-सुचित्रा प्रभुणे
साडी हा जसास्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो- मग ती बाई गरीब घरची असो वा श्रीमंत घरातली. प्रत्येकीची स्वत:ची अशी काही खास मते असतात. अगदी तसंच गाडी हा पुरुषांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. कारचा स्पीड, आतमधली बसण्याची व्यवस्था, कारच्या त्या छोट्याशा जागेत त्यांना बऱ्याच ‘कम्फर्ट’ देणाऱ्या गोष्टी हव्या असतात. अशा या सर्वस्वी पुरुषीवर्चस्व असलेल्या क्षेत्रात स्वत:च्या हुशारीवर एका स्त्रीने स्वत:चे खास स्थान निर्माण करणे ही निश्चितच कौतुकास्पद अशी बाब आहे. आणि हे स्थान निर्माण करणाऱ्या महिलेचे नाव आहे रामकृपा अनंत. जिची ऑटो मोबाईल इण्डस्ट्रीत ‘महिंद्रा मशिनरीची राणी’ अशी खास ओळख आहे.
रामकृपा या कृपा या नावाने अधिक ओळखल्या जातात. पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एण्ड टेक्नोलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनियरिगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पुढे आयआयटी मुंबईमधून इण्डस्ट्रीअल डिझाईनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९९७ च्या सुमारास त्या महिंद्रामध्ये इंटेरिअर डिझायनर म्हणून रुजू झाल्या. तिथे महिंद्राच्या बोलेरो, झायलो, स्कोर्पिओ यांसारख्या गाड्यांच्या मॉडेलचे डिझाईनिंग करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. कामावर असलेली निष्ठा पाहून महिंद्रा XUV 500 या मॉडेलच्या डिझायनिंगसाठी प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.
आणखी वाचा-स्त्री आरोग्य : वैद्यकीय गर्भपात कायद्यातली सुधारणा कोणासाठी?
या गाडीसाठी डिझाईन करताना कृपा आणि त्यांची टीम सातत्याने चार वर्षे झटत होती. कृपा यांना स्वत:ला गाडी चालविण्याची प्रचंड आवड असल्यामुळे, गाडी चालविताना चालकाच्या काय काय अपेक्षा असतात हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. या अपेक्षा आणि चित्ता या प्राण्याला नजरेसमोर ठेवून डिझाईनमध्ये अनेक छोट्या छोट्या बाबींवर लक्षपूर्वक काम केले. आणि जेव्हा २०११ साली ही गाडी बाजारात आली तेव्हा तिचा विक्रमी खप झाला.यानंतर कृपा यांना कधीच मागे वळून पाहावे लागले नाही. महिंद्रा कडून जी जी काही गाडीची नवीन मॉडेल्स आली त्यांना बाजारात चांगलीच मागणी मिळू लागली. पुढे त्यांनी डिझाईन केलेल्या महिंद्रा थारने तर इंडस्ट्रीमध्ये इतिहासच रचला. भारतीय रस्त्यांना साजेसे असलेले रफटफ आणि तितकेच स्टायलिश असलेले हे मॉडेल ग्राहकांच्या खास पसंतीस उतरले. परिणामी कार डिझायनर क्षेत्रात कृपा यांच्या नावाला एक विशेष वलय प्राप्त झाले.
महिंद्राच्या थार, XUV आणि स्कॉर्पिओ या मॉडेल्सच्या यशामध्ये कृपा यांचा मोठा वाटा आहे. एखादया गोष्टीची मनापासून आवड असेल तर किचकट किंवा कठीण क्षेत्रातील काम देखील तितकेच रंजक होऊ शकते, हे कृपा यांनी वेळेवेळी आपल्या कामातून सिद्ध केले आहे. आपल्या कामाच्या यशाचे श्रेय बऱ्याचदा ते त्यांच्या हाताखाली असलेल्या तरुणांच्या टीमला देतात. त्यांच्यामध्ये असलेला सळसळता उत्साह, एखाद्या गोष्टीकडे वेगवगेळ्या कोनातून पाहण्याची त्यांची वृत्ती यांमुळे मलादेखील नवनवीन कल्पनांवर काम करण्याची प्रेरणा मिळत राहते.
आणखी वाचा-“… तो निर्णय ठरला गेम चेंजर!” तब्बल पाच वेळा UPSC मध्ये अपयश पचवूनही नेटाने मिळवले यश! पाहा
करिअर म्हणून कार इंटेरिअर डिझाईनचे क्षेत्र निवडावे असे का वाटले, याविषयी सांगताना त्या म्हणतात की, लहानपणापासून मला कलेची आवड होती. आणि शाळेत गेल्यावर कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिकच व्यापक झाला. स्वत:च्या हातातून निर्मिती करण्याची आवड विकसित होत गेली. पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ॲनॅलिटिकल विषयाची आवड सहज निर्माण झाली. तेव्हा कलेबाबत असलेले प्रेम आणि ॲनॅलिटिकल विषयाची समज लक्षात घेऊन माझ्या भावाने हे क्षेत्र निवडण्याचा पर्याय सुचविला. मलादेखील त्याचे म्हणणे पटले आणि मी या क्षेत्राची निवड केली, असे त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले.
महिंद्राबरोबर काम केल्यानंतर त्यांनी स्वत:चा कार डिझाईन चा ‘कृक्स स्टुडीओ’स्थापन केला. याशिवाय ओला इलेक्ट्रिक गाड्यांचे डिझायनर प्रमुख म्हणून देखील जबाबदारी स्वीकारली आहे. बदलत्या काळानुसार इलेक्ट्रीकल वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. ही वाहने नुसतीच स्टायलिश नाही तर भारतीय रस्त्यांवर सुरक्षितपणे धावू शकतील हेदेखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटते. त्यामुळेच या गाड्या डिझाईन करणे हे निश्चितच आव्हानात्मक असे काम ठरणार आहे. आणि ही जबाबदारी देखील आधीच्या जबाबदारीप्रमाणे यशस्वीरित्या पार पाडू याची त्यांना खात्री आहे.
आज या क्षेत्रात स्त्रियांची संख्या नगण्य असली तरी, भविष्यात हे चित्र नक्कीच बदलेले असेल. जेव्हा एखादे काम तुम्हाला मनापासून आवडते, तेव्हा ते स्त्री वा पुरुषी क्षेत्राचे आहे, हा विचार मनात आणू नका. आवडत असलेल्या कामातील आव्हाने, अडचणी लक्षात घेऊन त्या दृष्टीने काम केल्यास यश हमखास तुमच्या पदरात पडते, असे त्या म्हणतात. वेगळ्या वाटेने चालत असताना आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सहजपणे ती वाट आपलीशी करून जाणाऱ्या रामकृपा अनंत यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
suchup@gmail.com