Ashadhi Ekadashi 2024 : असं म्हणतात, “आयुष्यात एकदा तरी वारी करावी” वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. दरवर्षी हजारो वारकरी व विठ्ठल भक्त या वारीत सहभागी होतात पण वारीतील एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आली का? ती गोष्ट म्हणजे वारीतील महिलांची संख्या. वारीत पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या दरवर्षी कमी असते. तुम्हाला या मागील कारण माहिती आहे? घरची जबाबदारी आणि आरोग्य. ज्या महिला वारीला येतात त्या घरची जबाबदारी कुणावर तरी सोपवून येतात आणि घरची जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी सोपवता सोपवता त्यांचे आयुष्य निघून जाते, त्यांचे पाय थकते. त्यामुळेच वारीत वृद्ध महिलांची संख्या सर्वात जास्त दिसून येते.
खरंच घरच्या जबाबदारीमुळे महिला इच्छा असूनही वारीत येऊ शकत नाही? मुलांचे शिक्षण, घरची जबाबदारी, शेतीचे कामे इत्यादी गोष्टींमुळे महिला वारीसाठी घरातून बाहेर पडू शकत नाही? याविषयी लोकसत्ताने काही महिलांशी संवाद साधला. या अशा महिला आहेत, ज्यांना वारीला जाण्याची इच्छा होती पण आयु्ष्यात एकदाही त्यांना वारी अनुभवता आली नाही.
सुशीला देशमुख (वय वर्ष ८७) : लग्नाच्या आधीपासून वारीला जायची इच्छा होती, पण पूर्वीचे लोक मुलींना एकटे पाठवत नसल्यामुळे मला वारीला जाता आलं नाही. त्यानंतर लग्न झाले, बंधने आणि जबाबदारी वाढत गेली आणि वारीला जायची इच्छा राहून गेली. घरची परिस्थिती, मोठा परिवार या सर्व व्यापात विठ्ठलाच्या भेटीला पायी चालत जाण्याची इच्छा कधीही पूर्ण झाली नाही पण एकदा गाडीने पंढरीला जाऊन आली. वयाच्या ८७ व्या वर्षात प्रवेश मी केला तरीही मला एकदा वारी अनुभवावी वाटते पण आता पर्याय नाही. वय झालं, शरीराने साथ सोडली आणि पायी वारी जाण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
साधना बलदेव मोहोड (वय वर्ष ४५) : मला आतापर्यंत वारी अनुभवता आली नाही पण आता वाटतं की वारीला एकदा तरी जाऊन यावे. संपूर्ण आयु्ष्यात एकदा योग आला पण मुलाचे शिक्षण, शेतीचे कामे, पिकांची पेरणी, कुटुंबाची जबाबदारी त्यामुळे वारीला जाता आले नाही. अनेकदा महिलांची इच्छा असते पण याच कारणांमुळे महिला वारीला जाऊ शकत नाही. घरातून बाहेर पडताना कुटुंबाचा विचार येतो मी वारीला गेली तर घरच्यांचे कसे होईल, ते जेवण तयार करू शकत नाही. याशिवाय मुलांच्या शिक्षणाला पैसा लागतो त्यात वारीला जाण्यासाठी लागणारा खर्च सुद्धा परवडत नाही.
ज्योती जनार्दन देशमुख (वय वर्ष ६४) : मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एकदाही वारी अनुभवली नाही आणि मला कधी जाण्याची संधीही मिळाली नाही. यंदा जाण्याची संधी होती पण वादळी पावसात घर उडाले आणि पुन्हा संधी नियतीने हिरावून घेतली. मुलाची तब्येतही बरी नव्हती, त्यामुळे घर सोडून वारीला जाण्याची इच्छाही नव्हती. भविष्यात वारी करायची इच्छा आहे. पायाने नीट चालता येते तोवर एकदा तरी वारी करावी अशी इच्छा आहे.
वारी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुखद अनुभव असतो. प्रत्येकजण वारीमध्ये आनंद, सुख समाधान शोधतो. महिलांच्या नशीबी वारीतला हा आनंद कधी येणार? बहुतेक महिला अजुनही घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकून आहे पुरुष स्त्री समानतेचे आपण कितीही गुणगाण गात असू तरी त्यांनी कधी घरच्या जबाबदाऱ्यातून मुक्तता मिळेल? शरीर थकल्यावर…?