लहानपणापासूनच केलीला बॉक्सिंगची आवड होती. १५ वर्षांची असताना ती तिच्या जवळच्या एका बॉक्सिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी गेली. तेव्हा त्या क्लबने चक्क “आम्ही मुलींना प्रवेश देत नाही,” असं म्हणत तिला प्रवेश नाकारला होता. तरीही ती चिकाटीनं त्या अकादमीत जात राहिली. प्रवेशासाठी प्रयत्न करत राहिली. शेवटी तिला अकादमीत प्रवेश मिळाला. या मुलीला प्रवेश नाकारून आपण किती मोठी चूक करत होतो हे तिथल्या अधिकारी आणि प्रशिक्षकांच्या लवकरच लक्षात आलं.
तिचं तिच्या देशात एखाद्या हिरोसारखं स्वागत झालं. आणि का नाही होणार? जगातल्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये तिच्या छोट्याशा देशासाठी ती दोन गोल्ड मेडल्स जिंकून आली होती. तिचा हात हातात घेण्यासाठी, तिचं अभिनंदन करण्यासाठी, तिच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी लोकांची चढाओढ लागली होती. ती आहे ऑलिंपिक स्पर्धेत आपल्या देशासाठी सोनं लुटून आलेली ३४ वर्षांची बॉक्सर केली हॅरिंग्टन! केली आयर्लंड या छोट्याशा देशाची नागरिक आहे. २०२१च्या टोकियो ऑलिंपिक आणि यंदाच्या पॅरीस ऑलिंपिक अशा सलग दोन ऑलिंपिक्समध्ये गोल्ड मेडल्स मिळवणारी ती पहिली आयरिश महिला ठरली आहे. ती आता बॉक्सिंगमधली वर्ल्ड चँपियनही बनली आहे.
आज बॉक्सिंगमध्ये अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या केलीला एकेकाळी तू बॉक्सिंग करू शकणार नाहीस’ असं सांगितलं गेलं होतं तसंच तिला प्रशिक्षणासाठी प्रवेशही नाकारण्यात आला होता. अगदी लहानपणापासूनच केलीला बॉक्सिंगची आवड होती. १५ वर्षांची असताना ती तिच्या जवळच्या एका बॉक्सिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी गेली. तेव्हा त्या क्लबने चक्क “आम्ही मुलींना प्रवेश देत नाही,” असं म्हणत तिला प्रवेश नाकारला होता. तरीही ती चिकाटीनं त्या अकादमीत जात राहिली. प्रवेशासाठी प्रयत्न करत राहिली. शेवटी तिला अकादमीत प्रवेश मिळाला. या मुलीला प्रवेश नाकारून आपण किती मोठी चूक करत होतो हे तिथल्या अधिकारी आणि प्रशिक्षकांच्या लवकरच लक्षात आलं.
मिळालेल्या प्रशिक्षणाचा फायदा घेत तिनं उत्तम कामगिरी सुरू केली होती. २०२१ ची टोकियो ऑलिंपिक ही तिची पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. तिनं त्यातही चमकदार कामगिरी करत थेट सुवर्णपदक मिळवलं. ऑलिंपिकमध्ये आयर्लंडच्या ध्वजवाहकांपैकी ती एक होती. “माझी मुलगी जे ठरवते ते करून दाखवते,” अशी प्रतिक्रिया तिच्या आईनं दिली होती. आपल्या मुलीच्या क्षमतेबद्दल आपल्याला कधीही शंका नव्हती, असं म्हणत तिनं मुलीवरचा विश्वास व्यक्त केला होता. आपल्या आईचा विश्वास खरा असल्याचं केलीनं सिद्ध केलं आहे. केली डब्लिनमधल्या सेंट व्हिन्सेंट सायकियाट्रिक हॉस्पीटलमध्ये गेली ११ वर्षं स्वच्छतेचं पार्ट टाईम काम करते. दोन गोल्ड मेडल जिंकून विक्रम केल्यावरही तिनं तिचं काम परत सुरू ठेवलं आहे. जमिनीवर राहण्यासाठी हे कामच आपल्याला मदत करतं असं तिचं म्हणणं आहे. प्रशिक्षणासाठी जायचं असेल तेव्हा याच हॉस्पिटलमधल्या सहकाऱ्यांनी आपल्याला सांभाळून घेतलं आणि त्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो असं म्हणत तिनं कृतज्ञताही व्यक्त केली होती. महत्त्वाचं म्हणजे ऑलिंपिकचा निकाल काहीही लागला तरी आपण परत कामावर जाणार असल्याचं केलीनं आधीच सांगितलं होतं. तो शब्द तिनं पाळला.
केलीनं तिची २००९ पासूनची तिची पार्टनर मॅंडी लाफलीनशी एप्रिल २०२२मध्ये लग्न केलंय. या गोल्ड मेडलनंतर केलीनं निवृत्ती जाहीर केलीये. आता यानंतरचं आयुष्य स्वत:साठी आणि मँडीसाठी असल्याचं तिनं सांगितलं. पोर्टलँडमधल्या गावी त्यांनी त्यांच्या घराचं छानसं नूतनीकरणही केलंय.
डब्लिनमध्ये असलेलं पोर्टलँड रो, हे केलीचं मूळ गाव आहे. तिथल्या रहिवाशांनी केलीला कायमच खूप प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला आहे. तिच्या ऑलिंपिकच्या फायनल मॅचच्या वेळेस शहरातल्या डायमंड पार्क या सार्वजनिक जागेवर मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. शेकडो चाहत्यांनी एकत्र येऊन केलीची मॅच पाहिली आणि तिनं सुवर्णपदक जिंकल्यावर जल्लोष केला. २०२१ च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये गोल्ड जिंकल्यानंतर “माझ्या छोट्याशा सुंदर देशातल्या प्रत्येकासाठी” असं म्हणत तिनं ते पदक देशवासियांना अर्पण केलं होतं. टोकियो ऑलिंपिकपासून तीन वर्ष आपण सतत फक्त मेहनत करत होतो. तुम्ही एका पर्वत शिखरावर पोहोचता आणि तिथून तुम्हाला आणखी एक शिखर खुणावतं, मीही तेच केलं. हे अर्थातच सोपं नव्हतं. पण मी ते केलं, असंही ती म्हणाली.
आणखी वाचा-शिक्षण आणि खेळ यांचा मेळ साधणारी गोल्डन ‘गॅबी’
आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो, फक्त त्यासाठी प्रचंड मेहनत आणि चिकाटीची, यश-अपयशाला सामोरं जाण्याची तयारी असली पाहिजे, असा संदेश केलीनं आपल्या देशात परतल्यानंतर दिला होता. हेच तिनं लक्षात ठेवलं होतं म्हणूनच तर नाकारलं जाऊनही ती रडली नाही, हरली नाही…जिद्दीनं लढली आणि जिंकलीही.
© The Indian Express (P) Ltd