‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी अन् लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी’ असं म्हटलं जातं. बाप-लेकीचं नातं वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्याच नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो लेकीसाठी एकाच नात्यात हजारो नाती निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटांची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. एका वडिलांनी सासरच्या जाचाला कंटाळलेल्या लेकीला चक्क बँडबाजा वाजवत वाजत-गाजत घरी आणलंय.
ज्या प्रकारे कुटुंब आपल्या लाडक्या लेकीचं मंगलकार्य समाजासमोर, थाटामाटात करतात, त्याचप्रमाणे तिच्यावर आलेल्या संकटांमध्येही कुटुंबानं तिच्यासोबत समाजासमोरच उभं राहिलं पाहिजे. ज्या प्रकारे तिची पाठवणी करता, त्याच प्रकारे अडचणीतही तिच्यासाठी माहेरच्यांनी परतीची दारं उघडी ठेवायलाच हवीत. आपण बऱ्याचशा अशा घटना ऐकल्या आहेत; ज्यात मुली सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करतात. विशेष म्हणजे मुलीला होत असलेल्या त्रासाची माहेरच्यांना कल्पनाही नसते आणि मग ती कायमची गेल्यानंतर या गोष्टी समोर येतात. कारण- तिनं कधी तिला होणारा त्रास हा माहेरच्यांना सांगितलेलाच नसतो. अर्थात, त्यामागेही अनेक कारणं असू शकतात; पण माहेरच्यांनीही मुलीला विश्वासात घेऊन तुझ्यासाठी घराचे दरवाजे नेहमी उघडे आहेत, हा आत्मविश्वास द्यायला हवा आणि त्यासाठी संवाद हा खूप महत्त्वाचा आहे.
लग्नव्यवस्था मुलींच्या गळ्याचा फास?
आजकाल ऐकायला मिळणाऱ्या उदाहरणांवरून लग्नव्यवस्थाच मुलींच्या गळ्याचा फास बनत चालली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. जगभरात सासरच्या जाचाला बळी पडणाऱ्या नवविवाहित मुलींचा आकडा दिवसेंदिवस भयावहरीत्या वाढतच चालल्याचं दिसून येतंय. मुलीस सरकारी नोकरी असावी, घराण्यास वारसदार मुलगाच पाहिजे अशा अटी, तसेच मुलींकडून पैसा व चीजवस्तूंची मागणी करणारी जीवघेणी हुंडापद्धती ही सर्व त्यामागची कारणं आहेत. त्यामुळे मुलींना जीवन नकोसं होतं आणि त्या आत्महत्येस प्रवृत्त होतात. किंवा सासरची मंडळीही कधी कधी त्यांचा जीव घेण्यासही मागे-पुढे बघत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीत मुलींवर सहनशीलतेचे संस्कार केले जातात. त्यांना छोट्या-मोठ्या कारणांकडे कानाडोळा करून, संसार टिकवून ठेवण्यास प्रवृत्त केलं जातं. अशा प्रसंगी मुली स्वत:च आपल्या समस्यांशी नेटानं लढा देत राहतात.
हेही वाचा >> साधी साडी, कपाळावर टिकली; पण ३६ हजार कोटींची मालकीण! जाणून घ्या भारतातील सर्वांत श्रीमंत सेल्फ मेड महिलेचा प्रवास…
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे महत्त्वाचे
मुली या कोमल हृदयाबरोबरच खंबीर मनाच्या धनीही असतात, तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी जिकिरीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा ठाम निश्चय करावा. सासरच्यांच्या छळापुढे गुढघे न टेकता, धाडसीपणे तोंड देण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा. मुलींजवळ स्त्रीधनाच्या स्वरूपात थोडीफार जमापुंजी असते, त्याचा उपयोग करून एखादं प्रशिक्षण घेऊन लवकरात लवकर स्वबळावर उभं राहावं. आणि त्यासाठी माहेरच्यांनी मुलीसाठी परतीची दारं उघडी ठेवायलाच हवीत. कारण- काहीही झालं तरी शेवटी लेक महत्त्वाची आहे.