था? काय वाटलं असेल त्या महिलेला?
द्रौपदी, तुला जेव्हा धर्मराज द्युतात हरला तेव्हा तुझी झालेली अवहेलना, त्यानंतर तुझा झालेला सात्विक संताप, तू दुःशासनाचं रक्त केसांना लावेपर्यंत मोकळे सोडलेले केस, तुला मांडीवर बसण्यास सांगणाऱ्या दुर्योधनाची भीमाने गदा युद्धात फोडलेली मांडी हे सगळं सगळं आम्हाला तसंच्या तसंच आठवतं आहे. त्यामुळेच आजही एखाद्या महिलेवर इतका भयंकर अन्याय झाला की आम्हाला तू आठवतेस. तू भरसभेत तुझ्या सासरच्या मंडळींना जाब विचारला होतास, त्या सभेत पितामह भीष्म, धृतराष्ट्र, गांधारी, विदुर सगळेच होते त्यांनाही तू खडसावून विचारलं होतंस की जर माझा पती द्यूत क्रीडेत आधीच हरला आहे तर मग त्याने मला का पणाला लावलं? तू रजस्वला असताना तुला फरफटत दरबारात आणलं गेलं, तुझं वस्त्रहरण करण्यात आलं. त्यात तुझ्या पाठिशी कृष्ण नसता तर काय घडलं असतं? कल्पनाही करवत नाही.
काही दिवसांपूर्वी मणिपूर या राज्यातलाही असाच एक व्हिडीओ समोर आला होता. त्यातही दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हा प्रकार करणाऱ्या नराधमांनाही दुःशासनच म्हटलं गेलं. मणिपूरच्या व्हायरल व्हिडीओवरुन भरपूर राजकारण, आरोप-प्रत्यारोप सगळं सगळं आम्ही पाहिलं. कुणी कुणाला मगरीचे अश्रू ढाळले असं म्हटलं, कुणी म्हटलं की हे सगळं ठरवून केलं गेलं, कुणी म्हटलं मणिपूरमध्ये असं घडतंच. पण सगळ्या देशाला प्रश्न पडला होता की ज्या महिलांची धिंड काढली गेली त्यांचा दोष काय होता? आजही त्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीतच आहे.
या दोन घटना अगदीच प्रातिनिधीक आहेत गं.. पण अशा कितीतरी घटना घडत असतील ज्या समोरही येत नाहीत. स्त्री देहाची विटंबना आजही प्रचंड प्रमाणात सुरु आहे. तरीही मग तो दिल्लीत निर्भयावर झालेला बलात्कार असेल, मुंबईतल्या शक्ती मिलमधला अत्याचार असेल किंवा इतर अशाच गंभीर घटना असतील प्रत्येक वेळी स्त्री आवाज उठवतेच असं नाही. असा प्रसंग घडल्यावर ते सांगण्याचं धाडस अनेकजणी करतात हेही नसे थोडके पण अनेकजणी शांत राहतात, कुढत अन्याय विसरण्याचा प्रयत्न करतात. मात्र अन्यायाचा हा ओरखडा त्यांच्या मनावर राहतोच.
द्रौपदी, तुला कृष्णानं अनेकदा नारायणीही म्हटलं आहे. तू मोठ्या धैर्याने तुझ्यावर जो वस्त्रहरणाचा प्रसंग बेतला त्याला सामोरी गेलीस. अपमानाचा हा घोट तू पचवणं हे शंकराने हलाहल पचवण्याइतकंच दाहक होतं. पाच बलशाली पती असूनही तुझ्या वस्त्राला जेव्हा दुःशासनाने हात घातला तेव्हा तुझं रक्षण करणारा तुझा कृष्णसखाच होता. आज स्त्रिया आणि त्यांच्या बरोबर घडणाऱ्या या घटना पाहून त्या दुःशासनांच्याच दुनियेत वावरत हेच वास्तव समोर येतं. या दुःशासनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे धृतराष्ट्रही आहेत. त्यांना प्रोत्साहान देणारे दुर्योधनही आहेत. मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या महिलांचा कृष्णसख्याचा शोध संपेल का? सांगशील का?