Inspirational Woman: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष व भारतातील सर्वांत मोठे व्यावसायिक रतन टाटा यांचा यशस्वी व्यावसायिक प्रवास आणि मनाच्या मोठेपणाचे अनेक किस्से आपण ऐकलेच असतील. सध्याच्या घडीला अनेक क्षेत्रांमध्ये टाटा समूह अस्तित्वात आहे. सध्या टाटा समूहाचे काही उद्योग पुढच्या पिढीकडे सोपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात माया टाटा यांच्याही नावाचा समावेश आहे.
कोण आहेत माया टाटा?
माया टाटा या केवळ ३५ वर्षांच्या असून, माया ही रतन टाटा यांची पुतणी आहेत. माया टाटा या रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा व अल्लू मिस्री यांच्या कन्या आहेत. माया यांची आई अल्लू या अब्जाधीश पल्लोनजी मिस्री यांची कन्या आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांची बहीण आहेत. सायरस यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. मिस्री कुटुंबाची टाटाच्या होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट व स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या माध्यमातून दीर्घकाळापासून सुमारे १८.४ टक्के मालकी आहे. अशा प्रकारे माया यांचे टाटांशी दुहेरी संबंध आहेत. त्यांचे वडील नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत; तर त्यांची आई सायरस मिस्री यांची बहीण आहे.
उच्च शिक्षित आहेत माया टाटा
माया त्यांच्या भावंडांमध्ये सर्वांत लहान असूनही, त्यांनी टाटा समूहातील कारकिर्दीत लक्षणीय प्रगती केली आहे. माया यांनी बेयस बिझनेस स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विक, यूके येथे शिक्षण घेतले असून, त्या नवल टाटा व त्यांची दुसरी पत्नी सिमोन टाटा यांची नात आहे. माया यांनी आपल्या करिअरची सुरुवात टाटा कॅपिटलची सहायक कंपनी असलेल्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंडातून केली. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार टाटा अपॉर्च्युनिटीज फंडातील त्यांच्या कार्यकाळात पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार संबंधांमध्ये माया यांचे योगदान हायलाइट करण्यात आले आहे.
हेही वाचा: Success Story: स्वप्नांपुढे सारे फिके! चहावाल्याच्या लेकीची कमाल; १० वर्षांच्या मेहनतीनंतर झाली CA
मात्र, टाटा अपॉर्च्युनिटीज फंड अचानक बंद झाल्याने माया यांच्या कारकिर्दीला अनपेक्षित वळण लागले. हा अचानक झालेला बदल त्यांना टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या टाटा डिजिटलकडे घेऊन गेला. सध्या त्यांचे लक्ष डिजिटल क्षेत्रातील शक्यता शोधण्यावर आहे. एन. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखालील समूहाने टाटा डिजिटलच्या योजनांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. माया टाटा सध्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या सहा बोर्ड सदस्यांपैकी एक आहेत, त्यांच्यावर रतन टाटा यांनी २०११ मध्ये उद्घाटन केलेल्या कोलकाता येथील कॅन्सर हॉस्पिटलची मोठी जबाबदारी आहे.